मराठी बालसाहित्यात मोलाची भर घालणारे ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांचा 'कष्टाची गोड फळे' हा बालकथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. यापूर्वी 'आणि हत्तीचे पंख गळाले' हा त्यांचा बालकथासंग्रह प्रकाशित आहे. तब्बल 30 वर्षांनी हा दुसरा कथासंग्रह बालवाचकांच्या भेटीला आलाआहे.
या संग्रहात 'कुत्रा अमर झाला' पुस्तकं वाचणारा किडा, चौघांचे प्रसंगावधान, वाचवले हजारोंचे प्राण, कष्टाची फळे गोड, मनातली भीती, करते फजिती, एजाज ठरला देवदूत, वृक्षमाता थिमक्का, फुकटचे विष? नको रे बाबा! ह्या आठ कथा आहेत. या कथांमध्ये वर्तमान वास्तव, सभोवतालचा परिसर, मुलांच्या ठायी असलेले गुणवैभव यांसह संकटकाळातील प्रसंगावधान राखणारी मुले भेटतात. बालकुमारांचे भावविश्व उजागर करणा-या ह्या कथा फारच छान फुलत, बहरत गेल्या आहेत.
'कुत्रा अमर झाला' या कथेत प्रामाणिकपणा आणि सावधपणा या गुणांसह प्रेम व स्पर्शाची भाषा आणि अविचारामुळे केलेली घाई याचे चित्रण आहे. हनुमान मंदिराच्या सभामंडपात एका कोपऱ्यात एक छोटे घुमटाकार मंदिर आणि त्यात कुत्र्याची सुबक मूर्ती पाहून शहरातून मामाच्या गावी आलेल्या राहूलला आश्चर्य वाटते आणि त्याच्या जिज्ञासेतून ही कथा जन्म घेते. तो आजोबांना याबाबत विचारणा करतो. आजोबा राहुलची उत्सुकता न ताणता कष्टाळू आणि मेहनती अशा एका अल्पभूधारक शेतकऱ्याने पाळलेल्या इमानदार कुत्र्याची गोष्ट सांगतात.
कर्जाने भाजून निघालेल्या शेतकऱ्याने आपला अतिशय देखणा, रुबाबदार, जीवाचा तुकडा असलेला हुशार कुत्रा तारण म्हणून सावकाराकडे ठेवला. कुत्रा तारण ठेवलेल्या सावकाराकडे चोरी होते. कुत्र्याच्या सावधपणामुळे सावकाराची चोरांनी चोरून नेलेली धनसंपत्ती मिळते. कुत्र्याच्या गळ्यात कर्जफेडीची चिठ्ठी बांधली जाते. कुत्रा शेतकऱ्याकडे परत येतो. कर्ज परतफेडची तजवीज काही झाली नाही. हा कुत्रा परत कसा आला? शेतकरी निराश होतो. अपराधीपणाची भावना त्याला सतावते. कुत्र्याने केलेला हा विश्वासघात आहे, असे वाटून तो कुत्र्याच्या डोक्यात काठीचा प्रहार करतो. वर्मावर घाव बसल्यामुळे कुत्रा गतप्राण होतो.
आजोबाने सांगितलेल्या या कहाणीने राहुल आणि धनंजय अवाक् होतात. पुढे हे गाव 'कुत्र्याचे सुनेगाव' म्हणून ओळखले जाते. गावकऱ्यांनी निर्णय घेऊन कुत्र्याला मारुती मंदिराच्या प्रांगणात स्थान दिले. राहुलच्या प्रश्नाला उत्तर मिळाले होते. मुक्या प्राण्यांना जीव लावणाऱ्या गावगाड्यातील माणसांचं चित्रण, मुके प्राणीसुद्धा ग्रामीण माणसांच्या जगण्याचा एक भाग होऊन जातात, याचं प्रत्ययकारी चित्रण डॉ. सुरेश सावंत यांची कथा करते.
'पुस्तकं वाचणारा किडा' ही एक ह्रदयस्पर्शी कथा आहे. या कथेत संवेदनशीलतेबरोबरच केशवच्या मनातील अपार करुणेचा हळुवार पदर उलगडत गेला आहे. केशव हा आई-वडलांचा एकुलता एक मुलगा. प्रकृतीने किडकिडीत. जेव्हा बघावं तेव्हा त्याच्या हातात पुस्तक. मुलं त्याला 'पुस्तकी किडा' म्हणून चिडवायचे. केशवने ही गोष्ट आईला सांगितली, तेव्हा आई म्हणाली,"अरे केशवा, पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.
