माहूर(प्रतिनिधी)
किनवट माहूर महामार्गावरील आसोली फाट्यानजीक महामंडळाच्या चक्क चालत्या बसचा टायर निघाल्याची घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून चालकाच्या प्रसंगावधानाने तब्बल ३९ प्रवासी बालंबाल बचावल्याने प्रवासीवर्गातून चालकाचे कौतुक होत आहे..
आज (ता.१५) रोजी महामंडळाच्या किनवट आगाराची बस क्र. एम. एच. २० बी.एल. ३५३८ ही बस किनवट ते माहूर या नियमित फेरीसाठी चालक बाबुराव घुगे व वाहक मारोती जाधव यांच्यासह सकाळी साजेदहा वाजता किनवट येथून प्रवासी घेवू निघाली होती. दरम्यान वाई बाजार पासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या आसोली ते उमरा च्या मध्ये सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास चालू बसचा टायर निघून रस्त्यावर पळाला. यावेळी बसचे चालक बाबुराव घुगे यांनी प्रसंगावधान राखत वेगावर कमालिचे नियंत्रण मिळवित बसला तातडीने नियंत्रित करून रोखण्यात यश मिळविले. यावेळी बसमधून ३९ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने वेळीच बस नियंत्रित झाल्याने सर्व प्रवासी बालंबाल बचावल्याची प्रतिक्रिया प्रवाश्यांनी बोलून दाखवली...
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कमलेश भारती विभागीय वाहतूक अधिकारी नांदेड यांच्यासह चंद्रशेखर समर्थवाड कार्यशाळा अधिक्षक माहूर तसेच विठ्ठल इंगळे सहा. वाहतूक निरिक्षक (मार्गपथक पाहणी) यांच्या पथकाने घटनास्थळावर पोहचून घटनेचा पंचनामा केला.. यावेळी बसमधील तांत्रीक बिघाडामुळे सदरची घटना घडली असल्याचे पाहणी पथकाकडून सांगण्यात आले...
"विशेष म्हणजे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह तेलंगणातूनही श्री. रेणूकामातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या अलोट गर्दीची रीघ लागलेली आहे.. त्यात महामंडळाच्या बसचा रस्त्यावर चालू अवस्थेत टायर निघाल्याचा विचित्र प्रकार महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून डेपो मधून गाडी सोडताना या बसेसची पाहणी करून मेन्टनन्सची कामे होत नाहीत का? जर होत नसतील तर अशा घटनांना जबाबदार कोण? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे...
addComments
टिप्पणी पोस्ट करा