प्रगल्भ चिंतनाचा ठेवा : 'आजची मराठी बालकविता ' नारायण खरात, अंबड, जि. जालना.


अतिशय जिव्हाळ्याच्या आणि आवडीच्या बालसाहित्य सागरात मनसोक्त अवगाहन करून तळातील रत्नराशी रसिकांना देण्याचा डॉ. सुरेश सावंतसरांचा प्रांजळपणा, निर्मळपणा सर्वपरिचित आहे. सातत्याने गुणवत्तापूर्ण लेखन करून त्यांनी बालसाहित्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

अर्धशतकी साहित्यकृती निर्माण करून सरांचा हा प्रवास शतकोत्सवाकडे घोडदौड करतो आहे. नुकताच त्यांचा 'आजची मराठी बालकविता' हा समीक्षाग्रंथ पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाने सिद्ध केला आहे. सदर ग्रंथात २४ लेख आहेत.

 बालसाहित्याचा सखोल अभ्यास, मनन व चिंतनातून या ग्रंथाची अद्वितीय अशी निर्मिती झाली आहे. प्रत्येक लेखात त्या कवितासंग्रहातील कवितेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे. त्यामुळे वाचकाला कवितेचे आकलन अतिशय सुलभपणे होते. डॉ. सावंत यांची अध्ययनशीलता आणि गुणग्राहकता लक्षवेधी आहे. लेखकाने बालकांच्या मनोविश्वाशी तादात्म्य पावण्याचे कौशल्य संपादन केले आहे. एकरुपता साधल्याशिवाय साधना फळाला येत नाही आणि साधनेचे फळ किती प्रबळ असते हे या लिखाणावरून आपल्या लक्षात येते. डॉ. सावंत यांना बालकांसाठी सोपे लिहिण्याची अवघड कला सहजसाध्य झालेली आहे. 

पहिलाच लेख ज्येष्ठ बालसाहित्यिक प्रा. केशव बा. वसेकर यांच्या समग्र बालकवितेवर लिहिलेला आहे. वसेकरांनी अतिशय निष्ठेने बालकुमारांसाठी नऊ कवितासंग्रह लिहिले आहेत. त्यावर लेखकाने चिकित्सक आणि सर्वस्पर्शी लेख लिहिलेला आहे. कालानुक्रमे कवीच्या कवितेचा कसा विकास होत गेला, याचा परामर्श घेतला आहे. कवीच्या बालपणातील खेळ, त्या काळातील ग्रामीण जीवन आणि तेथील भवताल याचा सांगोपांग धांडोळा या लेखात घेतलेला आहे. ग्रामीण बोलीभाषेत लिहिलेली वसेकरांची कविता ही वास्तवदर्शी असून ती अद्भुतरम्यता आणि कल्पनारम्यता यामध्ये अडकून पडलेली नाही, हे या ठिकाणी डॉ. सावंत सर आवर्जून नमूद करतात. 

खानदेशकन्या माया धुप्पड यांच्या समग्र कवितेवर लेखकाने १८ पृष्ठांचा लेख लिहिला आहे. माया धुप्पड यांच्या ८ बालकवितासंग्रहांचा यामध्ये लेखकाने धांडोळा घेतला आहे. त्यांच्या 'गाऊ अक्षरांची गाणी' या पुस्तकांमधल्या चार चार ओळींच्या छोट्या छोट्या ५७ कविता या बालकांच्या मनाचा वेध घेतात. या कवितांचा बालवाडीसाठी शिशुगीत म्हणून छान उपयोग झाला आहे. त्यांच्या 'पावसाची राणी, गाऊ अक्षरांची गाणी, वाऱ्याची खोडी, सावल्यांचं गाव, नाच रे बाळा, हत्तीचा व्यायाम, आभाळाची छत्री, चिमणी उडाली भुर्र या संग्रहांमधून कवयित्री मनोरंजनाबरोबरच मुलांना संस्काराच्या गोष्टी शिकवायला विसरत नाहीत. कष्टाचे महत्त्व विशद करतात. कल्पनारम्यतेचे महत्त्वही सांगतात. ससा कासवाची गोष्टदेखील कवितारुपात मांडतात. बाळगोपाळांसाठी त्यांच्या नावातील माया कवितेत उतरली असल्याचे लेखकाने नमूद केले आहे. 

सदानंद पुंडपाळ यांच्या 'हिरव्या रानाचे गोड गाणे' यावर छान लेख लिहिला आहे. मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या विध्वंसाची कवीला चिंता आहे. नद्यांचा छळ कवीला अस्वस्थ करतो. पर्यावरणाच्या चिंतेचे चिंतन कवी करतो. चक्रधर स्वामींनी दिलेल्या चिऊकाऊच्या दृष्टांताप्रमाणे कवीने पर्यावरण जागृतीसाठी चिऊकाऊच्या गोष्टींचा उपयोग केला आहे. मोकळ्या रानातून फिरवून आणणारी ही कविता मानवाला दानव न होण्याचा सल्ला देते. पुंडपाळांच्या 'हिरवी राने,गाते गाणे' या कवितासंग्रहासाठीचा हा प्रस्तावनापर लेख छान जमून आला आहे.

