कामगार कायदे बदलण्याचा सरकारचा डाव हाणून पाडू!* *आमदार सचिन अहिर यांची कामगार मेळाव्यात ग्वाही!*


 मुंबई दि.२३:जे कायदे कामगार संघटनांनी संघर्ष आणि लढ्यातून मिळविले,ते बदलण्याचा सरकारने प्रयत्न केला तर कामगार संघटना तो डाव हाणून पाडतील,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना दिली.

    राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७६ वा वर्धापनदिन आणि दसरा संम्मेलन आज महात्मा गांधी सभागृहात मोठ्या थाटामाटात पार पडला.राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने दस-याच्या पूर्व संध्येला हा कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता . समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.आंबेकर श्रम संशोधन‌ संस्थेचे सल्लागार डॉ.शरद‌ सावंत,निवृत्ती देसाई,आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे,राजन लाड, संजय कदम, उत्तम गिते, मिलिंद तांबडे आदी पदाधिकारी त्या वेळी उपस्थित होते.

  प्रारंभी संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून,अभिवादन करण्यात आले.

   या प्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणात सरचिटणीस गोविंद राव मोहिते यांनी सांगितले,ऋषितुल्य गं.द.आंबेकर यांनी त्याग आणि निष्टा या जोरावर विधायक कार्य रुजविले ते पुढे नेण्याचा संकल्प करू!

     केवळ दुचाकी वरुन होमिओपाथी औषधोपचाराद्वारे गिरणी कामगारांची सेवा करणारे आंबेकर यांनी मुंबईत एक बलाढ्य कामगार संघटना उभी केली,गं.द.आबेकरजींच्या कामगार चळवळीतील या निस्पृह कार्याला उजाळा देऊन सचिन अहिर आपल्या भाषणात सचिन अहिर पुढे म्हणाले,माथाडी नेते आण्णासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नातून तत्कालीन सरकारने केलेला माथाडी कायदा विद्यमान राज्य सरकार बदलत आहे,त्या शिवाय अनेक कायदे बदलण्याच्या धोरणाचा आमदार सचिन अहिर यांनी निषेध केला.गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर बोलतांना सचिन अहिर म्हणाले, शेवटच्या कामगाराला घर मिळे पर्यंत आम्ही लढत राहू.पात्रता तपासणीच्या कामाला राष्ट्रीय मिल मजदूर संघाने गति दिली आहे,असे सांगून सचिन अहिर म्हणाले, पात्रतेचे काम लवकरच संपवून म्हाडाने कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत.या प्रश्नावर आम्ही लढा उभा केल्या मुळे असंख्य घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.

   मुंबईसह देशातील एनटीसीच्या 23 गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या 30000 कामगारांनी त्यांचे नेतृत्व सचिन अहिर यांच्या कडे सोपविले असून या गिरण्यातील कामगारांचा रोजगार सुरक्षित रहावा यासाठी "एन.सी‌.एल. टी".च्या माध्यमातून लवकरच पावले उचलली जातील अशी ग्वाही वर्धापन दिनाच्या निमित्ताने देण्यात आली आहे.

   आंबेकर यांच्या नावाने देण्यात येणारे पुरस्कार त्यांच्या स्मृती दिनी १३ डिसेंबर रोजी देण्यात येतील,त्यासाठी प्रस्ताव येत्या ३० ऑक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येतील, अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली.कार्यक्रमात‌‌ शाहीर रुपचंद चव्हाण यांनी बहारदार शाहिरी कार्यक्रम सादर केला•

टिप्पण्या