गोदी कामगारांचा बोनस करार १७ ऑक्टोबर व पगारवाढीची बोलणी ६ नोव्हेंबरला होणार*


भारतातील प्रमुख बंदरातील मान्यताप्राप्त कामगार महासंघांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची मिटिंग २३ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी चेन्नई येथे झाली. या मिटिंगमध्ये भारतातील प्रमुख बंदरात २६ ऑक्टोबर २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचे ठरले. त्याप्रमाणे पाचही महासंघाशी संबंधित युनियनने संपाची नोटीस आपापल्या बंदरातील चेअरमन यांना दिली. इंडियन पोर्ट असोसिएशन व द्विपक्षीय वेतन समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी संपाच्या नोटिसाला त्वरित प्रतिसाद देऊन द्विपक्षीय वेतन समितीची मिटिंग ६ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे घेण्याचे कळविले आहे. त्याचप्रमाणे बोनस करारावर १७ ऑक्टोबर २०२३ रोजी तुतिकोरीन येथे सह्या होणार आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी समिती स्थापन केली आहे. या सर्वांचा विचार करता व पुढील चर्चेसाठी औद्योगिक संबंध सलोख्याचे राहावेत, यासाठी कामगारांमध्ये असणारा असंतोष व्यक्त करण्यासाठी १७,१८ व १९ ऑक्टोबर २०२३ रोजी काळया फिती लावून होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचे ठरविण्यात आले आहे. अशी माहिती कामगार नेते सुधाकर अपराज व केरसी पारेख यांनी दिली.

भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगार पगारवाढ, पेन्शन व इतर सेवाशर्तीमध्ये वाढ करावी, या मागण्यांसाठी २६ ऑक्टोबरला संपावर जाणार होते. याबाबत मुंबई बंदरातील सर्व कामगार संघटनांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची संपाबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली ९ ऑक्टोबर २०२३ रोजी माझगाव येथील कामगार सदन सभागृहात मिटिंग झाली. 

याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, वेतन करार त्वरित करणे, पेन्शन समितीवर प्रत्येक फेडरेशनचा एक प्रतिनिधी घेणे, बोनस करार त्वरित करणे, कंत्राटी कामगारांना संघटित करणे, गोदी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत, इत्यादी कामगारांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. या मागण्यांबरोबरच गोदी कामगार लढाऊ आहेत. संघर्षाशिवाय आपल्याला न्याय मागण्या मिळणार नाही, त्यासाठी गोदी कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची काळाची गरज आहे. शेवटी कामगार एकजुटीचाच विजय होईल, असे विचार सर्वच कामगार संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, उपाध्यक्ष अहमद काझी, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख, खजिनदार कल्पना देसाई, कार्यकर्ते अनिल जाधव, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन व मुंबई पोर्ट ट्रस्ट एस.सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे विजय कांबळे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष संदीप चेरफळे इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. 

आपला 

मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या