शुभम थोरात व रामजी कश्यपला सामनावीर पुरस्कार
भुवनेश्वर, २५ डिसेंबर: अल्टीमेट खो-खो चा सीझन दोन कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुर आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने अमित बर्मन यांनी सुरु केलेली ल्टीमेट खो खो पहिल्या सीझनमध्ये जबरदस्त हिट ठरली होती जी भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिव्हिजन प्रेक्षकसंख्येच्या दृष्टीने बिगर क्रिकेट स्पर्धा म्हणून उदयास आली. अल्टीमेट खो-खो हि पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला यूके स्थित बीएनपी ग्रुपने निधीची उपलब्धता करून दिली आहे. अल्टीमेट खो-खो चे सर्व सामने दररोज सायंकाळी ७.३० पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव अॅपवर थेट पहाता येतील. आजच्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने राजस्थान वॉरियर्सचा जोरदार धुव्वा उडवत शानदार विजय नोंदवला. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने तेलुगू योद्धासचा ६ गुणांनी पराभव केला. आजच्या सामन्यांमध्ये शुभम थोरात (गुजरात जायंट्स) व रामजी कश्यपला (चेन्नई क्विक गन्स) सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण घेत गुजरात जायंट्सला संरक्षण करण्यास आमंत्रीत केले. या सामन्यात गुजरात जायंट्सने राजस्थान वॉरियर्स ४१-३० (मध्यंतर २३-१४) असा ११ गुणांनी धुव्वा उडवला. गुजरातच्या पहिल्या तुकडीने जवळजवळ पावणे तीन मिनिटे संरक्षण केले. या तुकडीत कर्णधार अक्षय भांगरेने उत्कृष्ट संरक्षण केले तर दुसरी तुकडीने (शुभम थोरात, अभिनंदन पाटील आणि अक्षय भांगरे) जवळजवळ तीन मिनिटे संरक्षण करत ड्रीम रणचा एक गुण सुध्दा वसूल केला. या पाळीत राजस्थान वॉरियर्सने ३ आकाशीय सूर मारत व १ स्तंभात खेळाडू बाद करत १४ गुण वसूल केले. दुसऱ्या पाळीत गुजरात जायंट्सने पावणे तीन मिनिटात १२ गुण वसूल करत सामन्याचा निकाल ठरवून टाकला. या पाळीत जगन्नाथ मुर्मूने नाबाद राहत राजस्थानची पडझड थांबवल्यामुळे गुजरातला दुहेरी अंकात बढत घेता आली नाही. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा राजस्थानने जोरदार मुसंडी मारण्याचा केलेला प्रयत्न गुजरात जायंट्सने उधळून लावला व या पाळीत गुजरातने ड्रीम रणचे दोन गुण वसूल केले तर राजस्थानने १६ गुण मिळवत टक्कर देण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या पाळीत गुजरातने जोरदार आक्रमण करत राजस्थानची दमछाक करत सहज विजयाकडे वाटचाल सुरु केली. या पाळीत १८ गुणांची कमाई करत शानदार विजय नोंदवला. या सामन्यात शुभम थोरातला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आज झालेला स्पर्धेतील चौथा सामना होता चेन्नई क्विक गन्स व तेलुगू योद्धास या दोन मातब्बर संघात. या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने तेलुगू योद्धासचा ३८-३२ (मध्यंतर २१-१४) असा ६ गुणांनी पराभव केला. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम आक्रमण करत तेलुगू योद्धासची दमछाक करत पहिल्या डावात ड्रीम गुणांसह २१ गुण मिळवले. या डावात रामजी कश्यपची खेळी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. तर तेलुगू योद्धासला पहिल्या डावात १४ गुणांचीच कमाई करता आली. या सामन्यात चेन्नईच्या रामजी कश्यपने (२.४३ मि. संरक्षण व १४ गुण) अष्टपैलू खेळ करत विजयात महत्वाची कामगिरी केली. वजीर दुर्वेश साळुंकेनेही 10 गुण मिळवत चेन्नईला पहिला विजय मिळवून दिला व चेन्नई क्विक गन्सने ड्रीम रन्सचे चार गुण वसूल केले. तर या सामन्यात तेलुगू योद्धासने ड्रीम रन्सचे २ गुण मिळवले. अखेर चेन्नई क्विक गन्सने आपले विजयाचे खाते उघडले.
मंगळवारी गुजरात जायंट्स मुंबई खिलाडीशी भिडतील तर ओडिशा जगरनॉट्सचा चेन्नई क्विक गन्सचा सामना करतील
addComments
टिप्पणी पोस्ट करा