गुलाब बिसेन, ब्रह्मपुरी, चंद्रपूर.
मो. नं. 9404235191
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा 'एलियन आला स्वप्नात' हा बालकवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. डॉ. सुरेश सावंत सातत्याने बालसाहित्यामध्ये विविध प्रयोग करत असतात. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या बालकवितांतून उमटताना दिसते. यापूर्वीचे त्यांचे ११ बालकवितासंग्रहही वैशिष्ट्यपूर्ण ठरलेले आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांच्या प्रयोगशील लेखणीतून साकारलेल्या कविता बालवाचकांना आपल्याशा करणा-या आहेत.
बालपण हे सभोवतीचा निसर्ग, पशू, पक्षी, झाडे-झुडपे यांच्या सहवासातून आकार घेत असते. चिऊकाऊच्या गोष्टींतून बालपण समृद्ध करणारे बरेच साहित्य मराठी बालसाहित्यात आहे. परंतु या कवितासंग्रहातील प्राण्या- पक्ष्यांच्या कविता केवळ मनोरंजक नाहीत, तर त्या ज्ञानात भर घालणार्या आहेत. या कवितासंग्रहात मनोरंजन आणि ज्ञानाचा सुरेख संगम कवीने साधला आहे. 'डायनाॅसोरची बहीण' या पहिल्याच कवितेत त्याचा प्रत्यय वाचकाला येतो. कवीने 'मगर' या उभयचर प्राण्याची गुणवैशिष्ट्ये सांगतानाच त्याच्या रंगापासून ते अंडी देण्यापर्यंतचा प्रवास आनंददायी पद्धतीने रंगवला आहे. मगरीची गुणवैशिष्टये सांगताना कवी लिहितात,
'शिकार गिळताना ढाळता अश्रू
त्यालाच आम्ही म्हणतो नक्राश्रू
वाळूच्या ढिगार्यात लपवता अंडी
अंड्यांना पाण्यात वाजते का थंडी?
आपल्या अवतीभोवती अनेक पशुपक्षी वावरत असतात. काही प्राण्यांची गोष्टी आणि गाण्यांतून बालकांना ओळख झालेली असते, तर काही पशुपक्षी घराच्या अंगणात भेटत असतात. असे असले तरी काही प्राण्यांविषयी बालमनाची उत्सुकता सरता सरत नाही. त्या प्राण्यांविषयी कितीही वाचले तरी माणूस कंटाळत नाही. असे ससा, कासव, पावशा, अस्वल, जिराफ, वाघ, गाढव इ. प्राणी बालकांच्या मनात घर करून असतात. अशाच एका कासवाविषयी कवितेत कवी म्हणतात,
'स्वच्छतादूत तू आहेस छान
देवळात आधी तुझाच मान!
अतिशय सावध जपून वागतोस
म्हणूनच तू दीर्घकाळ जगतोस'
निसर्गात आश्चर्यचकित करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात. नव्हे निसर्ग हा चमत्कारांची खाणच आहे. आता हेच बघा ना, पावसाळा सुरू होताना पावसाची पहिली चाहूल पावशा पक्ष्याला लागते. असा 'पावशा' शब्दबद्ध करताना कवी लिहितात:
'पावशा पक्षी गाणे गाईल
शिवार सारा हिरवा होईल
पावशाने दिली पावसाची वर्दी
आभाळात झाली ढगांची गर्दी'
घुबड या पक्ष्याविषयी जनमानसात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यांना दूर करण्याचा प्रयत्न कवी डॉ. सावंत यांनी 'घू घू घुबड' या कवितेत केला आहे. संवेदनशील बालमनावर कोवळ्या वयात होणारे संस्कार चिरकाल टिकणारे असतात. बालसाहित्यातून गैरसमजाच्या निर्मूलनाची व्यवस्था करण्याचा कवीचा प्रयत्न प्रेरणादायी आहे. शाळेच्या वेळापत्रकात कंपलसरी असलेला शारीरिक शिक्षणाचा तास हा तसा दुर्लक्षितच असतो. अनेकदा त्या तासात अभ्यासाचेच विषय शिकवून शारीरिक शिक्षणाला बगल दिली जाते. असा महत्त्वपूर्ण खेळाचा तास मग हेडसरांकडे तक्रार करतो. तक्रार करताना तो म्हणतो,
'काही शिक्षक परिपाठाचा
दररोजच करतात सराव
खेळांचा तास खेळांसाठीच
असा झालाच पाहिजे ठराव!'
