नांदेड - शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत 'सहल' या उपक्रमामुळे प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देता येतात. तसेच सहलीमुळे बालकांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, असे मत जवळा (दे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी व्यक्त केले. यासाठी बंदिस्त भिंतीच्या आतील अभ्यासक्रम एक दिवस टाळून सहलीचे आयोजन करण्यात येते. म्हणूनच जवळा (दे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची सहल हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आयोजित करण्यात आली होती.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ढवळे बोलत होते. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग हे जग प्रसिद्ध आहे. येथील प्राचीन कला कौशल्य, पुरातन काळ्या दगडात कोरलेले हेमाडपंथी मंदिर, मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा, हत्ती, घोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे कोरीव काम, मंदिरात प्रवेश करण्यासाठी, मुख्य तीन दरवाजे, मंदिराचा भूगर्भातील मुख्य भाग, परिसरातील बगिचा, टेकड्या आदींची माहिती घेतली. यावेळी सहशिक्षक संतोष घटकार, विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर, प्रभु ढवळे, कोंडदेव हटकर, अनुरत्न वाघमारे, कपिल मुळे, सुमेध मुळे आदींची उपस्थिती होती.
सहलीच्या निमित्ताने एखाद्या विशिष्ट ठिकाणची भौगोलिक तथा ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी जवळा येथील जि. प. शाळेच्या मुलांनी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणांशी संबंधित माहिती मिळवली. प्रत्येक ठिकाणचे वेगळे महत्त्व असते. यामुळे निरीक्षणे तथा माहितीचे संकलन आणि सारणीकरण हे कौशल्य आत्मसात करता आले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यास आणि त्यांना बाहेरील जगामध्ये खऱ्या आनंदाची ओळख करून देण्यास मदत झाली. यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यानिमित्ताने सहभोजनाचा आनंदही मुलांनी घेतला. तसेच शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी कसे पालन केले पाहिजे याचे खरेखुरे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी घेतले. बगिचाच्या बाजूला तलाव असल्याने त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक होती. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्यास सक्त मनाई केली गेली. सहलीच्या स्थळांचे पावित्र्य टिकविणे, कुठलीही नासधूस करु नये, आपल्यासोबतचा कचरा कचराकुंडीतच टाकणे आदी सूचनांचे विद्यार्थ्यांनी तंतोतंत पालन केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा