निसर्गदर्शन आणि सामाजिक पर्यावरणाचा वेध : 'आभाळमाया' डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर.

बालकविता मुलांच्या भावविश्वात आनंद पेरण्याचे काम करते. त्यांना हसायला, नाचायला, आनंदाने जगायला प्रवृत्त करते. विद्यार्थी बालकविता वाचतात, ती मुखोद्गत करतात, तिला चाल लावतात. त्या चालीवर गायनाबरोबर त्यांचे हात आणि पाय तालासुरात नाचू लागतात. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यापासून सुरू झालेली बालकवितेची परंपरा आजही त्याच जोमाने चालू आहे. डॉ. सुरेश सावंत हे आजच्या मराठी बालकवितेतील महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या जांभूळबेट, बालकनीती आणि पळसपापडी या तीन बालगीतसंग्रहांना राज्य वाड्मय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. युद्ध नको बुद्ध हवा, गूगलबाबा आणि नदी रूसली नदी हसली या बालकवितासंग्रहांनी बालविश्वात अफाट प्रसिद्धी मिळवली आहे. 


याच मालिकेत 'आभाळमाया' हा सरांचा नवाकोरा बालकवितासंग्रह निसर्गातील विविध घटकांना कवेत घेत बालकांच्या भावविश्वातील शाळा, शिक्षण, खेळ, छंद यावर भाष्य करीत अवतीर्ण झाला आहे.

धरित्री आणि आभाळ माणसाला आपल्या कवेत घेऊन त्याला आकार देत असते. खाली जमीन आणि वर आकाश या पर्यावरणात माणसाची जडणघडण होत असते. म्हणूनच बालकांच्या मनामध्ये माती आणि आभाळाविषयी ओढ आणि प्रेम निर्माण व्हावे, त्याला या निसर्गघटकांची माया कळावी, त्यातील घटकांचा परिचय व्हावा. झाडे, वेली, पक्षी यांच्याशी त्यांची मैत्री व्हावी. विविध सणांची ओळख व्हावी, मुलांच्या मनावर उत्तम संस्कार व्हावेत, त्यांना शाळा- माऊलीचा लळा लागावा. अडचणी, संकटे यांवर मात करण्याचे साहस त्यांच्या ठायी निर्माण व्हावे. कृतज्ञता, शांतता, संयम आणि हुशारी ही मानवी मूल्ये त्यांनी अंगीकारावीत, अशी शिकवण देणाऱ्या कवितांची मालिकाच आपणास 'आभाळमाया'मध्ये वाचायला मिळते. 


'आभाळमाया' मधील कवितांत काव्याबरोबरच ज्ञान आणि माहितीचा रंजक तपशील टिच्चून भरलेला आहे. कल्पना आणि भावनांचा सुरेख संगम म्हणजे कविता असे कवितेबाबत म्हटले जाते. येथे कल्पना आणि भावनेबरोबर विद्यार्थ्यांच्या जिज्ञासूपणाला प्रेरित करून जिज्ञासातृप्ती करण्याचे कार्य कवीने केलेले आहे. निसर्गातील सजीवसृष्टीवर आभाळाची वेडी माया असते. झाडे, वेली, त्यावर विसावलले पक्षी आणि आकाशातील ग्रहतारे या मायेच्या अतूट बंधनात असतात. कवी या निसर्गघटकांवर यांतील कवितांतून एक प्रकारे प्रेम करण्याचे आवाहनच करतो.


'पावसाळ्यात आभाळाची

ओली माया रिमझिमते 

आभाळाच्या अभिषेकाने 

धरती हिरवीगार होते' 

या मातीच्या कुशीत पपई फुलली असून फळाला आली आहे. सूर्यफुलांच्या शेतीत गडद केशरी शालू नेसून सोनपरी अवतरली आहे. झेंडूच्या शिवारात पिवळा गालिचा अंथरला गेला आहे. अभयारण्यात सर्व प्रकारचे वन्यजीव सुखेनैव संचार करीत आहेत. काजव्यांच्या गावातील त्यांचा चमचमाट मोहमयी असून बालमनाला भुरळ घालणारा आहे. निसर्ग हा माणसाचा गुरू आहे. तो मोठा जादूगार आहे. 'निसर्ग मोठा किमयागार' या कवितेत निसर्गाच्या विविध रूपे रंगवताना कवीच्या प्रतिभेला बहर आलेला आहे. निसर्ग हा चित्रकार आहे, जादूगार आहे, संगीतकार आहे आणि शिल्पकारही आहे. हे सर्व कवी अतिशय तन्मयतेने शब्दबद्ध करतो. रंग आणि कुंचल्याशिवाय अवकाशाच्या विस्तीर्ण पटलावर इंद्रधनुष्याची कमान साकारणारा निसर्ग कवीला किमयागार वाटतो.


