नांदेड: संस्कृत भाषा जपली तरच संस्कृती जपली जाईल. लहान मुलांची आकलन शक्ती चांगली असते. ते संस्कृत भाषा लवकर शिकू शकतात, त्यामुळे लहान वर्गापासून संस्कृत शिकविले गेले पाहिजे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण वर्ग सुरु झाले पाहिजेत, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे प्रांत प्रचारक प्रमुख डॉ दिवाकरराव मांडाखळीकर यांनी संस्कृत भारती शाखा नांदेड आणि डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत संमेलनात बोलतांना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर होते तर संस्कृत भारतीचे प्रांतमंत्री आचार्य अविनाश गोहाड यांच्यासह डाॅ. सविता भालेराव, डाॅ. उमेश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ मांडाखळीकर बोलतांना पुढे म्हणाले की, देशातील 4 खेड्यासह 30 कुटुंबे संस्कृतमय झालेली आहेत. याचबरोबर वाराणसी येथील लालबहादूर शास्त्री विमानतळावर इंग्रजी, हिंदीबरोबरच संस्कृत भाषेतूनही सूचना करण्यात येतात . याचा उल्लेख करत त्यांनी संस्कृत जपली तरच संस्कार जपले जातील हे स्पष्ट केले.
या संमेलनाचा प्रारंभ शोभायात्रेने झाला तर वेदमंत्र शांतिपाठ या मंत्रोच्चाराने मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारत मातेच्या पूजनानंतर मार्गदर्शन, व्याख्यान, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनी, संस्कृत पुस्तक विक्री आदी संस्कृत विषयक विविध उपक्रमांचा अंतर्भाव असलेले कायर्क्रम सादर करण्यात आले, यात उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाटात करत प्रतिसाद दिला.
------------------------------ ------------------------------ --चौकट------------------------ ------------------------------
संस्कृत दिवस साजरा करावा ः कानडखेडकर
संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रभाकरराव कानडखेडकर म्हणाले की, संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणा-या कार्यक्रमात संस्कृत भाषेत मंत्रोच्चार होतो परंतु संस्कृत भाषा कर्मकांडापुरतीच न राहता त्याचा विस्तार झाला पाहिजे, तेव्हाच संस्कृत भाषेची सर्वत्र पेरणी होईल, हे सांगताना त्यांनी संस्कृत पंडित यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांची आठवण उपस्थितांना करून दिली. याचबरोबर मराठी व हिंदी दिवस साजरा केला जातो. त्याच धर्तीवर संस्कृत दिवसही साजरा केला तरच ही भाषा जनमाणसात रुजली जाईल, अशी मागणीही प्रभाकरराव कानखेडकर यांनी यानिमित्ताने केली.

addComments
टिप्पणी पोस्ट करा