बालकांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारा कवितासंग्रह : 'एलियन आला स्वप्नात'

संतोष तळेगावे, मुखेड जि. नांदेड. 

ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंतसरांचा 'एलियन आला स्वप्नात' हा किशोरवयीन मुलांचे भावविश्व फुलवणारा व त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारा कवितासंग्रह आहे. डॉ. सावंतसरांचा लहान मुलांबद्दलचा जिव्हाळा काव्यसंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतून पाहावयास मिळतो. डॉ. सावंतसरांच्या बालसाहित्याला महाराष्ट्र शासनासह अनेक नामवंत साहित्य संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. सावंतसरांची ५२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या बालसाहित्यातून बालकांना मनोरंजनासह ज्ञानही मिळते. हा त्यांच्या साहित्याचा विशेष पैलू आहे. 

या संग्रहात एकूण २९ कविता आहेत. 'डायनासोरची बहीण' या पहिल्याच कवितेत मगरीविषयी लिहिताना डॉ. सावंतसर म्हणतात

'क्षणात जलचर, क्षणात भूचर 

अत्यंत सावध तुम्ही उभयचर'

अगदी सोप्या शब्दांत खूप सारी माहिती डॉ. सावंतसरांची कविता देते. बहुतांश ग्रामीण भागातील मुलांना अशा प्राण्यांची माहिती नसते. अशा अपरिचित प्राण्यांची माहिती रंजकतेने या कवितासंग्रहातून होते.

'पेंग्विनदादा पेंग्विनदादा

चोचीवर रंगीबेरंगी नक्षी 

खरंच सांगा पेंग्विगदादा,

तुम्ही प्राणी आहात का पक्षी?

 बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या पेंग्विनला मुले चित्रातूनच कधीतरी पाहिलेली असतात, म्हणून डॉ. सावंत सरांनी अशा दुर्मिळ प्राण्यांनाही आपल्या कवितेत स्थान दिले आहे . जसे, एकशिंगी गेंडा, देवमासा, कासव, काटेरी साळींदर बुलबुल, हाँर्न बिल, मुंगूस, तरस , जिराफ इत्यादी. शालेय विद्यार्थ्यांना अशा प्राण्यांची माहिती व्हावी, त्यांच्याशी मैत्री जुळावी, हा कवीचा उद्देश जाणवतो. 

 'जिराफदादा' या कवितेत जिराफ हा आफ्रिका खंडातला असून टांझानिया या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, ही माहिती मिळते. काझीरंगा अभयारण्यात आढळणारा एकशिंगी गेंडा हा एवढा मोठा प्राणी मांसाहारी आहे व गेंड्याच्या जीवनशैलीविषयीची माहिती मुलांना वाचायला मिळते.

मुलांसाठी लिहायचं, म्हणजे आपलंही मन लहान मूल झालं पाहिजे. त्यांच्या भावविश्वात आपणही रममाण झालो पाहिजे, तरच ते बालसाहित्य म्हणून नावारूपाला येते. 'एलियन आला स्वप्नात' या कवितेत डॉ. सावंत सर म्हणतात :

'एलियन माझ्या स्वप्नात आला

मला म्हणाला, 'चल रे भाऊ

एका जागी कंटाळला आहेस

छानपैकी चंद्रावर फिरून येऊ'. 

लहान मुलांना खूप जास्त आकर्षण असणा-या कासवाबद्दल लिहिताना त्यांना प्रश्न पडतो:

'आयुष्यमान अजब सगळ्यात भारी!

मित्रा, तू शाकाहारी की मांसाहारी?'

जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असणारा घुबड हा पक्षी. 'घू..घू..घुबड' ही कविता घुबड हा एक पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे, हे अधोरेखित करते. 

 प्राण्यांबरोबर फळांच्याही कविता या संग्रहात वाचायला मिळतात. त्यांचे औषधी गुणधर्म व त्यांची चव हे सर्व काव्यात्मरीत्या वाचायला मिळते. एखादी गोष्ट असूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही, म्हणून 'असून नसून सारखेच' या कवितेत डॉ. सावंत सर म्हणतात

'शंभर पाय आहेत तरीही 

गोम वापरत नाही बूट

ऐटबाज जिराफदादा 

वापरत नाहीत सूट'. 

खोल महासागरात राहणारा देवमासा, मिठू मिठू बोलणारा पोपट, वाघ आणि सिंह यांनासुद्धा जखमी करणारा काटेरी साळींदर, शेतकऱ्यांचा मित्र पावशा पक्षी, हॉर्नबिल , सापाचा शत्रू मुंगूसमामा, हसरा प्राणी तरस इत्यादी प्राण्यांच्या माहितीचा जणू हा कवितासंग्रह एक कोशच म्हणावा लागेल. 

डॉ. सावंतसरांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती मुलांना सहजता, दैनंदिन वापरातील शब्द ,कविता वाचताना निर्माण होणारे कुतूहल, विविध विषयांवरील कविता, त्यामधील रंजकता बालकुमारांना फारच भावते. मगरबाई, जिराफदादा, मुंगूसमामा, पेंग्विगदादा, गेंडाभाई अशी संबोधने बालकांना मजेशीर वाटतात.

 डॉ. सावंतसर मगरीला डायनासोरची बहीण, तर कासवाला डायनासोरचा नातेवाईक म्हणतात. ही कल्पकता हे डॉ. सावंत सरांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मुखपृष्ठ व आतील चित्रे पुंडलिक वझे यांनी खूपच सुंदर रेखाटली आहेत. चेतक बुक्स पुणे यांनी आर्ट पेपरवर केलेल्या निर्मितीमुळे ह्या कवितासंग्रहाला अधिकच सुंदर रूप प्राप्त झालेले आहे.

  • कवितासंग्रह :-एलियन आला स्वप्नात 
  • कवी:- डॉ. सुरेश सावंत
  • प्रकाशक:- चेतक बुक्स, पुणे 
  • पृष्ठे ६०
  • मूल्य ३६० रु. 
  • ------------------------------------------------
  • पुस्तक परिचय :
  • संतोष गणपतराव तळेगावे,
  • मुखेड
  • ८००७५७८४४९.

टिप्पण्या