बालसाहित्यकार फारूक काझी यांनी 'मुलांसाठी काही कविता' ह्या शीर्षकाखाली बालकवितांच्या सुट्या कार्डांचा अभिनव उपक्रम केला आहे.
फारूक काझी यांच्या बाराही कविता आणि त्यावर गिरीश मालप यांनी काढलेली चित्रे अतिशय अप्रतिम आहेत!
त्यातील 'पुस्तकाचं मरणं' ही कविता मला अतिशय आवडली!
'अम्मी म्हणाली,
पुस्तक उघडलं की
जिवंत होतं
हसायला लागतं.
मी विचारलं,
आणि नाही उघडलं तर?
अम्मी म्हणाली,
मरून जातं!'
पुस्तकं जिवंत ठेवायची असतील, तर त्यात वाचकांचा सहभाग महत्त्वाचाच आहे. पुस्तकाचं महत्त्व समजावून सांगायची ही कल्पना मला फारच आवडली!
दुसर्या एका कवितेत गुरुजी प्रश्न विचारतात, जगात सर्वात सुंदर काय?
उपाशी पोर उत्तर देतं, 'भाकर'.
भुकेइतकं आणि भाकरीइतकं नितांत सुंदर या जगात काहीच नसतं, हेच खरं!
दोन कवितांमधे लेकरांना पडणारे बालसुलभ प्रश्न आहेत.
डोळ्यांत झोप येते, हे खरे. पण आपण झोपी गेल्यावर ही झोप कुठे जाते?
मोठमोठ्या लोकांना निरुत्तर करणारा हा प्रश्न आहे. तसेच हवा कुठे जाते? हा प्रश्न.
वेगवेगळ्या आकारात दिसणारा चंद्र आणि ढग बाळगोपाळांच्या कल्पनाशक्तीला आवाहन करतात. अर्ध्या चंद्रकोरीचा आकार मुलांना चिप्ससारखा दिसतो, कारण मुलांना चिप्स फारच आवडतात.
मनी ठसे, ते कल्पनेत दिसे! दुसरं काय!
झाड वा-यावर हललं की जमिनीला गुदगुल्या होतात. आहे की नाही मज्जा!
आवाज पडला. चेहरा पडला. पाऊस पडला. उमेदवार पडला. यातील 'पडला' ह्या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी ही कविता वाचायलाच हवी. या कवितेतलं आभाळ पाण्यात उतरून न्हातं.
अशा सगळ्या गमतीजमती ह्या कवितांमध्ये आहेत.
ह्या कार्डांचा फायदा असा की एका वेळी १२ विद्यार्थी वाचू शकतात आणि आलटूनपालटून कितीही वाचू शकतात. बालकांना कवितेच्या जवळ नेणारा अभिनव उपक्रम केल्याबद्दल कवी फारूक काझी आणि चित्रकार गिरीश मालप हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत!
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

addComments
टिप्पणी पोस्ट करा