साहित्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन द्यावा* - नाटककार डॉ. दत्ता भगत

     


           नांदेड : (दि.२० मार्च २०२४) 

भारताच्या गुलामीचा इतिहास मोठा आहे, असे सांगत असताना प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन साहित्य लिहावे व साहित्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन द्यावा, असे विधान यशवंत महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय जगताप यांच्या 'बारदाना ' या कथासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रसिद्ध नाटककार तथा ८६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ.दत्ता भगत यांनी केले.                                                     डॉ.संजय जगताप लिखित बारदाना या कथासंग्रहाचे प्रकाशन यशवंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय सेमिनार हॉल येथे पार पडले. यावेळी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ.जगदीश कदम, प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख, महानुभव साहित्याचे अभ्यासक डॉ.हंसराज जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध नाटककार दत्ता भगत यांची उपस्थिती होती. 

          पुढे बोलताना ते म्हणाले की, जगताप यांच्या कथा ग्रामीण संस्कृती घेऊन येतात. ग्रामीण जीवन, तेथील संघर्ष शिवाय शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, शेतकऱ्यांची दुःख, त्यांच्या वेदना त्यांची कथा मांडते. त्यामुळे ही कथा वाचकप्रिय होते, असे म्हणत असतानाच त्यांनी साहित्यिकांनी वाचकांना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण करून दिला तर साहित्य सत्याच्या कसोटीवर टिकेल असे विधान त्यांनी केले. 

          यावेळी कार्यक्रमासाठी पंढरीनाथ बोकारे, डॉ.अनंत राऊत, डॉ.कमलाकर चव्हाण, प्रा.शारदा कदम, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.सुरेश तेलंग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. शंकर विभुते, डॉ.रामदास बोकारे आदी प्राध्यापक, विविध महाविद्यालयातील विभागाचे विभाग प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ. संजय झुंबाडे यांनी मानले.

टिप्पण्या