विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही,
पेटेन उद्या नव्याने ,हे सामर्थ्य नाशवंत नाही.
येतील वादळे ,खेटेल तूफान,तरी वाट चालतो,
अडथळ्याना भिऊन अडखळणे ,पावलाना पसंत नाही....."
असे धडाडी व्यक्तिमत्व,
मायेच्या पंखातून उंच भरारी घेत असताना अचानक आम्ही जमिनीकडे भिरकावले गेलो.आज आमच्या जीवनामधील अत्यंत विदारक क्षण आला आहे. सकाळी 6.52 मिनिटांनी दि.8/12/ 2023 रोजी आमचे दादा आम्हाला सोडून निघून गेले आणि आमच्या मनात भीतीचे काहूर उठले. अनंत वेदनांचे विचार चक्र फिरायला लागले.
त्यांच्या जीवनातील अनेक आठवणींचा सागर उचंबळून आला. त्या क्षणी आमच्या मनात उमटलेल्या लाटांना शब्दांमध्ये बंदिस्त करणे अशक्य झाले. अश्रूचे बांध फुटले. अवघे आसमंत जणू रडू लागले. त्यांच्या जीवनातील एकेक आठवण नजरेसमोर तरळू लागली. आम्ही पोरके झालो.
आमचे दादा म्हणजे एक संघर्षमय जीवनाची गाथा आहे. एका भिक्षुकी कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात विवंचनेचे धागे एखाद्या जाळ्याप्रमाणे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयावर पसरलेले होते. परंतु प्रखर
तेजाने व अदम्य इच्छाशक्तीने त्यावर मात करण्यासाठी हा चिमुकला जीव वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील मंदिरात पुजारी म्हणून काम करू लागले. त्या काळात सूर्यनारायण महाराज, भगवान भारती महाराज, दत्ताराम महाराज यांचा सहवास त्यांना लाभला. अध्यात्मातून जीवन दृष्टिकोन बाळगण्याचे बाळकडू त्यांना लाभले. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मठांमध्ये राहून शिक्षण घेतले. केदारगुडया मध्ये वास्तव्य करत असताना परिसरातील अंध आदिवासी मुलांना संध्याकाळी कंदीलाच्या प्रकाशात ते शिक्षण देत असत.
तो काळ मराठवाडा मुक्ती संग्रामाचा धगधगता काळ होता. सगळीकडे जाळपोळ हाणामाऱ्या लूट व दुष्काळाचे थैमान चालू होते. त्यातच पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना पालम (तालुका गंगाखेड) येथे त्यांच्या वडिलांनी पाठवले. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये आमच्या दादाचे वडील गणपतभारती व चुलते गोपाल भारती यांचा सहभाग होता. मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढयामध्ये त्यांची पिंपरखेड येथील स्थावर मालमत्ता नष्ट झाली व परत गावी आल्यानंतर शून्यातून संसार उभा करावा लागला. गोवा मुक्तिसंग्रामामध्ये आमच्या दादांनी सन 1961 मध्ये बामणीचे देसाई पालकर, बी.के.देशमुख ,गजेंद्र भारती ,शारंगधर महाराज वगैरे लोकांसोबत त्यांनी सहभाग घेतला. सन 1960 मध्ये त्यांनी ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची निकड लक्षात घेऊन पिंपरखेड येथे समर्थ विद्यालय शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यासोबतच बाहेर गावावरून येणार्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व राहण्याची सोय व्हावी यासाठी वसतिगृहाची स्थापना केली. पूर्वी शाळा शिक्षक मिळत नव्हते म्हणून समवयस्क सहकार्याला घेऊन शिकविण्याचे कार्य पार पाडले. त्यांना प्रत्येक क्षणी विकासाचा ध्यास असायचा ते नेहमी कार्यरत असायचे. माननीय शंकरराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी एकनिष्ठने काँग्रेसचा प्रचार व प्रसार केला. ते साहेबांचे विश्वासू कार्यकर्ते होते त्यांच्या सानिध्यात मा. रत्नाप्पा कुंभार, {सहकार महर्षी} शिवाजीराव देशमुख, श्यामराव पाटील ,बाळासाहेब विखे पाटील, माननीय विलासराव देशमुख, माननीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. माननीय विठ्ठलराव देशमुख माननीय शंकरराव देशमुख माननीय माणिकराव टाकळगव्हाणकर अशा नेत्यासोबत काम केले. हदगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन म्हणून कार्यभाग सांभाळत असताना महाराष्ट्र राज्याचा प्रथम खरेदी-विक्री संघाचा बहुमान त्यांना मिळाला. हदगाव खरेदी-विक्री संघाच्या विस्तारात माननीय आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांच्यासोबत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते. हदगाव तालुक्यात राम भारती पिंपरखेडकर व बापूराव पाटील आष्टीकर यांचे समीकरण होते. माननीय सूर्यकांताताई पाटील माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्या समवेत सहकारी म्हणून काम करत असताना हिमायतनगर, किनवट व हदगाव तालुक्यात हुतात्मा जयवंतराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून काम केले. सूर्यकांताताई पाटील या त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानत होत्या. