लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोगकेंद्रातर्फे मागील १० वर्षांपासून मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येतो. अलीकडे त्रैमासिकाच्या स्वरूपात हा अंक वाचकांच्या भेटीला येत असतो. 'मनशक्ती' बालकुमारचा दहावा दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला आहे. मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. वर्षा तोडमल ह्या मनशक्तीच्या संपादक असून दीपक आलूरकर हे कार्यकारी संपादक आहेत. 'प्रकाश पेरत जाऊ' ह्या त्यांच्या संपादकीय लेखात ह्या अंकाचे सारसर्वस्व साठलेले आहे. ७४ पृष्ठांच्या ह्या आकर्षक अंकात बालकुमारांसाठी १५ कथा, ४ लेख, ५ कविता आणि १ उपक्रम असा भरगच्च वाचनीय मजकूर दिला आहे
स्वामी विज्ञानानंद हे 'मनशक्ती'चे संस्थापक. स्वामी विज्ञानानंद यांचे संपूर्ण लेखन म्हणजे संस्कारांचा खजिना. 'देवाचा न्याय' ही त्यांची पहिलीच कथा चांगल्याचे चांगले आणि वाईटाचे वाईटच होते, हा संदेश देऊन जाते. माधुरी पुरंदरे यांची 'मांजराला हवा एक मित्र' ही कथा मोठी रंजक आहे. प्रवीण दवणे यांची 'रात्रीचा दिवस' ही कथा कष्टाळू विद्यार्थी आणि मातृह्रदयी शिक्षिकेचे भावबंध उलगडून दाखविते. मुलांना आजीआजोबांचे प्रेम मिळाले पाहिजे, हा विचार देणारी रेणू गावस्कर यांची 'आजोळ' ही कथा मोठी ह्रदयस्पर्शी आहे.
बालभावविश्व उजागर करणारी रेणू दांडेकर यांची 'चिमुकलं पिल्लू' ही कथा प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकविते.
दुर्गा भागवत यांच्या कथेत मनोरंजन आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ असतो. 'वानर आणि मगर' हीसुद्धा चिरकाल स्मरणात राहील, अशी गोष्ट आहे. 'अहमदचे अवयवदान' ह्या माझ्या कथेत मी जातिधर्माच्या पलीकडे जाण्याचा आणि अवयवदानाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मनशक्तीचे प्रकाशक प्रमोदभाई शिंदे यांची 'एकाग्रता यशोबीजम्' ही कथा एकाग्रतेचे महत्त्व अधोरेखित करते. एकाग्रतेमुळे स्मरणशक्ती वाढते, मेंदूची क्षमता वाढते, हे वाघाच्या कथेतून पटवून दिले आहे.
श्रीकांत बोजेवार यांची 'बघ रे चंद्रा, आता आली..!' ही धमाल गोष्ट मुळातून वाचण्यासारखी आहे. चांद्रयान तीनच्या पार्श्वभूमीवर लेखकाने ही धमाल विनोदी कथा छान फुलवली आहे. पृथ्वीराज तौर यांची 'मॅडेलीन' ही अनुवादित कथा अतिशय काव्यमय आहे. मोठ्यांसाठी लेखन करणारे प्रणव सखदेव जेव्हा छोट्यांसाठी लिहितात, तेव्हा ते अतिशय भावस्पर्शी लेखन करतात. 'चाफा' ह्या कथेत त्यांनी बालकांच्या भावविश्वाची आंदोलने अतिशय ताकदीने टिपली आहेत. छोट्या कैवल्यचे निसर्गसंवेदन मोठ्यांनाही सद्गदित करून जाते. गौरी लागू यांच्या 'मोरपीस' ह्या कथेतील छोटा नंदन हा कैवल्यसारखाच संवेदनशील आहे. निसर्गातून काही ओरबाडून घ्यायचे नाही, हे त्याला पटलेले आहे.
बाबा भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास व संशोधन करून शेकडो ग्रंथ सिद्ध केले आहेत. 'राजा बनायला आलोय' ह्या कथेत त्यांनी महाराजांच्या जीवनातील दोन प्रेरणादायी प्रसंग सांगितले आहेत. स्वाती आलुरकर यांनी दक्षिणेतील शिवगंगा राज्याची शूर राणी वेलू नचियार हिने इंग्रजांविरोधात दाखविलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगितली आहे. 'चला, प्रतिज्ञा पाळू या' ह्या कथेत चिन्मयी सुमित यांनी सुखी जीवनासाठी काही प्रतिज्ञा करण्याचा आणि त्या प्रतिज्ञा पाळण्याचा कानमंत्र दिला आहे.
'सभ्य असभ्य' ह्या लेखात डॉ. आशुतोष जावडेकर यांनी बालकुमारांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधला आहे. मिलिंद जोशी यांनी आचार्य अत्रे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा छान परिचय करून दिला आहे. प्रा. महेश देशपांडे यांनी १८ वर्षीय ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदच्या बुद्धिबळाच्या क्षेत्रातील कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. मनशक्ती म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा सुंदर संगम. 'वैज्ञानिक जादू' ह्या लेखात मयूर चंदने यांनी बाळगोपाळांना विज्ञानाधारित जादूचे प्रयोग शिकविले आहेत. अदिती जोगळेकर - हर्डीकर यांनी रंगीबेरंगी पुस्तकांतील आकर्षक चित्रसृष्टीची सफर घडवली आहे.
कविवर्य गुलजार, दासू वैद्य, प्रशांत असनारे, चिन्मय आलूरकर आणि डॉ. नीलिमा गुंडी यांच्या कविता वाचनीय आहेत. शि. द. फडणीस यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणि निलेश जाधव यांनी केलेली अंकाची आतील सजावट अतिशय चित्ताकर्षक आहे. संपूर्ण अंकात केवळ एकच जाहिरात आहे. बहुरंगी छपाई केलेल्या ७४ पृष्ठांच्या ह्या अंकाची किंमत केवळ १०० रुपये आहे. 'स्वप्न उद्याचे समर्थ पिढीचे' हे मनशक्तीचे ब्रीदवाक्य आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केवळ दिवाळी अंकच नव्हे, तर 'मनशक्ती' त्रैमासिकाचे नियमित वाचक झाल्यास ते आनंदाचे धनी होतील, यात शंकाच नाही.
अंकासाठी संपर्क : ७२१९८५५०२२
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा