चिंतनाचे संचित: 'आजची मराठी बालकविता' वीरभद्र मिरेवाड, नांदेड.


बालसाहित्य, चरित्र, संपादन, संशोधन, समीक्षा, अनुवाद, शिक्षणविषयक चिंतन, शिक्षणविचार आदि क्षेत्रांत सहज संचार करत बालसाहित्यावरची आपली अढळ निष्ठा अभंग ठेवून बालसाहित्य प्रवाही ठेवण्याचं अतुलनीय कार्य डॉ. सुरेश सावंत यांनी अव्याहतपणे केलं आहे. आजही ती जबाबदारी ते निष्ठेने पार पाडताहेत! 

कोणतीही गोष्ट मनःपूर्वक केली की प्रवासाच्या वाटा सुखकर होतात. आपण घेतलेला ध्यास पूर्णत्वाला जातो आणि आपली उपासना सिद्धीस जाते, हे सावंतसरांना माहीत असल्यामुळे त्यांनी आपले पंचप्राण बालसाहित्यात ओतून आपली स्वतंत्र नामामुद्रा ठळक केली आहे. मराठी साहित्य प्रांतात त्यांची ५० पुस्तके प्रकाशित झाली असून ते शतकाकडे मार्गस्थ होत आहेत. बालकाचा हात हाती घेऊन त्याला कवितेच्या गावाला घेऊन जाण्याचा त्यांचा मार्ग अत्यंत सुखदायी , प्रेरणादायी आणि जीवनदायी आहे. नुकताच त्यांचा पुण्याच्या नामांकित अशा संस्कृती प्रकाशनाने 'आजची मराठी बालकविता' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित केला आहे.

सदर समीक्षाग्रंथात ज्येष्ठ साहित्यिक केशव बा. वसेकर आणि सौ. माया धुप्पड यांच्या समग्र बालकवितेवरचे अभ्यासपूर्ण लेख, 'नामदेवाची लेकरं आम्ही' या बबन शिंदे यांनी संपादित केलेल्या पुस्तकासाठी लिहिलेला अभिप्राय, उत्तम सदाकाळ यांच्या 'जंगलगाणी' ह्या बालकवितासंग्रहाला लिहिलेल्या पाठराखणीचे विस्तारित रूप आणि एकनाथ आव्हाड व सदानंद पुंडपाळ या दोन मान्यवर बालसाहित्यिकांच्या कवितासंग्रहासाठी लिहिलेल्या प्रस्तावना व स्वतंत्र 18 लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. यात बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते संजय वाघ , आबा महाजन, एकनाथ आव्हाड यांच्या कवितेवरही लेख आहेत.

पहिलाच लेख ज्येष्ठ साहित्यिक केशव बा. वसेकर यांच्या समग्र बालकवितेवर अभ्यासपूर्ण मांडणी करत डॉ. सुरेश सावंतसरांनी कवितेतील सामर्थ्यस्थळे आणि सौंदर्यस्थळे दाखवून दिली आहेत.

नातवाच्या रडण्यातही कवीला कवितेचे कडवे दिसते, कारण नातवंडं ही कवीसाठी एक चालतीबोलती आणि हसतीखेळती कविताच असतात. त्याचबरोबर साधी भिंगरी फिरवताना सुद्धा मिळणारा आनंद सोन्याची लंका जिंकल्याइतका होत असतो. त्या खेळापासून दुरावल्याचे दुःख कवीला अजूनही छळते आहे . कारण 'कालाय तस्मे नमः' म्हणण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही, असे म्हटले आहे. 

केशव बा. वसेकर यांच्या कविता लहानपणच्या, चांदवा, गाऱ्या भिंगोऱ्या, बाबाची काठी , हिरवा ऋतू , छुटकी आणि इतर कविता , बत्तीस तारीख, रानवारा, झाड आणि चिमणी या नऊ कवितासंग्रहांचा समीक्षणात्मक सुंदर परिचय डॉ. सावंतसरांनी करून दिलेला आहे. त्यांची परिचय करून देण्याची पद्धतच इतकी वाचनीय आहे की त्यामुळे लेखकाची मूळ कविता अधिक लोभसवाणी दिसते. प्रत्येक लेखाच्या शेवटी डॉ. सुरेश सावंत सरांनी स्वतःचे स्पष्ट मत नोंदवले आहे. वसेकर यांच्या बाबतीत ते लिहितात की आजवरची मराठी बालकविता ही शहरी बालवाचकांच्या अभिरुचीचे पोषण करणारी होती, परंतु केशव बा. वसेकर यांची संपूर्ण बालकविता ही ग्रामीण बोलीभाषेत अवतरली आहे. तसेच त्यांची कविता म्हणजे ग्रामीण खेळांचा काव्यमय कोश आहे.

