डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील योगदानाचा उचित सन्मान


नांदेड दि. 23 -

’पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील योगदानाची मराठवाडा साहित्य परिषदेने उचित दखल घेतलेली आहे. अत्यंत निष्ठेने आणि गुणात्मक दर्जा राखून डॉ. सावंतांनी बालसाहित्यनिर्मिती केली आहे. त्यांच्या साहित्याची महाराष्ट्रातील मान्यवर संस्थांनी दखल घेतलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. वाचनसंस्कृती निर्माण करण्यासाठी हे उपक्रम उपकारक ठरले आहेत. त्यामुळे बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड झाल्याचा विशेष आनंद आहे,’ असे उद्गार डॉ. सुरेश सावंत यांच्या सत्कारप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी काढले. येथील निर्मल प्रकाशनाच्या कार्यालयात पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुरेश सावंत यांचा शाल, पुष्पहार आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी हे होते.

मराठी रसिक, वाचकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केले असून त्यांच्याच प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळे आपण सातत्याने लिहीत आलेलो आहोत, असे भावपूर्ण उद्गार डॉ. सुरेश सावंत यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.

डॉ. सावंत यांचे बरेच साहित्य प्रकाशित करण्याचे भाग्य निर्मल प्रकाशनाला लाभले असून सतत लेखन, वाचनाचा ध्यास घेतलेले असे लेखक हीच निर्मल प्रकाशनाची श्रीमंती आहे. निर्मल प्रकाशनाचे मार्गदर्शक म्हणूनही डॉ. सावंतांनी भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान हा निर्मल प्रकाशनाचाच सन्मान असल्याचे अध्यक्षीय समारोप करताना निर्मलकुमार सूर्यवंशी म्हणाले.

याप्रसंगी रानकवी श्रीनिवास मस्के, अनुवादक भीमराव राऊत, कथाकार सी. आर. पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कवी, गायक प्रा. विजय बंडेवार यांनी आभार मानले.

टिप्पण्या