इंग्रजीच्या मॅडमसुद्धा
मलाच वेठीस धरतात
थकलेल्या विद्यार्थ्यांवर
इंग्रजीचा मारा करतात'.
अशी 'खेळांच्या तासाची तक्रार' या कवितेतून वाचताना छोट्या दोस्तांना निखळ मनोरंजनासोबतच खेळाच्या तासाचे महत्त्व समजते.
या कवितासंग्रहामध्ये विविध प्राण्यांवरील कवितांसोबतच फळांविषयीच्या कविताही ज्ञान आणि मनोरंजनाचा सुवर्णमध्य साधणार्या आहेत. फणस आणि अननस या फळांवरील कविता नुसती माहिती देत नाहीत, तर मनोरंजनही करतात.
'निवांत बसून अननसाच्या
लहान लहान चकत्या करू
चवीसाठी त्यावर थोडे
मीठ आणि साखर पेरू'.
'फणसबाळे' या कवितेत कवी फणसाच्या अंगी असणाऱ्या गुणांची अत्यंत बालसुलभ भाषेत मांडणी करताना लिहितात,
'फणसाच्या पोटी लपला
खनिजांचा साठा भरपूर
अनेक व्याधी विकारांना
तो पिटाळून लावतो दूर'
कवी डाॅ. सुरेश सावंत हे लहान मुलांमध्ये रमणारे आचार्य कुलातील शिक्षक आहेत. छोट्या दोस्तांच्या मनाचा ते आपल्या लेखनातून सहज वेध घेतात. या कवितासंग्रहाची शीर्षक कविता 'एलियन आला स्वप्नात' ही भन्नाट मनोरंजक आहे. यातला एलियन हा पंख असलेल्या पक्ष्यांप्रमाणे स्वच्छंद आकाशात उडतो. कवितेतल्या मुलाला चंद्रावरची सैर करण्याचा आग्रहही धरतो.
बालपणीचा सुखाचा काळ अधिक सुखकर करणारा मामाचा गाव. 'मामाच्या मळ्यात' ही कविता मामाच्या मळ्यात पिकणार्या पिकांची विस्तृत माहिती देऊन वाचकाला शेतकर्याच्या कष्टाचे मोल पटवून देण्यात मोलाचा हातभार लावते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा कसा आहे, याची जाणीव ही कविता वाचताना वाचकाला होते.
'मामाच्या मळ्यात
सर्जाराजाची ही जोडी
कष्टाच्या भाकरीला येते
अमृताची गोडी'
अशा शब्दांत कवी कष्टाच्या भाकरीचे महत्त्व पटवून देतो.
यासोबतच या कवितासंग्रहामध्ये पेंग्विन, गेंडा, गाढव, साळींदर, बुलबुल, हाॅर्नबिल अशा पशुपक्ष्यांच्या, मनोरंजनातून ज्ञानवर्धन करणार्या कविता आहेत. ज्ञान आणि मनोरंजनाचा सुरेख संगम साधलेला हा कवितासंग्रह छोट्या दोस्तांना नक्कीच आवडेल.
पुस्तकाचे नाव - 'एलियन आला स्वप्नात'
कवी - डॉ. सुरेश सावंत
मुखपृष्ठ - पुंडलिक वझे
प्रकाशक - चेतक बुक्स, पुणे
रंगीत पृष्ठे ६०. मूल्य - ३६० रु.
addComments
टिप्पणी पोस्ट करा