तो करमणूक करतो. ज्ञान देतो. त्याच्या जगात नेतो आणि तो निरुपद्रवी मित्र आहे".
आईचे म्हणणे त्याला पटले. केशवला पुस्तकाव्यतिरिक्त तबला वाजवायचा छंद आहे. शाळेत गुरुजींनी मनाई केली होती. शाळेतल्या वाद्यावर धूळ चढली, तरी गुरुजी हात लावू द्यायचे नाहीत. केशव उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जातो. पाडाचे आंबे खातो. हरणाचे कळप पाहतो. मोकळे वातावरण अनुभवतो. तो माडीवर बसून तबला वाजवतो. तबला आईला वाजून दाखवावा, म्हणून तो जडशीळ तबला माडीवरून खाली आणताना निसटतो, फुटतो.
केशवच्या डोळ्याला अंधारी येते.
मामा रागावतील, आई रागावेल, याची त्याला भीती वाटते. फुटाणे फुटल्यासारखी आई तडतड करत होती. पण मामा म्हणाले, फुटलेला तबला मढवणं सोपी गोष्ट आहे. आता आपण दोन तबले तयार करू. केशवसाठी एक आणि माझ्यासाठी एक. कलेची साधना केली की मनावर ताण येत नाही, हा मामाचा विचार केशवच्या मनाच्या
तळघरात जाऊन बसला. पण तबला मढवायला हरणाचं कातडं पाहिजे असं कळल्यावर केशवची घालमेल झाली. त्याच्यासमोर शेतातली पाडसं नाचू लागली. त्याच्या आईची शिकार केल्यावर पाडसाचं कसं होणार? या विचाराने तो अस्वस्थ झाला.
तो रात्री झोपला असता त्याला स्वप्न पडलं. बंदुकीतून गोळी सुटली. हरणीची शिकार झाली. पाडसं अनाथ झाली. बापरे! अशीच आपली आणि आईची ताटातूट झाली तर? तो उठला. आईला घट्ट बिलगला आणि म्हणाला, "आई, आता मला तबला नको".
एका तबल्यासाठी एका हरणाचा जीव जातो. हरणाचा बळी देऊन मिळणारा आनंद मला नकोय. हे केशवचे बदललेले संवेदनशील रूप या कथेतून प्रतीत होते .
जसे आपण जगतो, तसेच या भूमीवर जगण्याचा प्राण्यांचा अधिकार आपण हिरावून घेऊ शकत नाही, हा भाव या कथेतून व्यक्त झाला आहे.
'चौघांचे प्रसंगावधान, वाचवले हजारोंचे प्राण' ही कथा टळलेल्या रेल्वे अपघाताची आहे. मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस परभणी जिल्ह्यातील पारवा गावच्या शिवारात अचानक थांबली. तिथे रेल्वेरुळांचा जोड निखळला होता. नितीन, ज्ञानेश्वर, राजू आणि पांडुरंग या चौघांनी गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. तुटलेल्या रुळावरून तपोवन एक्सप्रेस नेहमीच्या गतीने गेली, तर मोठा अनर्थ होऊ शकतो. भीषण अपघाताच्या कल्पनेने त्यांचे हात पाय थरथरू लागले. पांडुरंगची चड्डी लाल रंगाची होती. नितीन रुळाच्या मधोमध ठाम उभा राहिला. त्याने चड्डीचे बनवलेले निशाण दाखवले. प्रसंगावधान राखत रेल्वेचालक जळबा साधू आणि सहायक चालक मनोहर मुंजाजी यांनी गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. संभाव्य अपघात टळला. हजारोंचे प्राण वाचले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन या मुलांना गौरविण्यात आले. सामान्यातील असामान्य असलेले ते चौघे आज हिरो बनले होते. समयसूचकतेने आणि तत्परतेने त्यांनी साक्षात यमदूताला परत पाठवले होते.
