गिरण्यांच्या चाळींची पुनर्बाधणी आणि घरांच्या प्रश्नावर ७ फेब्रुवारीला 'भारतमाता' येथे गिरणी कामगारांचे धरणे आंदोलन!

 

   मुंबई दि.३०: धोकादायक गिरण्यांच्या चाळींची मुंबई विकास नियंत्रण नियमावली कायद्या अंतर्गत त्वरित पुनर्बाधणी करण्यात यावी आणि पात्रता निश्चिती करणानंतर त्वरितच म्हाडा अंतर्गत घरांच्या बांधकामाला गती द्यावी,आदी मागण्यांसाठी येत्या ७  फेब्रुवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने लालबाग भारतमाता येथे गिरणी कामगारांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

    राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, पत्रकार जयश्री खाडिलकर पांडे, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र गिरणी‌ कामगार युनियननेचे अध्यक्ष जयप्रकाश भिलारे, सेक्रेटरी जयवंत गावडे, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे,तसेच रामिम संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे आदी मान्यवर उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन करतील.

    एनटीसी चाळ रहिवासी कृती समितीचे भाऊसाहेब आंग्रे(दिग्विजय मिल) किरण गावडे(मधुसूदन), महेंद्र‌ हेंद्रे (जाम) तसेच खासगी गिरण्यांच्या रहिवासी कृती समितीचे पदाधिकारी आणि संघाचे संघटन सेक्रेटरी आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत आहेत.या प्रसंगी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यात येईल.

     १जानेवारी नंतर कामावर असलेल्या कामगारांना एकाच पुराव्यांवर घर मिळाले पाहिजे, पात्रतेसाठीची २४० दिवसाची अट रद्द करा,सोडत लागल्या नंतर ४५ दिवसात घर मिळालेच पाहिजे,गिरणी कामगारांना घरे कमी पडू नये यासाठी सरकारने देऊ केलेली सरकारच्या मालकीची ११० एकर जमीन दिलीच पाहिजे,पंतप्रधान आवास योजनेतील घरे गिरणी कामगारांना द्या,ज्याज्या सरकारी योजनेत शक्य‌ आहे तेथे,गिरणी कामगार घरांना प्राधान्य देण्यात यावी,राज्य सरकारने त्वरितच कामगार नेत्यांची बैठक बोलावून दोन्ही प्रश्न मार्गी लावावेत,अशा या आंदोलना द्वारे मागण्या करण्यात येणार आहेत.

बातमी प्रसिद्धी करिता 🙏

टिप्पण्या