खानदेशकन्या तथा लडिवाळ कवितेच्या धनी सौ. माया धुप्पड यांच्या 'पावसाची राणी' ते 'चिमणी उडाली भुर्र' अशा एकूण आठ कवितासंग्रहांविषयी महत्त्वाची निरीक्षणे सावंतसरांनी येथे नोंदवलेली आहेत. आकाशात खूप पक्षी उडतात मग त्यांची आपसात टक्कर का होत नाही? झाडावर अनेक पक्षी असतात, त्यांच्यात भांडणे का होत नाहीत ? फुलं आणि काटे एकत्र राहतात, मग फुलांना काटे का टोचत नाहीत? अशा बालकांना पडलेल्या प्रश्नांना डॉ. सुरेश सावंत यांनी कवितेतून मोठ्या खुबीने शोधून काढले आहे. माया धुप्पड यांची बालकविता कालानुक्रमे विकसित होत गेली आहे. कवयित्रीची सौंदर्यदृष्टी प्रत्येक कवितेला नित्यनूतनता प्रदान करणारी आहे. एखाद्या कळीचे रूपांतर सुंदर फुलात व्हावे, इतक्या स्वाभाविकतेने माया धुप्पड यांची कविता विकसित होत गेल्याचे सावंत सरांनी म्हटले आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारविजेते लेखक एकनाथ आव्हाड यांच्या 'शब्दांची नवलाई', 'आनंदझुला', 'छंद देई आनंद' आणि 'खरंच सांगतो दोस्तांनो' ह्या चार बालकवितासंग्रहांविषयीचे लेख यात समाविष्ट केलेले असून बालकुमारांसाठी निरंतर निष्ठेने आणि गुणवत्तापूर्ण लेखन करणारा लिहित्या हाताचा लेखक, असे एकनाथ आव्हाड यांचे सार्थ वर्णन सावंत सरांनी केले आहे. आव्हाडांची कविता एकरंगी व एकसुरी नसून काही एक विचार देणारी आहे. अक्षरयात्री एकनाथ आव्हाड यांना शब्दांचे श्रेष्ठत्व पुरतेपणी उमगल्याची खात्री सावंतसरांना वाटते. बालकांचे जगणं उन्नत करणारी बालकविता एकनाथ आव्हाडच देऊ शकतात, असा दावाही सावंतसरांनी या समीक्षाग्रंथात केला असून मनोरंजन आणि संस्कार हातात हात घालून कवितेत गुंफण्याचे सामर्थ्य आव्हाड यांच्या ठायी असल्याचे सावंत सरांनी म्हटले आहे. ज्ञानदायी आणि आनंददायी कविता निर्मितीसाठी एकनाथ आव्हाड यांचे सावंतसरांनी अभिनंदन केले आहे. 'मुलांचे चाचा, एकनाथकाका' असा गौरवपूर्ण उल्लेख करून आव्हाडांचे मोठेपण आणि लेखनाच्या मर्यादाही सावंतसरांनी दाखवून दिल्या आहेत.

ज्येष्ठ बालसाहित्यिक सदानंद पुंडपाळ यांच्या 'हिरवी राने, गाती गाणे' या बालकवितासंग्रहाचा परिचय करून देताना सावंतसरांनी माणूस सारा एक असा नेक संदेश देणारी कविता असल्याचे म्हटले आहे. 39 पुस्तके लिहून अजरामर झालेल्या कवयित्री निर्मला मठपती आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या 'अनमोल वेळ' या पुस्तकाविषयी सावंतसरांनी लेख लिहून मराठी साहित्यातील त्यांचे स्थान अधोरेखित केली आहे.

 114 पुस्तके प्रकाशित करून मुलांसाठी सातत्याने लिहीत राहणाऱ्या डॉ. भगवान अंजनीकर यांच्या 'किती सुंदर जग' या पुस्तकाचा परिचय करून देताना सावंतसरांनी असे म्हटले की, ही कविता रंजनप्रधान नसून कुमारांना क्रियाशील बनवणारी आहे. मुलांच्या डोळ्यात सुंदर जगाचे स्वप्न सजविणारी कृतिशील कविता आहे.