डॉ. भगवान अंजनीकरांच्या 'किती सुंदर जग' या बालकवितासंग्रहाच्या निमित्ताने लेखकाने त्यांच्या लेखनाच्या संख्यात्मकतेचा आणि गुणात्मकतेचा गौरव केला आहे. 'किती सुंदर जग' ह्या बालकवितासंग्रहातील कविता एकतेची समंजस जाणीव करून देतात. अतिशय सुलभ बोध आणि जाणिवा मुलांमध्ये जागृत करण्याचं काम या कविता निश्चितपणानं करतात, हेसुद्धा या ठिकाणी आवर्जून उल्लेखिलेले आहे. ग्रामीण आणि शहरी या संस्कृतीतले अंतर वाढल्यामुळे आजोळचे सुख, तिथले खेळ , खेड्यातलं मनमुक्त आणि मनसोक्त हुंदडणं या सर्वच गोष्टींपासून शहरवासी झालेली मुलं दुरावलेली आहेत. डॉ. भगवान अंजनीकरांची एकूण बालकविता ही केवळ रंजनप्रधान नसून कुमारांना गतिशील बनवणारी आणि सुंदर जगाचे स्वप्न रंगवणारी कुमारकविता आहे. त्यावरचा हा सुंदर लेख. 

 'अनमोल वेळ' या निर्मला मठपती यांच्या कवितासंग्रहाबद्दल लिहीत असताना लेखकाने निर्मला मठपती यांच्या बालसहित्यातल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. 'अनमोल वेळ' या संग्रहात २३ कविता विषयांची विविधता घेऊन येतात. यातील प्रार्थना, खरी परी, दिवाळीची सुट्टीची, मजा आलीच नाही अशा विविध विषयांवरच्या कवितांचा या लेखात सुंदर असा धांडोळा घेण्यात आलेला आहे. कवयित्री बालकांच्या भावविश्वाशी किती समरस झालेल्या आहेत, याचा आरसा म्हणजे हा कवितासंग्रह आहे. अतिशय सुंदर, रसरशीत कविता समरसतेशिवाय येत नाही, असादेखील उल्लेख लेखकाने केला आहे. 

बालसाहित्यात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या प्रा. लीला शिंदे यांच्या 'मुंगी निघाली एव्हरेस्टवर' या कवितासंग्रहाविषयीचा लेख वाचनीय आहे. या कविता प्राण्यांच्या अद्भुत जगाची सफर घडवून आणतात, असे लेखकाने म्हटले आहे. 

मुंबईचे प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या खरंच सांगतो दोस्तांनो, आनंदझुला, शब्दांची नवलाई आणि छंद देई आनंद या चार कवितासंग्रहांवरचे अतिशय अभ्यासपूर्ण असे चार लेख या पुस्तकात आहेत. बालसाहित्यातले झपाटलेले आणि समर्पित साहित्यिक असा आव्हाड यांचा गौरवपूर्ण उल्लेख या लेखांमध्ये लेखकाने केलेला आहे. या संग्रहातल्या कविता या रंजनातून शिकवण, बोध, संस्कार यांचे धडे देणाऱ्या आहेत. या चारही कवितासंग्रहातील कविता आणि कवीचे मुलांबद्दलचे प्रेम कवितांतील शब्दाशब्दांत आपल्याला दिसून येते, असे डॉ. सावंत या ठिकाणी नमूद करतात. यातील एक लेख 'शब्दांची नवलाई'ला लिहिलेली प्रस्तावना आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या 'जॅक्रुला' या कवितासंग्रहावरचा लेख या पुस्तकात आहे. कवीने कल्पनेतून निर्माण केलेली अंधेरनगरी, या नगरीचे नाव जॅक्रुला आहे. ज्या ठिकाणी मगरींचा रहिवास आहे, अशी अद्भुत पात्रे यामुळे या रहस्यमय जॅक्रुला नगरीत कशा गमतीजमती घडतात, त्या बाळगोपाळांना पाहायला मिळतात. 

 उत्तम सदाकाळ यांचं बालसहित्यातलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा जंगलगाणी हा नवाकोरा बालकविता संग्रह म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणी आहे. अतिशय चैतन्यदायी रचनांचा हा कवितासंग्रह बालकांना निश्चित आवडेल, असा विश्वास या लेखाच्या माध्यमातून लेखक देतात. प्रस्तुत लेख हा उत्तम सदाकाळ यांच्या 'जंगल गाणी' ह्या बालकवितासंग्रहाला पाठराखण म्हणून लिहिलेल्या मजकुराचा विस्तार आहे.

