मी एक बालकवितासंग्रह नुकताच वाचलेला आहे. त्याचे नाव 'काठीचा घोडा' असे आहे. त्याचे कवी डॉ. सुरेश सावंत आहेत. सावंतसर हे एक शिक्षक व मुख्याध्यापक होते. ते एक सुप्रसिद्ध बालसाहित्यकार आहेत. 'काठीचा घोडा' हा लहान मुलांचा एक खेळ असतो. खेड्यातील मुले वेगवेगळे खेळ खेळत असतात. कुणी सायकलचे टायर, कोणी ताराची सायकल, एक लांब काठी दोन्ही पायात धरून खेळतात. त्याला 'काठीचा घोडा' असे म्हणतात. आमच्याकडे त्याला 'लाकडाचा घोडा' असेही म्हणतात. या खेळाचे नाव कवीने आपल्या कवितासंग्रहाला दिले आहे. संग्रहाचे नाव वाचून त्यातील कविता वाचण्याची ओढ निर्माण होते. या संग्रहात एकूण तीस कविता आहेत.
'चिऊताईचे लग्न' ही कविता मला खूप आवडली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पिवळ्या चिमण्या दिसल्या, तर चिमणीचे लग्न झाले, असे आम्ही मैत्रिणी म्हणत असतो. एकदा एका चिऊचे लग्न ठरले. त्यात नवरदेवाने विघ्न काढले, मला हुंडा हवा म्हणून. नवरदेव असलेल्या चिमण्याला भाताचा हंडा दिला, तरी तो हुंड्यावरच अडून बसला. लग्न मोडण्याची वेळ आली. चिऊताई रडायला लागली. मोरभाऊ तिची समजूत काढतो, तेव्हा चिऊताईने हळूच पोलिसांना फोन केला. पोलीस वाघोबा धावत आला आणि चिमण्याला दंडा दाखवत मनाला, "देऊ का हुंडा?"
तेव्हा चिमणा घाबरून शरण आला आणि चिऊताईचे लग्न झाले.
कवीने ज्वलंत सामाजिक प्रश्नावर आधारित ही कविता केली आहे. खरंच आज समाजात हुंड्यामुळे असे अनेक लग्न मोडत आहेत. हुंड्यासाठी आईवडलांना आपले शेत विकावे लागते. काही वर्षे आपल्या घरादारापासून दूर कामाला जावे लागते. म्हणून मला वाटते की हुंडा प्रथा कायमची बंद झाली पाहिजे.
'मोरपीस' ही कविता फारच मजेदार आहे. कवीने बेच्या पाढ्याची कविता केली आहे:
'बे एक बे
बे दुणे चार
बुंदीचे लाडू
गोड झाले फार'
दिवाळीची मौजमजा कवीने पाढ्यातच वर्णन केली आहे. लाडू हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. दिवाळीत माझ्या मैत्रिणी मला फराळासाठी बोलवतात, तेव्हा गोडगोड पदार्थांनी माझे ताट भरून जाते. फटाक्यांच्या आवाजांनी सारा गाव घुमतो. याचा पक्ष्यांना खूप त्रास होतो आणि प्रदूषणही होते. म्हणून फटाके न वाजवता दिवाळी साजरी केली पाहिजे, असे मला वाटते. आमच्या रमजानमध्येही खूप गोडगोड पदार्थ आम्ही बनवत असतो. जणू आमची ती दिवाळीच असते. मला ही कविता खूपच आवडली.
'स्वप्नातील गाव' ही कविता खूप सुंदर आहे. या गावात बिस्किटाचे वाडे आहेत. प्रत्येकाच्या अंगणात पैशाची झाडे आहेत. हवे तेव्हा झाडाचे पैसे तोडून घ्यायचे! किती सुंदर होईल बरे असे झाले तर! घरी काही मागितले, तर पैशाचं झाड लागले का? असे म्हणतात. म्हणून जर अंगणात पैशाचं झाड असेल, तर जे पाहिजे ते घेता येईल. त्या गावात आईस्क्रीमचे तळेच आहेत. तळ्यामध्ये चॉकलेटची कमळे आहेत. खरोखरच माझ्याही गावात हे सगळे असेल, तर किती मज्जा येईल! कवितेतील गावात तर शाळाच नाही. मुले मौज मज्जा करत गावभर भटकत असतात. म्हणून कवी म्हणतो..
'शोधू नका आसपास
असा छान गाव
खराखुरा नाही बरं
स्वप्नात होता राव'.
म्हणून शाळा ही प्रत्येक गावात असलीच पाहिजे. त्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते. चांगले संस्कार होतात.
'पाऊस' या कवितेत पावसाळ्याच्या दिवसाचे वर्णन कवीने खूप छान केले आहे!
'रिमझिम रिमझिम
पाऊस येतो
पुस्तक पाटी
भिजवून जातो'.
मला पावसाळ्यात भिजायला खूप आवडते. पावसात दप्तर भिजून जाते आणि पावसाळ्यात थंड हवा सुटते. गारा पडतात. मला गारा वेचायला खूप आवडतात. कागदी जहाजांचा खेळ रंगतो. खूप मोठा पाऊस पडला, तर शाळेला सुट्टी मिळते. म्हणून मला पावसाळा ऋतू खूप आवडतो.