सुप्रसिद्ध लेखिका अंजली कुलकर्णी यांच्या 'जपून ठेवू सृष्टी', प्रा. लीला शिंदे यांच्या 'मुंगी निघाली एव्हरेस्टवर' ज्ञानदा आसोलकरांच्या 'आंबेवाले लोक'आणि गोविंद पाटील यांच्या 'थुईथुई आभाळ' ह्या कवितासंग्रहांविषयी या समीक्षाग्रंथात भरभरून लिहिलेले आहे. 

साहित्य अकादमी विजेते नाशिकचे कवी संजय वाघ यांच्या 'गाव मामाचं हरवलं' या काव्यसंग्रहाविषयीचे अप्रतिम लेखन या समीक्षाग्रंथात समाविष्ट आहे. कवितेतून कवीने स्वातंत्र्य, समता, नैतिकता, समानता आदि मूल्यांची रुजणूक अलवारपणे केल्याचे सरांनी म्हटले.

दुसरे साहित्य अकादमी पुरस्कारविजेते आबा महाजन यांच्या 'जॅक्रुला' या कवितासंग्रहाचाही परिचय करून दिला आहे. सूर्याला एक सायको बायको असली पाहिजे, पिशी मावशीची भिशी थेट काशीला जाते. 'जॅक्रुला' ही कवीने निर्माण केलेली अंधेरनगरी आहे. अशी महत्त्वपूर्ण नोंद नोंदवत आबा महाजन यांच्या कवितेचा अलवार पट सावंतसरांनी उलगडून दाखवला आहे

उत्तम सदाकाळ यांच्या 'जंगलगाणी', पंडित पाटील यांच्या 'गोड गाणी' , प्र.श्री.जाधव यांच्या 'गुणगुण गाणी', आनंद पुपलवाड यांच्या 'सुंदर हे जग', वीरभद्र मिरेवाड यांच्या 'आनंदाची फुलबाग' या कवितासंग्रहांवरची समीक्षा अधिक लक्षणीय आहे. पंडित पाटील यांची कविता बालकांविषयी वाटणाऱ्या नितांत आस्थेतून आलेली असून त्या 

बाळगोपाळाशी सतत बोलणाऱ्या वाटतात, तर आनंद पुपलवाड यांच्या कविता सौंदर्याचे वर्णन करणाऱ्या आणि सौंदर्याचा ध्यास घेतलेल्या टवटवीत बालकविता आहेत, अशी महत्त्वपूर्ण नोंद केली आहे.

सदाशिव पेठेतील शिक्षणतज्ज्ञ कै. सी. रा. तावडे यांनी ग. ह. पाटील हे आठवीत असताना 'फुलपाखरू' ही कविता लिहिण्याला प्रवृत्त करून तिचा समावेश 'आनंद' मासिकात कसा केला याची एक रंजक कहाणी सांगत 'मुग्धाच्या कविता' अर्थात मुग्धा उमेश घेवरीकर या विद्यार्थिनीच्या कवितासंग्रहाचे निरीक्षण

नोंदवत 'नामदेवाची लेकरं आम्ही' ह्या बबन शिंदे यांनी संपादित केलेल्या काव्यसंग्रहाविषयी 'हिंगोली जिल्ह्यातील प्रतिभेचे नवे क्षितिज' असा गौरवपूर्ण उल्लेख सरांनी केला आहे.

'आजची मराठी बालकविता' हा समीक्षक डॉ. सुरेश सावंत सरांनी निवडक आणि मोजक्या कवींच्या कवितासंग्रहांविषयी लिहिलेला महत्त्वाचा दस्ताऐवज असला, तरी त्यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे हा अभ्यास प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. आगामी काळात उर्वरित बालकवितेचा अभ्यास करून लेखन करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या इच्छापूर्तीस आणि भावी लेखनास हार्दिक शुभेच्छा!

वीरभद्र मिरेवाड

नायगाव

9158681302

'आजची मराठी बालकविता' (समीक्षा)

लेखक: डॉ.सुरेश सावंत

प्रकाशक: संस्कृती प्रकाशन , पुणे

मुखपृष्ठ: संतोष घोंगडे

पृष्ठे: 128 किंमत रु :200

टिप्पण्या