'कष्टाची फळे गोड' ही कथा श्रमाला पर्याय नाही, ही शिकवण देते. कष्टाची भाकरीच सर्वश्रेष्ठ असते. पूजा ही परिश्रमाचीच केली पाहिजे. कष्टाने धन कमवावे व त्यातील हिस्सा थोडातरी इतरांना द्यावा. त्यातून मिळणारा आनंद हा परमोच्च असतो, अशी शिकवण ही कथा देते. रावबा व देवबा या दोन भावांच्या स्वभावातील फरक दाखवणारी ही कथा आहे. चोरी करणाऱ्या रावबाला शेवटी चोरी करण्याची शिक्षा मिळते. कायमचे अपंगत्व येते. कष्टाळू देवबाला मधुर फळे मिळतात. शेवटी देवबा आपल्या भावाला कष्टाने पिकवलेले आंबे स्वतःहून नेऊन देतो.
ही कथा कष्टाचे मोल सांगते. घामाने काळी माती फुलवण्याचं श्रमशास्त्र सांगते. पालथ्या घड्यावर पाणी, कुणी वंदा कोणी निंदा, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, पहिले पाढे पंचावन्न, येरे माझ्या मागल्या, जित्याची खोड मेल्याबिगर जात नाही अशा म्हणी आणि वाक्प्रचार यांचा चपखल वापर केल्याने कथा अधिकच वाचनीय झाली आहे.
'मनातली भीती, करते फजिती ' या कथेत पैलवानाची फजिती पाहायला मिळते. खुंटी धोतराच्या सोग्यावर मारली गेली आणि हिंमतवान पैलवान खचला. त्याची शुद्ध हरपली. मानसिकदृष्ट्या काही काळापुरता दुर्बल झाला. गावाकडच्या पारावरच्या गप्पा रंगवण्यात लेखक डॉ. सुरेश सावंत कमालीचे यशस्वी झाले आहेत. भुताचे पाय उलटे असतात. भुतं डोक्यावर पाय घेऊन चालतात. आवसंला भुतांची जत्रा भरते.
सीतानदीच्या डोहात आसरा असतात. हिवाळ्यात झाडाखाली शेकोटी पेटवून भुतं शेकत बसतात. आवसंच्या रात्री भुतं झाडं गदागदा हलवतात, अशा अनेक गावगप्पा भुतांच्या बाबतीत या कथेत आल्याने कथेला अधिक अद्भुतरम्यतेची आणि रंजकतेची किनार लाभली आहे.
'एजाज ठरला देवदूत' ही धाडसाबरोबरच माणुसकीचे दर्शन घडविणारी उत्कंठावर्धक कथा आहे. एजाज हा नांदेड जिल्ह्यातील पार्डी गावच्या राजाबाई हायस्कूलचा विद्यार्थी. त्याला शिक्षणात तेवढी आवड नसते, पण पोहायची भारी हौस! तो खूप चपळ होता. म्हणून मराठीचे सर त्याला 'चंचल पारा' म्हणायचे. वार्षिक स्नेहसंमेलनात त्यानं खेळाचं मैदान गाजवलं होतं. पार्डी गावात नेहमीच पाणीटंचाई. त्यावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून व श्रमदानातून छान बंधारा बांधला आणि गाव पाणीदार झाला.
उन्हाळ्यात बंधाऱ्यावर धुणे धुण्यासाठी बायका-मुली जात. एका दिवशी आफरीन बेगम, तबस्सूम, सुमय्या आणि अफसर या मुली धुणं धुवायला गेल्या. पाण्यात खेळ खेळत दंगामस्ती केली. सुमय्याचा पाण्यातील दगडावरून पाय निसटला. तिच्या मदतीला जात असताना तिघीपण बुडाल्या. बघ्यांची गर्दी झाली, पण एजाज देवदूत होऊन धावून आला. प्रयत्नांती त्यानं चौघींनाही बाहेर काढलं, परंतु आपण अफसर आणि सुमय्याला वाचवू शकलो नाही, याचं दुःख एजाजला वाटत होतं. सरपंच, तहसीलदार यांनी त्याचं कौतुक केलं. भारत सरकारने बालशौर्य पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. दोन मुलींचे जीव वाचवणारा एजाज बालकुमारांच्या समोर आयडॉल बनून उभा राहतो. या कथेत लेखकाने गावगाड्याचे वर्णन करताना एजाजच्या अंगभूत गुणांचेही कौतुक केले आहे.