पंडित पाटील यांची 'गोड गाणी' हा पंडित पाटील यांच्या कवितासंग्रहावरचा लेखही सुरेख जमला आहे. पंडित पाटील या मातृह्रदयी शिक्षकाने लिहिलेल्या या कविता खरोखरच बाळमुखातली गोड गाणी आहेत, असा उल्लेख डॉ. सावंत येथे करतात. विविध कवितांमधून बालगोपाळांचा आनंद, बालविश्वामध्ये रमण्याचं कसब या कवितासंग्रहामधून पंडित पाटलांनी साधलेले आहे, असा महत्त्वपूर्ण उल्लेख गोड गाण्याच्या निमित्ताने लेखक या ठिकाणी करतात.

उस्मानाबादचे कवी समाधान शिकेतोड यांचा 'पोपटाची पार्टी' तसेच प्र. श्री. जाधव यांचा 'गुणगुण गाणी' ह्या कवितासंग्रहांवरचे लेखदेखील अतिशय उल्लेखनीय आहेत. अंबडचे कवी नारायण खरात यांच्या 'चंद्रावरची सहल' या बालकवितासंग्रहावर 'नारायण खरात यांनी घडविली चंद्रावरची सहल' हा लेख अतिशय सुंदर झाला आहे. या कवितांमधून निसर्गाचे रक्षणाविषयी कळकळीने उल्लेख येतात. कवीचे शाळेवरचे प्रेम कवितेमध्ये दिसून येते, हे नमूद करतात. अद्भुतरम्यता, निरागस स्वप्नरंजन, निसर्गाविषयी प्रेम, तळमळ, सजीव सृष्टीविषयीचे कुतूहल या कवितेतून आलेले आहे, असा महत्त्वपूर्ण उल्लेख डॉ. सावंत करतात

'वीरभद्राने फुलविली आनंदाची फुलबाग' हा वीरभद्र मिरेवाड यांच्या 'आनंदाची फुलबाग' या कवितासंग्रहावरचा लेख उल्लेखनीय आहे. मिरेवाडांची कविता मुलांच्या मनाचा ठाव घेते. आजी-आजोबा आणि नातवांच्या नात्याचे महत्त्व आणि संस्कारशील संदेश यातील कविता देतात. तसेच ही कविता शहरी आणि ग्रामीण बालवाचकांनादेखील आपलीशी वाटेल, अशी आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख या लेखात केलेला आहे. आनंद पपुलवाड हे मोजके पण, कसदार लेखन करणारे साहित्यिक असून त्यांचे 'सुंदर हे जग' या कवितासंग्रहावरचा लेखदेखील महत्त्वाचा आहे. 

 मुग्धाच्या कविता या कु. मुग्धा उमेश घेवरीकर हिच्या कवितासंग्रहावरचा लेख वेगळ्या विश्वाची ओळख करून देतो. 'जीवनभाष्य करणाऱ्या मुग्धाच्या कविता' या लेखात ग. ह. पाटील यांनी बालपणात कवितालेखन करून पुढे मोठे कवी झाल्याचे सुंदर उदाहरण दिले आहे. मुग्धादेखील पुढे फार मोठी कवयित्री होईल, हा आशावाद या लेखामध्ये ठळक होतो. 

'हिंगोली जिल्ह्यातील प्रतिभेचे नवे क्षितिज' हा बबन शिंदे यांच्या 'नामदेवाची लेकरं' ह्या संपादित पुस्तकाविषयीचा लेख आहे. या प्रयोगशील लेखकाने भावी पिढीतील प्रतिभावान कवी पारखून ३५ बालकवींच्या कविता या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. अतिशय कौतुकास्पद उपक्रम केल्याबद्दल लेखकाने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. अशा एकंदरीत २४ लेखांमधून निवडक कवींच्या पुस्तकांवर लेखकाने अतिशय रसाळ आणि सुलभ भाषेत समीक्षा केलेली आहे. 'आजची मराठी बालकविता' हा समीक्षाग्रंथ सिद्ध करून मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे. 

पुस्तक परिचय :

नारायण खरात पाटील,

अंबड जि.जालना.

पिन:४३१२०४

मो.नं: ९४०४६२६७८४

'आजची मराठी बालकविता' (समीक्षा)

लेखक : डॉ. सुरेश सावंत

प्रकाशन: संस्कृती प्रकाशन, पुणे

मुखपृष्ठ: संतोष घोंगडे

पृष्ठे:१२८ 

किंमत :२०० रु.

टिप्पण्या
Popular posts
मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र खोपडे सेवानिवृत्त*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील आदर्श कामगार कार्यकर्ते विजय चोरगे सेवानिवृत्त*
इमेज
माहूरचे वन परीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केलेल्या बोगस कामाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करा
इमेज
शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र
इमेज
*वीरशैव लिंगायत समाजाने संघटित झाल्याशिवाय प्रगती शक्य नाही* - रामदास पाटील सुमठाणकर यांचे कपिलाधार धर्मसभेत आवाहन.
इमेज