उद्याचा मराठवाडा' दिवाळी अंकउद्याचा मराठवाडाच्या 'युवापर्व' ह्या वैभवशाली दिवाळी अंकाचे प्रकाशन काल सायंकाळी मोठ्या थाटात संपन्न झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण, माजी मंत्री मा. डी. पी सावंत, उगवते नेतृत्व कु. श्रीजया चव्हाण यांच्यासह मलाही ह्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. मुख्य संपादक राम शेवडीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दैनिकाच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रवीण बर्दापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद शेवडीकर यांनी ह्या दिवाळी अंकाचे संपादन केले आहे. दरवर्षी 'मराठवाडा'चा दिवाळी अंक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो. यंदाच्या दिवाळी अंकानेही आपले वेगळेपण सांभाळले आहे. ह्या अंकात, विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची अमीट नाममुद्रा उमटवणाऱ्या महनीय व्यक्तींच्या प्रेरणादायी कहाण्या आहेत. 

भव्यदिव्य चित्रं रेखाटणा-या आभा भागवत, भिका-यांचा बापमाणूस अशी ओळख असलेले डॉ. अभिजित सोनावणे, आर्थिक घोटाळे शोधून काढणा-या डॉ. अपूर्वा जोशी, जीआयवाले गणेश हिंगमिरे, 'फोस्टर मदर' गीतांजली रोहकले, लडाखमध्ये मराठी खानावळ चालवणाऱ्या ग्रीष्मा सोले, आध्यात्मिक साधना समजून सेंद्रीय शेती करणारे सत्यजित हंगे, प्रदेशातून उच्च शिक्षण घेऊन कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय करणारा अवलिया हर्षवर्धन पटवर्धन, विमानं भाड्यानं देणारे मंदार भारदे, आश्वासक अभिनेत्री पर्ण पेठे, ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्राची शेवगावकर, कीर्तनाला कॉर्पोरेट चेहरा देणारे पुष्कर औरंगाबादकर, वेगळे फॉण्ट तयार करणारे सारंग कुलकर्णी, भाडिपाचा सारंग साठे, 'आद्या' हा ब्रॅण्ड निर्माण करणारी सायली मराठे आणि खगोलशास्त्रात संशोधन करणारी श्वेता कुलकर्णी यांच्या जीवनकथा अतिशय अद्भूतरम्य आहेत.

कथा विभागात साहिल कबीर, सुचिता घोरपडे, देवीदास सौदागर, डॉ. सुरेखा ठक्कर, सचिन वसंत पाटील, आनंद देशपांडे, उमेश घेवरीकर यांच्या वाचनीय कथा असून समीर गायकवाड यांनी ह्या विभागाचे संपादन केले आहे. 

बालविभागात डॉ. सुरेश सावंत, सुरेश वांदिले, एकनाथ आव्हाड, राजीव तांबे यांच्या काही एक विचार देणा-या रंजक कथा असून सुरेश वांदिले यांनी ह्या विभागाचे संपादन केले आहे.

वसंत आबाजी डहाके, रवींद्र दामोदर लाखे, राहुल पुंगलिया, महेश केळुस्कर, अनुपमा उजगरे, दा. गो. काळे, अशोक कोतवाल, दिनकर मनवर, मंगेश काळे, गणेश विसपुते, अजय कांडर, प्रफुल्ल शिलेदार, केशव सखाराम देशमुख, वर्जेश सोळंकी, श्रीकांत देशमुख, लोकनाथ यशवंत, सतीश सोळांकुरकर, संतोष पद्माकर पवार, कल्पना दुधाळ, प्रशांत असनारे, सारिका उबाळे, गीतेश शिंदे, पवन नालट, सुनीता झाडे, वर्षा ढोके सय्यद, किशोर कवठे, पुनीत मातकर, कविता ननवरे, पद्मरेखा धनकर इ. कवींच्या सहभागाने नटलेल्या कविता विभागाचे संपादन प्रमोदकुमार आणेराव यांनी केले आहे.

गेली १९ वर्षे मुद्रितशोधनाच्या निमित्ताने या दिवाळी अंकात माझा खारीचा वाटा असतो. विवेक रानडे यांचे मुखपृष्ठ आणि शिवानंद सुरकुटवार यांची कलानिर्मिती अतिशय बहारदार आहे! दै. उद्याचा मराठवाडाने यंदाच्या दिवाळी अंकातही आपले वेगळेपण सांभाळले आहे. अक्षर वाङ्मयामुळे हा दिवाळी अंक संग्राह्य झाला आहे.

अंकाची किंमत रु. २००

अंकासाठी संपर्क : ९४२२१७१८८५

अंकाचा परिचय : डॉ. सुरेश सावंत,   नांदेड.

टिप्पण्या