कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांचे 'बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा' हे पुस्तक पुण्यातील दिलीपराज प्रकाशनाने अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना
डॉ. श्रीकांत पाटील यांच्या प्रयोगक्षम नाट्यछटा
डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील हे परिश्रमपूर्वक आणि संशोधनपूर्वक लेखन करणारे प्रतिभाशाली लेखक आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता, कादंबरी एकांकिका इ. वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांना ह्या लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे दोन पुरस्कार लाभले आहेत. विविध वाङ्मयप्रकारांत यशस्वी मुशाफिरी केल्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा नाट्यछटा लेखनाकडे वळविला आहे.
'बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा' हा आपला नवीन संग्रह घेऊन ते आता बालकुमार वाचकांच्या भेटीला आले आहेत.
इतर वाङ्मयप्रकारांच्या तुलनेत नाट्यछटा कमीच लिहिल्या जातात. त्यातही वाचनीय आणि प्रयोगक्षम नाट्यछटा अगदीच कमी लिहिल्या जातात. नाट्यछटा हा शब्द उच्चारताच नामवंत लेखक शंकर काशीनाथ उर्फ दिवाकर (१८८९ - १९३१) यांचेच नाव आठवते. दिवाकर हेच नाट्यछटा या वाङ्मयप्रकाराचे जनक मानले जातात. त्यांनी १९११मध्ये पहिली मराठी नाट्यछटा लिहिली, म्हणून १९११ हे मराठी नाट्यछटेचे जन्मवर्ष मानले जाते. जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिवाकरांच्या नाट्यछटा हमखास असायच्या. त्यामुळे आमच्या पिढीच्या मनात नाट्यछटा म्हणजे दिवाकर, हे समीकरण दृढ झाले आहे. तथापि मागील ११२ वर्षांत नाट्यछटा हा वाङ्मयप्रकार फारसा समृद्ध झाला नाही. मागील शतकभरात नाट्यछटांचे अगदीच तुरळक लेखन झाले आहे, असे दिसते.
'नाट्यछटा' ह्या शब्दात 'नाट्य' असले, तरी नाटक आणि नाट्यछटा यात काही प्रमुख फरक आहेत. नाटकात एकापेक्षा अधिक पात्रे असतात, तर नाट्यछटा सादर करणारे पात्र एकच असते. नाटकात विविध पात्रांच्या तोंडी 'डायलॉग' असतात, तर नाट्यछटेत 'मोनोलॉग' असतो. नाट्यछटेत एकच पात्र बोलत असले, तरी सोबत एक किंवा अधिक पात्रं आहेत आणि तीही त्याच्याशी बोलत आहेत, असा आभास ते निर्माण करते. नाट्यछटा अतिशय आटोपशीर असते. नाट्यछटेचा जीव छोटा असला, तरी भाषा पीळदार असेल आणि सादरीकरण प्रभावी असेल, तर अपेक्षित परिणाम साधला जातो. एका नाट्यछटेत एकच प्रसंग नाट्यपूर्ण पद्धतीने मांडला असेल, तर त्याचा एकजिनसी परिणाम साधला जातो.
'बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा' ह्या पुस्तकात छान छान अशा एकूण २५ नाट्यछटा आहेत. यात विषयांची विविधता आहे. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे यातील नाट्यछटा खरोखरच बहुरंगी आणि बहुढंगी आहेत. शाळेतील वर्गप्रतिनिधीला (मॉनिटर ) वर्गाची शिस्त राखण्यासाठी सगळ्यांचा वाईटपणा घ्यावा लागतो. मॉनिटर आणि इतर विद्यार्थी त्यांच्यातील सुप्त संघर्ष हा सगळ्यांच्या परिचयाचा भाग आहे. हाच विषय पहिल्या नाट्यछटेत आला आहे. अशा जिव्हाळ्याच्या विषयावरील नाट्यछटा बालकुमार वाचकांना नक्कीच आवडतात.
बालकुमारांना खेळायला फारच आवडते आणि 'अभ्यास' ह्या शब्दाचा तितकाच तिटकारा असतो. 'अभ्यास एके अभ्यास' ह्या नाट्यछटेत हाच विषय हाताळला आहे. ह्या नायकाने अभ्यासाच्या ओझ्याखाली आपले बालपण कोमेजून जात असल्याची तक्रार केली आहे. प्रत्येक बालकाच्या मनातली ही भावना असल्यामुळे ही नाट्यछटा बाळगोपाळांना आवडणारच! 'मर्यादेने वागा' ह्या नाट्यछटेत आजकालच्या मुलामुलींचे पोशाख, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि मोबाईलचा अतिरेकी वापर ह्या गोष्टींवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. त्यांना मर्यादेने वागण्याचा सल्ला दिला आहे. 'संस्कारच हरवलेत' ह्या नाट्यछटेत गुरुजींनी विद्यार्थ्यांच्या बेशिस्तपणाचा पाढा वाचला आहे.
'केवढं हे ओझं' ह्या नाट्यछटेतील नायकाने दप्तराच्या वाढत्या ओझ्याविषयी कडवट भाष्य केले आहे.
'घ्या ना मला खेळायला' ह्या नाट्यछटेतली नायिका स्त्रीपुरुष समतेचा आग्रह धरते आहे. मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत, हे ठासून सांगते आहे. हा एक कालसुसंगत असा संदेश आहे. 'घरात बसा म्हणावं यापेक्षा' ही नाट्यछटा क्रिकेटच्या मैदानावर फुलते. मैदानावरचा सगळा जोश आणि उत्साह ह्या नाट्यछटेत छान उतरला आहे. 'माझ्याशिवाय हाय कोण?' ही नाट्यछटा निवडणुकीच्या राजकारणाची ओळख करून देते. 'मला शांतता हवीय' ह्या नाट्यछटेत डॉल्बीमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाची समस्या मांडली आहे.
