भारतातील प्रमुख बंदरातील सेवानिवृत्त गोदी कामगारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्या द्विपक्षीय वेतन समितीमार्फत सोडविल्या जातात. परंतु अद्यापही सेवानिवृत्त गोदी कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्या असून, या मागण्या ताबडतोब सोडविण्यासाठी सरकारने पेन्शन आदालत घ्यावी, अशी मागणी ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स रिटायर एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सी.जे. मेंडोसा यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर व शिरूर परिसरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट सेवानिवृत्त कामगार संघाचा प्रथम वर्धापन दिन विजया दशमीच्या मुहूर्तावर २४ ऑक्टोबर २०२३ रोजी तपनेश्र्वर मंदिर सभागृहात संपन्न झाला.
ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स रिटायर एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जे.मेंडोसा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, १९९६ ते २००६ च्या दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या गोदी कामगारांना पेन्शनसोबत वैयक्तिक वेतन दाखविले जाते. त्यावर महागाई भत्ता मिळत नाही. तर ते वेतन, पेन्शनचाच भाग समजून पेन्शन वाढ व त्या कालावधीची थकबाकी मिळावी, अशी महत्त्वाची मागणी आहे. चेन्नई हायकोर्टाच्या निर्णयानुसार चेन्नई पोर्टमधील सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन वाढ होवून थकबाकी देखील मिळाली आहे. या पेन्शन वाढीचा फायदा सर्व बंदरातील तत्कालीन सेवानिवृत्त गोदी कामगारांना मिळाला पाहिजे. पेन्शनर्सचे वय ८० झाल्यानंतर त्यांना पेन्शन वाढ मिळावी त्यासाठी पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची काही गरज नाही. ही मागणी मान्य झालेली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, भारतात प्रमुख बंदरात ३ लाख गोदी कामगार होते, आता फक्त १७ हजार गोदी कामगार राहिले आहेत. मुंबई बंदरात पूर्वी ४२ हजार गोदी कामगार होते आता फक्त ३ हजार गोदी कामगार शिल्लक राहिले आहेत, तर मुंबई बंदरात ३६ हजार पेन्शनर आहेत. प्रमुख बंदरामध्ये ८० टक्के काम कंत्राटी पद्धतीने चालत असून २० टक्के कामापुरतेच कायमस्वरूपी कामगार आता शिल्लक राहिले आहेत. मात्र २०२२-२३ या वर्षात मुंबई बंदरातील कमीत कमी कामगारांनी ६३. ६१ दशलक्ष टन मालाची चढ उतार केलेली आहे. मुंबई बंदरातील ही एक ऐतिहासिक नोंद आहे. गोदी कामगारांना या महिन्यात ५ टक्के महागाई भत्ता वाढीचा फायदा मिळणार आहे. २६ ऑक्टोबर २०२३ च्या संपाच्या इशाऱ्याने द्विपक्षीय वेतन समितीची पुढील मिटिंग ६ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्लीत होणार असून, १७ ऑक्टोबर २०२३ रोजी बोनस करार झाला आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री. डिंग्रेजा, खजिनदार श्री. गोवेकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे, कार्यकर्ते मारुती लोखंडे, जिजाभाऊ औटी, एकनाथ तांबे, दौलत दुराफे आदी मान्यवरांची भाषणे झाली. मुंबई पोर्ट ट्रस्ट सेवानिवृत्त कामगार संघाचे अध्यक्ष गेनभाऊ बांगर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम आवटी, शांताराम टाव्हरे, बाळू निघोट, बाळू थोरात, पोपत भोर, अनिल आवटी, दत्तू पडवळ, रंगनाथ थोरात, आत्माराम वाळुंज, ज्ञानेश्वर वाळुंज,इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. सुभाष हांडे यांनी सभासदांची बीपी व शुगर याची मोफत वैद्यकीय तपासणी केली. सभेला सेवानिवृत्त गोदी कामगारांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
- आपला
- मारुती विश्वासराव
- प्रसिद्धीप्रमुख
- मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा