रानफुलांसारखा मन मोहून टाकणारा बालकवितासंग्रह- 'रानफुले' कु. देशमुख शिवानी सूर्यकांत (वर्ग ६वा )


डॉ. सुरेश सावंत

सरांचा 'रानफुले' हा बालकवितासंग्रह मी नुकताच वाचलेला आहे. या संग्रहात एकूण ५७ कविता आहेत. त्यातील सर्वच कविता खूपच सुंदर आहेत. डॉ. सावंतसरांना अशा सुंदर कविता कशा सुचत असतील, असा मला प्रश्न पडतो. त्यांच्या बालकवितासंग्रहांची नावे खूपच भारी असतात! भुताचा भाऊ, काठीचा घोडा, नदी रुसली नदी हसली, गुगलबाबा, पळसपापडी असे असतात. मी वाचलेल्या बालकवितासंग्रहाचे नावही असेच सुंदर आहे, 'रानफुले'. म्हणजे रानातील फुले. जसे आपण बगीचामध्ये विविध फुलांची झाडे लावत असतो, तसे रानात कोणीही न लावता फुलांची झाडे येत असतात. त्यांना खूप सुंदर फुले येत असतात. तशाच या संग्रहातही त्या रानफुलांसारख्या छान छान कविता आहेत.

      

'बियाचे स्वप्न' या कवितेत बियापासून झाड कसे मोठे होते, ते कवीने सांगितले आहे. झाडावर चिमणीपाखरे असे विविध पक्षी येऊन बसतात. त्यामुळे झाडाला कवीने 'लेकुरवाळे झाड' म्हटले आहे. ते पक्षी तिथेच झोपत असतात, म्हणून कवी म्हणतात..

'झाड होते पक्ष्यांचे बाबा आणि आई 

रात्रीला झोपवते गाऊन अंगाई'. 

 आमच्या शाळेच्या वाटेवर असेच एक खूप मोठे चिंचेचे झाड आहे. त्यावर असे विविध पक्षी बसत असतात. ही कविता वाचल्यानंतर मला त्या मोठ्या झाडाची आठवण झाली.


'एकदा झाडांना फुटले पाय' ही कविता मला खूप आवडली. खरेच जर असे झाले तर कसे होईल? जंगलच एका ठिकाणी राहणारच नाही. त्याला हवे त्या ठिकाणी जाता येईल. मला तर ही कल्पना खूपच आवडली. 

'जांभूळबेट' ही कविता मला खूप आवडली. बेट म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील वस्ती. तिथे जांभळाची झाडे असतील, म्हणून कवीने त्याला जांभूळबेट असे नाव दिले असावे. जांभूळबेटावर एक परी येते आणि पोपटाच्या घरी जाते. पोपट तिला पाच जांभळे देतो आणि नाचायला सांगतो. परी छम- छम नाचू लागते आणि घामाघूम होते. तिच्यासोबत मोर आणि शंखशिंपलेही नाचायला लागतात. म्हणून कवी म्हणतो..

'जांभूळबेटावर परी छान रमली

नाचली, डुंबली परी नाही दमली'. 

एवढे नाचूनही परी दमली नाही, तिला एक खेकडा दिसला आणि त्या खेकड्याने परीचा घात केला, म्हणजेच तो तिला चावला आणि परी आभाळात उडून गेली.


'चांदोबाची तक्रार' या कवितेत चांदोमामा एक तक्रार करतो 

'चांदोमामा म्हणून तुम्ही 

मला बोलवत नाही आता

वेगवेगळे चॅनेल पाहून 

घरात झोपी जाता'. 

माझ्या लहानपणी अंगणात बाज टाकून चंद्राला व चांदण्याला पाहत पाहत आम्ही झोपी जात होतो. पण आता आम्ही टीव्ही पाहात, मोबाईल पाहात राहतो. रात्री खूप उशीरापर्यंत झोपत नाही. तीच तक्रार चांदोमामाने केली आहे. ही कविता वाचून मला एक गाणं आठवलं :

'चांदोबा चांदोबा रुसलास का

लिंबोणीच्या झाडामागे लपलास का

लिंबोणीचं झाड करवंदी

मामाचा वाडा चिरेबंदी'


 एक दुसरे गीत चांदोबाला पाहून लहानपणी आजी व आई मुलाला जेऊ घालताना म्हणायची 

'चांदोमामा चांदोमामा येऊन जा 

तूप रोटी खाऊन जा

 तुपात पडली माशी 

चांदोमामा राहिला उपाशी'. 

 ही कविता माझ्या मनाला खूप भावली. आपण आता चांदोमामाला बोलवत नाही. टीव्ही आणि मोबाईलच्या जमान्यात आपण चांदोमामाला विसरून गेलो आहोत. त्याच्याशी आपण लहानपणी गप्पा मारायचो, जर दिसत नसेल तर लपला असेल का? झाडांच्या मागे लपलास का? असे त्याला विचारायचो. आत्ता तर त्याला लपण्यासाठी झाडेही राहिली नाहीत. माझी आई मला सांगते की , "प्रत्येकांच्या अंगणात एक तरी झाड असायचे. पण आत्ता झाडंच नाहीत". म्हणून चांदोमामा म्हणतो, की तूपरोटी नाही तर नाही, निदान झाडे तरी लावा.


'वाऱ्या वाऱ्या' या कवितेत कवीने वाऱ्याशी बातचीत केली आहे. वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो. वाऱ्यासंगे झाडेही डोलू लागतात. वारा कधी एकाच दिशेने वाहत नाही. सर्वच दिशेने वाहत असतो. म्हणून कवी म्हणतो

'वाऱ्या वाऱ्या थांब गडे

 येशी, जाशी कुणीकडे?' 

वारा कुठून येत असेल बरे आणि कुठे जात असेल. मलाही असा प्रश्न पडत असे. मला तरी वाटायचे की आभाळात पंखा आहे की काय.


'आईच्या कुशीत' ही कविता मला खूप आवडली. या कवितेत आईचे प्रेम व्यक्त झाले आहे.

'आईच्या स्पर्शाने पळून जातो ताप

आईच्या कोर्टात सगळे गुन्हे माफ' 

घरातील सगळ्यात आवडती व्यक्ती कोण असेल, तर ती आई. आईच्या बोलण्यात किती किती गोडवा असतो! आईच्या हातचे सगळेच पदार्थ मला आवडतात. तिने पाठीवरून हात जरी फिरवला तरी किती मोठे सुख मिळते! आपण कितीही मोठी चूक केली, तरी आई माफ करत असते. पप्पाकडून काही पाहिजे असल्यास सगळ्यात पहिले आपण आईला सांगत असतो. म्हणून आई ही सगळ्यात आवडती व्यक्ती असते.


मला पावसात भिजायला खूप आवडते. पावसाचीही कविता या संग्रहात वाचायला मिळते.

'धो धो धो धो 

पाऊस येतो

कागदी होड्या

वाहून नेतो'. 

 पावसाळ्यात आम्ही कागदाच्या जहाजाचा खेळ खूप खेळतो. तो खेळताना आम्हाला खूप आनंद मिळतो. कोणाचे जहाज दूरपर्यंत जाते, ही स्पर्धा आमच्यात लागते. म्हणून मला ही कविता खूप आवडली.


या संग्रहातील सगळ्याच कविता खूप छान छान आहेत! गोड स्वप्न, संदेश, आळशी वानर , आंब्याची कोय लावते सोय, गांधीजींची माकडं, माझे आजोबा, वेंधळा कोण, छंद असावा याही कविता खूपच मस्त आहेत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप सुंदर आहे. त्यात एक मुलगा पंख पसरून आकाशात उडत आहे आणि तो चांदण्या पकडण्यासाठी जात आहे. किती सुंदर चित्र आहे! आणि त्यावर 'रानफुले' असे लिहिलेले आहे. खालच्या बाजूला कवीचे नाव लिहिले आहे. मुखपृष्ठ रमेश भरताल यांनी रेखाटले आहे. पाठपृष्ठावर फ. मुं. शिंदे यांनी पाठराखण लिहिली आहे. त्यात ते म्हणतात ,"रानफुले हा बालकवितासंग्रह म्हणजे मुलांची लोकशाही आहे". या संग्रहाच्या सुरुवातीला प्रा. विश्वास वसेकर सर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. 


पुस्तकाच्या शेवटी मान्यवरांचे अभिप्राय छापले आहेत. त्यात वि. वा. शिरवाडकर, यदुनाथ थत्ते, मंगेश पाडगावकर, आमच्या मराठीतील 'गवतफुला रे गवतफुला' या कवितेच्या कवयित्री इंदिरा संत, शांता ज. शेळके, शंकर सारडा, नारायण सुर्वे, इंद्रजीत भालेराव, दासू वैद्य अशा अनेक नामवंत लेखकांनी या कवितासंग्रहाविषयी अभिप्राय लिहिले आहेत. शेवटी डॉ. सुरेश सावंत सरांचा पूर्ण परिचय, आतापर्यंत प्रकाशित झालेली त्यांची पुस्तके आणि त्यांना मिळालेले पुरस्कार यांची माहिती दिलेली आहे.


बालकवितासंग्रह :- रानफुले 

कवी :- डॉ. सुरेश सावंत 

प्रकाशन :- संगत प्रकाशन नांदेड 

पृष्ठे :- ९६

मूल्य :-१२० रु

------------------------------------------

 नाव :- देशमुख शिवानी सूर्यकांत

 वर्ग :-६ वा

शाळा :- श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येवती ता . मुखेड जि. नांदेड.

टिप्पण्या