'घाई आहे मला' ह्या नाट्यछटेची नायिका ही एक नोकरदार स्त्री आहे. गृहिणी म्हणून, आई म्हणून आणि पत्नी म्हणून नोकरदार स्त्रीची होणारी ओढाताण लेखकाने छान टिपली आहे. घरातली मोठी माणसे चक्क टीव्ही पाहत बसतात आणि मुलांना सांगतात, अभ्यास करा. मोठी माणसे वेगवेगळे पोशाख करतात आणि लहान मुलांना दररोज एकच गणवेश वापरावा लागतो. मोठी माणसे कामाच्या निमित्ताने बाहेर भटकत असतात आणि मुलांना मात्र नियमात नि बंधनांत जखडून ठेवतात. 'सगळी बंधनं आम्हालाच का?' ह्या नाट्यछटेतल्या नायकाने ह्या विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.
'पारख म्हणून नाही बघा' ह्या नाट्यछटेत ऑफरच्या आणि सेलच्या नावाखाली होत असलेल्या ग्राहकांच्या लुटीवर प्रकाश टाकला आहे. सजगपणे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. काही नाट्यछटांतून अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, नागरी सुविधांअभावी गावाला आलेली अवकळा असे विषय हाताळले आहेत. यापूर्वी असे समाजजीवनातील उपेक्षित विषय नाट्यछटांतून आले असतील, असे वाटत नाही. दिवसरात्र चालत असलेल्या खासगी शिकवणींच्या नावाखाली मुलांना यंत्र बनवून टाकल्याची खंत एका नाट्यछटेत व्यक्त झाली आहे.
कालची जुनी पिढी आणि आजची नवी पिढी यांच्यातील सुप्त संघर्ष एका नाट्यछटेत मुखर झाला आहे. कुटुंबातील काही सदस्यांच्या वेंधळेपणामुळे घराला आलेला अस्ताव्यस्तपणा, फॅशनच्या नावाखाली चाललेले किळसवाणे प्रकार, ऑनलाईन शाळा आणि अभ्यास, वारंवार होणाऱ्या परीक्षा, लग्नाच्या बाजारात होत असलेली मुलामुलींची कुचंबणा या विषयांवर काही नाट्यछटांतून प्रकाश टाकला आहे. समाजातील रिकामटेकडे लोक ही एक डोकेदुखी असते. लहान मुलांचा उपवास हा इतरांच्या दृष्टीने थट्टेचा विषय असतो. ह्या दोन्ही विषयांवरील नाट्यछटांत लेखकाने मस्त विनोदनिर्मिती साधली आहे.
काही नाट्यछटांतून वृक्षारोपण, पर्यावरणसंरक्षण आणि भूतदया यासंबंधी उद्बोधक संदेश दिला आहे. दृष्य - अदृष्य पात्रांचे स्वभावविशेष दाखवत मानवी स्वभावांतील विसंगती टिपल्या आहेत. मानवी भावभावनांचे छान प्रकटीकरण केले आहे. अनेक सामाजिक दोषांवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे. ह्या नाट्यछटांमध्ये वर्तमानकाळातील समाजाचे आणि घटना - घडामोडींचे यथातथ्य प्रतिबिंब उमटले आहे.
लेखकाने ह्या नाट्यछटांच्या माध्यमातून बालकुमारांसोबत तथाकथित मोठ्यांनाही आत्मचिंतन करण्याची संधी दिली आहे. केवळ दोन- दोन पृष्ठांच्या आटोपशीर नाट्यछटांतून विविध जीवनरंग दाखविले आहेत. डॉ. श्रीकांत पाटील यांची लेखनशैली अतिशय संवादी असल्यामुळे सर्वच नाट्यछटा परिणामकारक झाल्या आहेत. नाट्यछटांची शीर्षके मोठी बोलकी आहेत. प्रमाणभाषेची पर्वा न करता लेखकाने वारणा खो-यातील बोलीभाषेचा मोकळेपणाने वापर केल्यामुळे ह्या लेखनात एक प्रकारचा जिवंतपणा आला आहे. त्यातील एखादी नाट्यछटा पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केल्यास दिवाकरांच्या नाट्यछटेची परंपरा पुढे चालू राहील.
डॉ. श्रीकांत पाटील यांनी संतवचने आणि कवितेच्या ओळींचा श्रुतयोजन म्हणून चपखल वापर केला आहे. पात्रांच्या तोंडी, 'चोर सोडून संन्याशाला फाशी, लोकां सांगे ब्रह्मज्ञान। आपण कोरडे पाषाण, उधळलं घोडं गेलं दरीत, अति तिथं माती, गोगलगाय अन् पोटात पाय, हसतील त्याचे दात दिसतील, खेळखंडोबा अन् नाच बिरोबा, एकादशी अन् दुप्पट खाशी अशा म्हणींचा आणि लोकोक्तींचा वापर केल्यामुळे जनजीवनातील रसरशीतपणा ह्या लेखनात उतरला आहे. ह्या नाट्यछटा वाचनीय तर आहेतच, शिवाय प्रयोगक्षम आहेत. बालरंगभूमीला आणि शालेय रंगभूमीला ह्या नाट्यछटा उपयुक्त ठरतील, असा विश्वास वाटतो.
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा