ललित अधाने यांची क्रांतिकारी कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

'माझी गोधडी छप्पन भोकी' ह्या संग्रहातील ललित अधाने यांची कविता ही अग्निसंप्रदायी कविता आहे. स्वातंत्र्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाची शोचनीय शोकांतिका होऊन गेली आहे. किसानपुत्रांनी आपल्या शेतकरी बापाच्या पंक्चरलेल्या आयुष्याची वाताहत जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. त्या विरोधात प्रतिकार आणि प्रतिरोध करण्यासाठी कवीने आपली लेखणी परजलेली आहे. 

ह्या कवितेच्या ओळीओळींतून विखारी वेदनेची ठसठस व्यक्त झाली आहे. 

कवीने एका हातात रुमणं आणि दुसर्‍या हातात लेखणीचे हत्यार घेऊन विद्रोहाचे बिगुल फुंकले आहे. अशा परिस्थितीत शेतीच्या सगळ्या अवजारांची शस्त्रं झाली आहेत.

ललित अधाने यांची कविता ही शेतीमातीचा अस्वस्थ हुंकार आहे. 'गाऊ क्रांतीची गाणी' हा तिचा बीजमंत्र आहे.

कवितागत नायकाने सहा महिने शेती करण्याचा आणि उर्वरित सहा महिने प्रतिकूल परिस्थितीविरोधात युद्ध करण्याचा एल्गार पुकारला आहे. 

कवीला 'इंडिया' आणि 'भारत' यातील वाढत चाललेली दरी मिटवायची आहे.

'आता आमच्या मस्तकात पेटलेत लाखो सूर्य' हा कवीचा आणि एकूणच किसान समुदायाचा आत्मप्रत्यय आहे. 

ही कविता शेतकऱ्यांच्या 'मन की बात' बोलते. ही कविता कृषिवलांची दु:खं अधोरेखित करते.

ललित अधाने यांची कविता पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली मेंदूतली गुलामी खोदून काढते.

ही कविता परिवर्तनासाठी क्रांतीचे चौघडे वाजवते. या कवितेत पीडितांना परिवर्तनासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे आणि शोषकांना खुले आव्हान दिले आहे. आजवर शेतकऱ्याची गोधडी छप्पन भोकीच असणार, हे सगळ्यांनीच मान्य केले होते, पण आता शेतकऱ्यांच्या दांडातलं पाणी पेटलं आहे. सगळे कास्तकार आता तुफानाचे धनी झाले आहेत. आता त्यांनी फास लावणा-या शोषकांना फाशी देण्याची तयारी केली आहे. ह्या कवितेतलं रानपाखरूसुद्धा सीमोल्लंघन करण्याची भाषा बोलते आहे. 

कालबाह्य रुढी, प्रथा, परंपरांचे तण कवीने उपटून फेकले आहे.

ह्या कवितेत रुद्रवीणा, तुतारी, शंखनाद अशी सगळी रणवाद्ये वाजत आहेत.

ललित अधाने यांची कविता अतिशय टोकदार आणि धारदार आहे. या कवितेने समूहस्वर बरोबर पकडला आहे. या कवितेचे भविष्य उज्ज्वल आहे! 

  • माही गोधडी छप्पन भोकी (कवितासंग्रह) 
  • कवी : प्रा. डॉ. ललित अधाने 
  • मुखपृष्ठ : सरदार जाधव 
  • प्रकाशक : अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे 
  • पृष्ठे : १६० किंमत रु. ३००
  • डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 
  • sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या