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक , शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्य केले. त्यांचे परममित्र अष्टीकर साहेब गेल्यानंतर मात्र नागेश पाटील यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी पितृवत कार्य केले. हदगाव येथे कै. गणपतभारती वैद्यकीय शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ते शिक्षण क्षेत्रामध्ये अविरत कार्य करत होते. त्यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून दीनदलित लोकांचे कैवारी म्हणून केलेल्या कामाबद्दल त्यांना शासनामार्फत " दलित मित्र " ही पदवी प्रदान करण्यात आली. जिल्हा परिषद नांदेड मध्ये काम करत असताना व वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मतदारसंघात निमगाव, कोळी येथे ग्रामीण रुग्णालये आणली व शासनाच्या सवलती मिळवून देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र मध्ये गोसावी समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. महाराष्ट्र दशनाम गोसावी संघटनेची स्थापना करून महाराष्ट्रात जिल्हावार संघटना स्थापन करून विभागीय मेळावे घेतले. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड येथे सभा घेऊन नंतर नाशिक, कन्नड, पुणे, अहमदाबाद, सुरत, ऋषिकेश, अलाहाबाद, भोपाळ, इंदोर या ठिकाणी गोसावी समाजाचे मेळावे घेतले. मोठ्या प्रमाणात समाजाचे मेळावे घेऊन समाज बांधणी केली.
माननीय नामदार वसंतराव नाईक मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या काळात स्थापन झालेल्या भटक्या विमुक्त राज्यस्तरीय महामंडळावर त्यांनी काम केले. तत्कालीन दशनाम गोसावी समाजातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शासनाकडून दशनाम गोसावी या नावाने प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला शासन निर्णय काढण्यास भाग पाडले. गोसावी समाजाच्या उत्थानासाठी दशनाम गोसावी सेवक, हे मासिक त्यांचे बंधू शिवकरण भारती , सदानंद भारती तसेच प्राध्यापक सुरेश पुरी नांदेड यांच्या माध्यमातून चालवले. भारतातील दशनाम आखाडे, मठ यांना एकत्रित करून त्यांची माहिती संकलन करण्याचे काम करून ते नरसिंह गिरजी महंत सुरत यांच्या मासिकांमधून ते प्रसिद्ध करण्यात आले. हरिद्वार ऋषिकेश येथे आखाड्यामध्ये महामेळावा आयोजित केला होता यावेळी भारताचे ऍटर्नी जनरल आनंद देवगिरी जी तसेच राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांची कन्या उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील गोसावी समाजाच्या बांधवावर अन्याय अत्याचार झाल्यास त्याला वाचा फोडण्याचे व न्याय मिळवून देण्याचे काम दलित मित्र रामभारती यांनी केल्यामुळे त्यांना समाजाने समाजभूषण ही पदवी बहाल केली. त्यांनी कर्नाटक ,मध्यप्रदेश, हरियाणा, विदर्भ, उत्तर प्रदेश विभागांमध्ये सोयर संबंध जोडले आहेत.भारती घराण्याचे संबंधित 1000 पर्यंत अनुयायी आहेत.
दादांचे नेहमीचे प्रत्येकाला आधार देणारे "मी आहे ना..... " हे शब्द सतत आमच्या जीवनाला प्रोत्साहित करत राहतील. त्यांच्या मार्गदर्शनाची दिलेली शिदोरी घेऊन आमचा पुढचा प्रवास हा त्याच मार्गाने आमच्या सर्व कुटुंबीयांच्या वतीने चालवण्याचा निर्धार करून शब्दसुमनाने त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहोत......
डॉ. अर्चना राम भारती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा