*जुन्या पेन्शन योजनेसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज- कॉ. वेणू नायर*

भारतातील केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, खाजगी उद्योग धंद्यामध्ये १ जानेवारी २०९४ पासून नवीन भरती झालेल्या कामगारांना नवीन पेन्शन योजना लागू आहे, ही पेन्शन योजना अन्यायकारक असून भविष्यात धोकेदायक आहे. म्हणून एकाच उद्योग धंद्यात काम करणाऱ्या सर्व कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. मात्र त्यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. असे आव्हान अखिल भारतीय रेल्वे कामगार महासंघाचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी व नॅशनल रेल्वेमेन्स मजदूर युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. वेणू नायर यांनी केले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी बॅलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या विजयदीप सभागृहात " जुनी पेन्शन योजना मागणी दिनानिमित्त " युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा झाली.

या सभेत कॉ. वेणू नायर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये पूर्वी ४२ हजार कामगार होते. आता ३ हजार कामगार आहेत. तर पेन्शनर ३६ हजार आहेत. भारतात पूर्वी ३ लाख गोदी कामगार होते तर आता ३० हजार गीदी कामगार आहेत. रेल्वेमध्ये १२ लाख कामगार असून अडीच लाख जागा रिकाम्या आहेत. सरकारी उपक्रमामध्ये जे कामगार नवीन भरती झाले आहेत ते भाग्यवान आहेत. कारण त्यांना सरकारी नोकरी मिळाली. जानेवारी २००४ नंतर भरती झालेल्या कामगारांना नवीन पेन्शन योजना लागू आहे. ही योजना अन्यायकारक असून, या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, अशी सर्व केंद्रीय कामगार संघटनांची मागणी आहे. ही मागणी मिळविण्यासाठी नवीन भरती झालेल्या तरुण कामगारांना संघटित करून एकजुटीने लढा देणे, ही काळाची गरज आहे. रेल्वे उद्योगातील कामगारांनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये दोन लाख कामगारांचा प्रचंड मोर्चा काढला होता. जुन्या पेन्शन योजनेतील कामगार खुश आहेत तर नवीन पेन्शन योजनेतील कामगार नाराज आहेत. त्यासाठी नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी आमची सर्व कामगार संघटनांची मागणी आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, lमुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये १ जानेवारी २००४ नंतर २५० कामगार व अधिकारी भरती झाले आहेत . त्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे, मात्र ही पेन्शन योजना भविष्यात धोकादायक आहे. त्यामुळे या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. त्यासाठी आमचा लढा सुरू झाला आहे

याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सचिव मोहन राजू, युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. व्यासपीठावर रेल्वे कामगारांचे नेते प्रदीप शिंदे उपस्थित होते. या सभेत नवीन पेन्शन योजना रद्द करून, जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागणीचा ठराव शैलेश भागवत यांनी मांडला, या ठरावाला विनोद कांबळे यांनी पाठिंबा दिला. सभागृहातील सर्व कर्मचाऱ्यांनी हात उंचावून या ठरावास संमती दिली. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी केले तर आभार युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी मानले. सभेला युनियनचे पदाधिकारी विकास नलावडे , शीला भगत, मनीष पाटील, मारुती विश्वासराव आदी मान्यवर, कामगार, कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला

मारुती विश्वासराव

प्रसिध्दीप्रमुख

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या