शाळेत जाऊन शिक्षण घेऊ शकलो नाही तरी जीवनाच्या शाळेत खूप काही शिकता येतं. जीवनाला बळकटी देता येते. अनुभव हाच मोठा गुरु असतो. जगण्याची दृष्टी शिक्षणाशिवायही येऊ शकते, याचं चिंतन करणारी 'वृक्षमाता थिमक्का' ही कथा आहे.
कर्नाटक राज्यातील कोडूर गावच्या सालुमरादा थिमक्का यांच्या जिद्दीची ही थक्क करणारी कहाणी आहे. थिमक्का आणि चिकय्या या जोडप्याला मूलबाळ झालं नाही, पण त्यांनी झाडांनाच आपली मुलं मानली. अनेक झाडं लावली आणि वाढवली. हे जोडपं झाडांचं संगोपन करू लागलं. हा नेत्रदीपक प्रवास कसा झाला, याची रंजक गोष्ट या कथेमध्ये आहे.
कोडूर ते हुलिकल या महामार्गावर हिरवीगर्द वडाची झाडी आज दिसते, त्याचे श्रेय फक्त थिमक्काचे! मागील ऐंशी वर्षात 8385 झाडे तिने लावली. एका अडाणी स्त्रीने आपल्या हटके कामामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. वनमित्र, वृक्षप्रेमी, वृक्षश्री, निसर्गरत्न, पद्मश्री, डॉक्टरेट,
पर्यावरणदूत, राष्ट्रीय नागरी सन्मान, कर्नाटक कल्पवल्ली पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्या सन्मानित आहेत .
ही विश्वमाता प्रश्न विचारते, "मी माझ्या मृत्यूनंतर मागे ही झाडे ठेवून जाणार आहे. तुम्ही काय ठेवून जाणार आहात?" आपणाला निरूत्तर करणारा हा यक्षप्रश्न आहे. ही कथा पर्यावरणसंरक्षण आणि पर्यावरणसंवर्धनाची शिकवण देते.
संग्रहात शेवटची कथा आहे 'फुकटचे विष? नको रे बाबा!' या कथेत कांबळे सरांच्या मेहनतीचे, त्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे, केलेल्या प्रयोगांचे आणि त्यांच्या शिस्तीचे चित्रदर्शी वर्णन आहे.
हवेचे, पाण्याचे आणि जमिनीचे प्रदूषण याविषयी विद्यार्थ्यांनी सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. वाहनातून कार्बन मोनाॅक्साईड वायू बाहेर पडतो. भरमसाठ रासायनिक खतांमुळे माती प्रदूषित होते. पॉलिथिन आणि प्लास्टिकच्या अतिवापराने अस्थमा आणि कॅन्सरसारखे दुर्धर रोग होतात. पॉलिथिन नैसर्गिक नसून कृत्रिम आहे. पॉलिथिनचे विघटन लवकर होत नाही. पाॅलिथिन म्हणजे आधुनिक भस्मासुर आहे, याविषयी गंभीर इशारा या कथेतून दिला आहे.
या संग्रहात आठ कथा असून त्यात डॉ. सावंत सरांनी वेगवेगळे जीवनाभिमुख विषय हाताळले आहेत. डॉ सावंत सरांनी या कथा आत्मतत्वाला अभिवादन करून लिहिलेल्या आहेत. धावपळीच्या आजच्या काळात बालकुमारांच्या जीवनातील 'गोष्ट' हरवली आहे. हरवलेली ही गोष्ट शोधून द्यायचे काम ह्या संग्रहाच्या माध्यमातून लेखकाने केले आहे. या कथांमधून मुलांच्या मनाची चांगली मशागत होते. या कथा वास्तवाधारित आहेत. कथेतून येणारे संवाद पीळदार आहेत. कथांची शीर्षकं सूचक आहेत. कथेची निवेदनशैली अतिशय परिणामकारक आहे. कथेतील आशय नेमका असून भावी जीवनासाठी दिशादर्शक आहे. या कथेत मानवी मूल्यांचे दिशादिग्दर्शन आहे. मनोरंजनाबरोबरच संस्कारांची शिदोरी देणा-या डॉ. सावंत सरांच्या लेखणीला सलाम!
'कष्टाची फळे गोड' (बालकथासंग्रह)
लेखक : डॉ.सुरेश सावंत
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ व सजावट : संतोष घोंगडे
आर्ट पेपरवरील रंगीत पृष्ठे: 72
किंमत : रु. 180
addComments
टिप्पणी पोस्ट करा