रोहित मुकाडे मृत्यू प्रकरणी अधीक्षक व मुख्याध्यापकावर माहूर पोलिसांत गुन्हा दाखल.

 

          राम दातीर 
  माहूर (प्रतिनिधी ) माहूर येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या रोहित प्रवीण मुकाडे या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचा मंगळवार दि.10 ऑक्टो.2023 रोजी सायं.7-30 च्या दरम्यान संशयास्पद मृत्यू झाला होता.त्या मृत्यूला जबाबदार धरून अधिक्षक बी. बी. वाकोडे व मुख्याध्यापक बी. एम. सोनटक्के यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे.तसेच नामदेव बळीराम मुकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिसांनी  वरील दोघां विरुद्ध हयगय व निष्काळजी केल्या प्रकरणी दि.11 ऑक्टो. च्या रात्रीला कलम 304 (अ ) व 34 नुसार गुन्हा दाखल केल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केल्या जात  आहे.
       दि.10 ऑक्टो. सायं.7-20 वा. मुख्याध्यापक व चौकीदाराने दुचाकीवर  बसवून रोहित मुकाडे या 8 वर्षीय विद्यार्थ्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला यवतमाळ येथे हलवीण्याचा सल्ला दिला.108 ही रुग्णवाहिका यवतमाळ कडे निघाली असता सुमारे दहा किमी अंतर कापल्यावर रुग्णवाहिके सोबत असलेले डॉ. राठोड यांच्या सल्ल्यावरून  रुग्णवाहीका परत माहूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आली. तिथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड यांनी त्याला मृत घोषित केले. सदरील घटनेने पालक, नातेवाईक व बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विनोद खूपसे यांचेसह आदिवासिंच्या विविध संघटना खवळल्या. रोहितचा मृत्यू ग्रामीण रुग्णालयात आणण्यापूर्वीच झाला असा आरोप करून दोशीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे शवविच्छेदन नांदेडला आणि तेही इनकॅमेरा करण्याचा स्थानिक प्रशासनाने  निर्णय घेतला.बुधवारला शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी रोहितचा मृतदेह शासकीय आश्रम शाळेच्या मुख्यदारात आणून ठेवला. यावेळी मोठ्या प्रमाणात जमलेला उग्र जमाव आश्रम शाळेवर चाल करून गेला. किनवटच्या तहसीलदार मृणाल जाधव, माहूरचे तहसीलदार किशोर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. शिनगारे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड व पो. नि. नितीन काशीकर यांनी जमावाला शांत केल्यानंतर उतररात्री दोन वाजताचे सुमारास रोहितचा मृतदेह घेऊन पालक व नातेवाईक आपल्या गावी गेले.वरिष्ठाच्या मार्गदर्शनात सबइन्स्पेक्टर आनंद राठोड हे पुढील तपास करीत आहेत.
 *इथे 1 ते 8 वी पर्यंत वर्ग असून 303 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पालकांनी आपल्या मुलाला नेल्याने आज रोजी एकही विद्यार्थी शाळेत नाही.* अशी माहिती प्रभारी मुख्याध्यापक माधव मरिबा कांबळे यांनी दिली.

टिप्पण्या