पाऊस हा बाळगोपाळांच्या आवडीचा विषय. पावसात भिजायला, नाचायला मुलांना खूप आवडते. म्हणूनच वर्षाराणीच्या स्वागतासाठी मुले नेहमीच आतुरलेली असतात. वर्षाराणीच्या आगमनाचे वर्णन करताना कवीची प्रतिभा फुलून येते.

'थुईथुई ही नाचत मुरडत

आनंदायी कारंजी फुलवत

रिमझिम रिमझिम रसधारांनी 

वृक्षसंपदा तृप्त जाहली 

वर्षाराणी ठुमकत आली'

'मावळतीचा सूर्य' या कवितेतून खूप छान संदेश ते मुलांना देतात. विद्यार्थ्यांनी स्वयंदीप व्हावे, गर्व, अहंकाराचा त्याग करावा. किंबहुना तो असूच नये. सुख आणि दुःख काही घटिकांपुरते असते. काळोखाच्या पोटातूनच प्रसन्न पहाट जन्माला येते. एक प्रकारे 'तिमिरातून तेजाकडे' जाणारा हा प्रेरणादायी पथ विद्यार्थ्यांना दाखवण्याचे कार्य ही कविता करते.


ऋतुवर्णन, जंगलवाचन, भटकंती ज्ञानार्जन, झाडांचे वर्णन अशा विविध विषयांतून एक प्रकारे पर्यावरणशिक्षण आणि रक्षण अशी दुहेरी भूमिका कवी पार पाडतो आहे. निसर्गातील घटकांना काव्यरूपात बांधून पर्यावरण वाचविण्याबरोबर कवितेतून ते वाचण्याची गोडीही लावतो आहे.

मुलांची जडणघडण कुटुंब, शाळा आणि समजात होत असते. आईवडील आणि गुरूजन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगदान देत असतात. कोरोना काळात घरी अडकून पडलेला मुलगा आपली कैफियत 'माझाच पोपट झाला' या कवितेतून व्यक्त करतो. पुस्तक, शाळा, मित्र याबाबत बालकांच्या भावना व्यक्त करतानाच त्यांचे भावविश्वही ते प्रकट करतात. कृतज्ञता, राग आला राग, धोका पत्करण्याचे साहस, तेजशलाका, आळस आणि कंटाळा, प्रकाशगीत या कविता बालकुमारांमध्ये मानवी मूल्यांची रूजवणूक करतानाच गुणावगुणांची जाणीवही करून देतात. दिवाळी, होळी, नाताळ या सणांची ओळख करून देत असताना रिवाज आणि आनंद यांची महतीही गातात. बलवंत तू गुणवंत तू आणि कोलंबसासारखा या कवितांतून त्यांना आत्मशक्तीची जाणीव करून देतात.


राजस्थानी कलावंतांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचे वर्णनही अप्रतिम आहे. खेळाच्या माध्यमातून एका नव्या जगाची ओळख येथे होते.

'देहभान विसरून मग

बघत राहती सारे 

कळसूत्री बाहुल्यांचे 

हे जगच आहे न्यारे' 

'आभाळमाया' मधील सर्वच कविता ह्या बालमनावर मोहिनी घालणाऱ्या आहेत. उत्तम शब्दांची उत्तम रचना करून मुलांना ज्ञानदान करण्याचे पवित्र कार्य येथे साधले आहे. आकलनसुलभतेमुळे कवितेचे विषय आणि आशय समजावून घेणे मुलांना सहज शक्य झाले आहे. आकर्षक चित्रे, सुयोग्य रंगसंगती आणि दर्जेदार रचना यामुळे 'आभाळमाया' निसर्गसुंदरतेच्या आविष्काराने नटलेला बालकवितासंग्रह आहे, असेच म्हणावे लागेल. बालकुमारांसाठी 'आभाळमाया'तील काव्यलेण्यांतून अनेकविध विषयांचे ज्ञानभांडार खुले केल्याबद्दल डॉ सुरेश सावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 


आभाळमाया (बालकवितासंग्रह) 

कवी : डॉ. सुरेश सावंत

प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे. 

मुखपृष्ठ, आतील सजावट : पुंडलिक वझे

आर्ट पेपरवरील रंगीत पृष्ठे ६८ 

मूल्य रु. ३६०


पुस्तक परिचय :

डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील

राष्ट्रपती पुरकारप्राप्त शिक्षक 

राज्यशासन पुरस्कारप्राप्त लेखक

टिप्पण्या