लोहा,(प्रतिनिधी)
आजघडीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे काम केटीएल कंपनीच्या वतीने चालु असून प्रारंभी वेगात सुरू असलेले काम सध्या
कासव गतीने होत असल्याने नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. शेताकडून घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असलेल्या पारडी येथील ६२ वर्षीय महिला सरपंचास भरधाव वेगातील मोटारसायकलने जबर धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना दि.(१८)रोजी सायंकाळी साडेसहा ते पावणे सात वाजे दरम्यान घडली. अपघात घडताच मोटारसायकल स्वार मोटारसायकल जागेवर सोडून पसार झाला.
लोहा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावरील पारडी येथील विद्यमान सरपंच पंचफुलाबाई दत्ता पवार यांचे पारडी शिवारातील बीएसएनएल कार्यालया लगत शेती असून सरपंच पंचफुला पवार या आभाळ दाटून आल्याने सोयाबीन झाकण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. शेतीतील कामे आटोपून त्या दि. १८ रोजी सायंकाळी साडेसहा ते पावणेसात वाजताच्या दरम्यान शेताकडून घराकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान पारडी नजीक नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ हा ओलांडत असताना लोह्याकडून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील मोटारसायकल क्र. एम एच २६ बी टी २३१५ या मोटारसायकल स्वराने जोराची धडक दिली त्यात महिला सरपंच पंचफुलाबाई दत्ता पवार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लोहा उपजिल्हा उगणालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.
मागील नऊ ते दहा महिन्यांपूर्वीच त्या थेट जनतेतून सरपंच म्हणून पारडीचा सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दि. १९ रोजी दुपारी १२ वाजता पारडी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील पवार, पाच मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
यावेळी अंत्यविधीस शिवसेनेचे (उबाठा)जेष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण, मध्यवर्ती बँक संचालक प्रविण पाटील चिखलीकर, माजी जि प सदस्य पुरूषोत्तमभाऊ धोंडगे, माजी जिप सदस्य रंगनाथ भुजबळ,कांग्रेस कमिटीचे शरद पाटील पवार, माजी जि प सदस्य श्री निवास मोरे,भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील शिंदे, नियोजन समिती सदस्य मा. नवनाथ (बापूसाहेब) चव्हाण,
शिवसेनेचे सुरेश पाटील हिलाल, संजय पाटील कराळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुतन संचालक,सर्व पक्षांचे पदाधिकारी,यांसह पंचक्रोशीतील सरपंच, चेअरमन, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पाहुणे व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा