मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे* -श्री.सुभाषराव कदम

 


नांदेड:( दि.२५ जानेवारी २०२४)

           लोकशाही बळकट करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने मतदार म्हणून नाव नोंदविणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे तत्व भारताला दिलेले आहे. त्यामुळे मतदान करणे म्हणजे देशावर प्रेम करणे आहे; असे मत श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य श्री.सुभाषराव कदम यांनी व्यक्त केले.

           यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि इंटरनल कमिटी अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेल यांच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

           याप्रसंगी विचारमंचावर व्याख्यानाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे आणि डॉ.वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.

           अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, प्रत्येक नागरिकाने प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान केलेच पाहिजे तरच आपल्या देशातील लोकशाही समृद्ध आणि संपन्न होईल. त्याचप्रमाणे शासकीय आणि निमशासकीय संस्थांद्वारे करण्यात येणाऱ्या विविध सर्वेमध्ये देखील आपले मत नोंदविणे गरजेचे आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे; त्यामुळे नवमतदारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे; असे प्रतिपादन केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय गव्हाणे यांनी केले तसेच शेवटी आभार देखील मानले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले. व्याख्यानास विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या