सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 ला पंचप्यारेंसह देशभर हजूरी शिख समाजाचा तीव्र विरोध


रस्त्यावरील आंदोलन व न्यायालयीन लढाईची तयारी

   नांदेड /प्रतिनिधी- राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्ती भाटिया यांच्या अहवालास मंजुरी देत सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 संमत केला आहे . या अधिनियमास सचखंड गुरुद्वारातील पंच प्यारेंसह हजुरी शिख समाजाने तीव्र विरोध केला असून या कायद्याची अंमलबजावणी केल्यास तीव्र पडसाद उमटण्याचा इशारा दिला आहे.


     शीख धर्मीयांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांचे समाधी स्थळ असलेले जागतिक कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा शीख धर्मीयांचे दक्षिण काशी मानले जाते. या गुरुद्वाराचे व्यवस्थापन करणारा गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट 1956 रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायमूर्ती भाटिया यांच्या शिफारशीनुसार अधिनियमात बदल करून सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 संमत करण्यात आला आहे. गुरुद्वारा बोर्ड 1956 मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येऊ नयेत याबाबत पंचप्यारे साहिब यांनी गुरुमत्ता (ठराव) दिनांक 21 जानेवारी 2019 व 13 डिसेंबर 2023 रोजी पास करून शासनास पाठविण्यात आला होता. असे असताना देखील राज्य शासनाने गुरुद्वारा बोर्ड ॲक्टमध्ये बदल करून सचखंड गुरुद्वारा आपल्या ताब्यात घेण्याचा घाट घातल्याचा आरोप बोर्डाचे आजी-माजी सदस्य, अध्यक्ष व हजुरी शिख समाजातर्फे करण्यात आला आहे.

      हजुरी शिख समाजातर्फे 7 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुद्वारा बावली साहेब येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये नव्याने येत असलेल्या गुरुद्वारा अधिनियम 2024 चा तीव्र निषेध करून या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक ठाणसिंग बुंगईई यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

       या निवेदनावर गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष शेरसिंग फौजी, माजी सचिव रवींद्रसिंग बुंगई, सदस्य राजेंद्रसिंग पुजारी, मनप्रितसिंग कुंजीवाले, गुरमितसिंग महाजन जर्नलसिंघ गाडीवाले, जगदीपसिंग नंबरदार, महेंद्रसिंग पैदल, तेजासिंह बावरी, हरभजनसिंग दिगवा, गुरमीतसिंग बेदी, किरपालसिंग हजुरिया, मनप्रितसिंग कारागिर, दीपकसिंग गल्लीवाले, गुरमीतसिंग बेदी, जसबीरसिंग धुपिया, जसपालसिंग लांगरी, रवींद्रसिंग मोदी, रवींद्रसिंग पुजारी, दिलीपसिंग रागी , भोला सिंग गाडीवाले अमरजीतसिंग पंजाबसिंग गिल, दीपसिंग , पुरणसिंग, राजेंद्रसिंग शाहू,हरभजन सिंग पुजारी गुरुदेवसिंग रामगडिया गुरमीतसिंग महाजन, महेंद्रसिंग लांगरी, गुरुप्रीतसिंग सोखी, अवतारसिंग पहरेदार यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत

गुरुद्वारा बोर्ड 1956 रद्द करून नवीन सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 मध्ये राज्य शासनातर्फे 12 नियुक्त सदस्य, 3 लोकनियुक्त तर 2 सदस्य हे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी अमृतसरचे असतील. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई , पुणे, नागपूर व नाशिकच्या सदस्यांचा समावेश असेल यास हजुरी शिख समाजातर्फे विरोध करण्यात येत आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमत करण्यात आलेला गुरुद्वारा अधिनियम 2024 चा निषेध करण्यात येत असून हजुरी शिख समाजाकडून गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही राजकीय नेत्यांचे स्वागत व सत्कार पारंपारिक शिरोपाव देवून करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पण्या