ह्या संग्रहाचे नाव असलेली 'काठीचा घोडा' ही अशीच मस्त कविता आहे. या कवितेत एक छोटा मुलगा म्हणतो की मला मोटारगाडी हवी. बाबांची स्कूटर कधी कधी रुसते. कितीही पाय मारा अडूनच बसते'. आकाशातील विमान पाहून पाहून मान दुखत असते. शाळेची वेळ झाली की सायकलची हवाच निघून जाते. आगगाडीमधून खूप धूर निघत असतो आणि तिच्या शिट्टीने तर कानठळीच बसते, म्हणून कवी म्हणतो..
'प्रत्येकात दोष आहे थोडा ना थोडा
सगळ्यात छान माझा काठीचा घोडा'.
प्रत्येक वाहनात काही ना काही दोष असतो, म्हणून 'काठीचा घोडा' यातून ना धूर निघतो, ना तो रुसून बसतो, ना कानठळी बसते , ना हवा जाते म्हणून सगळ्यात छान 'काठीचा घोडा' आहे, असे त्या लहान मुलाला वाटते.
या कवितेवरून मला एक गाणं आठवलं.
'लकडी कि काठी , काठी का घोडा
घोडे पे दुम पे जो , मारा हातोडा
घोडा दौडा, दुम उठाके दौडा'.
हे गीत म्हणत आम्ही लहानपणी खूप खेळ खेळायचो. आता लहान मुले असे खेळ खेळत नाहीत. फक्त मोबाईल पाहत बसतात. मोबाईल पाहाणे हा एक आजार झालाय की काय असे मला वाटते. त्यामुळे डोळ्यावर खूप मोठा परिणाम होतो.
'जंगलचे राज्य' या कवितेत कवी म्हणतो
'जंगलाच्या जीवांचे राज्य पाहा कसे
सुखाने राहतात सख्खे भाऊ जसे'.
जंगलामध्ये अनेक पशु, पक्षी, झाडे, झुडपे असे सजीव मोठ्या संख्येने राहतात. जसे सख्खे भाऊ राहतात, अगदी तसेच ते जंगलात राहत असतात. शेळी वाघाला बघताच घाबरून पळत सुटते. इथे तर वाघ आणि शेळी एकाच तळ्यावर पाणी पितात. सिंह आणि उंदराची छान जोडी जमली आहे. सशाला खेळायला सारे रान मोकळे आहे. लबाडी करणारा कोल्हा येथे इमानदारीने राहतो. फुलांचा आणि फळांचा वास दरवळत असतो. सगळ्यात महत्त्वाचं हे की कधीच कोणी झाडे तोडत नाही. त्यामुळे जंगल दरवर्षी वाढतच राहते, म्हणून कवी म्हणतो....
'चला चला दोस्तांनो, त्यांचे राज्य पाहू
आपणही त्यांच्यासारखे एकोप्याने राहू'.
जंगलातील प्राणी एकोप्याने राहत आहेत, पण मानव कधी एकोप्याने राहणार? घराघरात, भावाभावात, त्यांच्या बायकात भांडणं, गावागावात समाजा- समाजात भांडणं, राज्याराज्यात भांडणं, देशादेशात भांडणं. याचं एक ताजं उदाहरण म्हणजे रशिया आणि यूक्रेनचं युद्ध. म्हणून एकोप्याने राहणं हाच एक उत्तम मार्ग आहे, असे मला वाटते.
या संग्रहात चिव चिव चिमणी, पक्ष्यांची शाळा, ढगांचा हत्ती, बगळ्यांची सभा, हत्तीराव, चांदोबा, ससोबा, बेडूकराव, असा एक राजा, शाळा, रडका राजू , बिनबुडाचे झाड, उन्हाळ्याची सुट्टी , वाढदिवस, पोपटदादा, अशा खूप सुंदर सुंदर कविता आहेत.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप भारी आहे! यात एक मुलगा 'काठीचा घोडा' हा खेळ खेळत आहे. त्यावर विमान, मोटार, गाडी, स्कूटर आणि सायकल यांचीही चित्रं आहेत. प्रत्येक कवितेवर कवितेला अनुसरून अशी खूप सुंदर चित्रं रेखाटली आहेत. आतील चित्रे व मुखपृष्ठ शीतल शहाणे यांनी रेखाटले आहेत. त्यामुळे काव्यसंग्रह अधिकच सुंदर झाला आहे. सुप्रसिद्ध कवी-गीतकार शांता शेळके यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण लिहिलेली आहे. त्यात त्यांनी 'काठीचा घोडा' या संग्रहातील बालगीतांत सुरेश सावंत यांनी बालमनाशी सुरेख संवाद साधला आहे', असे म्हटले आहे. मला हे पुस्तक खूप आवडले!
- बालकवितासंग्रह:- 'काठीचा घोडा'
- कवी :- डॉ. सुरेश सावंत
- प्रकाशन :- निर्मल प्रकाशन नांदेड
- पृष्ठे :- ३२
- मूल्य:- ३० रु. ____________________________
- नाव :- कु. शेख उजमा शमशोद्दीन
- वर्ग :- आठवा
- शाळा:- श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येवती ता. मुखेड जि. नांदेड.
addComments
टिप्पणी पोस्ट करा