कोरोना काळातील अन्नदाते दत्तात्रय साबळे मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सेवानिवृत्त*

कोरोना काळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामकाज २४×७ चालू होते. या कालावधीमध्ये कामगार कामावर येण्यास घाबरत होते. परंतु जे कामगार जीव धोक्यात घालून येत होते, त्यांना चहा, नाष्टा व जेवण पोहचवण्याचे काम मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील संदेशवाहक व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय साबळे यांनी केले. असे स्पष्ट उद्गार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी सत्कार सोहळ्यात काढले.

 मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ३६ वर्षाच्या प्रदीर्घ निष्कलंक सेवेनंतर १ मार्च २०२४ पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्या प्रित्यर्थ दत्तात्रय साबळे यांचा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील कर्मचाऱ्यांनी व शाळेतील सहकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भाऊचा धक्का येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा आयोजित केला होता.

दत्ता खेसे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलआयसीमध्ये असलेल्या पेन्शन फंडामध्ये पाच हजार कोटींची तूट होती, ती आता बाराशे कोटींपर्यंत कमी झाली असून लवकरच ही तूट पूर्ण भरून निघेल. गोदीमध्ये संदेशवाहक कर्मचाऱ्यांचे संबंध कामगार व अधिकारी यांच्या बरोबर चांगले असतात. मुंबई पोर्टच्या विकासात गोदी कामगारांचे मोठे योगदान आहे, असे चेअरमन राजीव जलोटा साहेब यांनी जाहीर सभेत सांगितले आहे.

पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांनी शुभेच्छापर भाषणात सांगितले की, दत्तात्रय साबळे हे एक निस्वार्थी व परोपकारी कार्यकर्ते आहेत. त्यांनी गोदी मधील विविध खात्यातील कामगारांच्या व अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाप्रसंगी चांगल्या प्रतीचे नाष्टा व जेवण दिले. म्हणून त्यांचे गोदीमध्ये नावलौकिक आहे. त्यांनी कोरोना काळात मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई महानगरपालिका, राजभवन, हॉस्पिटल्स इत्यादी विविध क्षेत्रातील कामगारांना जेवण पुरवठा केला आहे. कोरोना काळात त्यांनी अन्नदाता म्हणून फार महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे कामातील योगदान देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. साबळे यांनी पैसा व संपत्ती यापेक्षा अनेक माणसं जोडण्याचं चांगलं काम केलं. साबळे यांना कामाबरोबरच, त्यांच्या व्यवसायामध्ये पत्नी व त्यांच्या कुटुंबाने सहकार्य केल्यामुळेच ते यशस्वी झाले. 

याप्रसंगी डेप्युटी ट्रॅफिक मॅनेजर शैलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रोकडे,हिंगे, प्राचार्य शिंदे सर, श्रीमती बोरकर, पोर्ट ट्रस्टचे अधिकारी सोनार, मतिमंद मुलांची संस्था चालविणारे घोगरे, आदी मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणे केली. दत्तात्रय साबळे यांनी सत्काराला उत्तर देऊन सर्वांचे आभार मानले. सत्कार सोहळ्याला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, संघटक चिटणीस प्रदीप नलावडे, सिनियर ट्रॅफिक मॅनेजर रेड्डी, शिगवण, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव बापू घाडीगावकर व विविध संस्थांचे पदाधिकारी, नातेवाईक, मित्र मंडळी, डोंगरी येथील शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी, कामगार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन चारुदत्त भाटकर यांनी केले.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या