दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान पूर्वतयारी उपक्रमात जिल्ह्यातील 598 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

 

नांदेड दि. 18, येथील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड, स्वरुप चॅरिटेबल फाउंडेशन व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 17 व 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय शिबिरात श्रवणयंत्र, एम.आर.किट व वॉकरचे वितरण करण्यात आले आहे.

          राज्याच्या विविध जिल्ह्यात “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातही लवकरच दिव्यांगकल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या दिव्यांगापर्यंत शासकीय योजना व साहित्य पोहचावे असा प्रशासनाचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान पूर्वतयारी उपक्रमाअंतर्गत आर आर मालपाणी मतिमंद विद्यालयात मंगळवार दि 17 व 18 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

          यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजितकौर जज, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, वै.सा.का. संजय गोडगोडवार, कुलदिप कलूरकर, विजयसिंह ठाकूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक विजय कान्हेकर, समन्वयक डॉ. अनिल देवसरकर, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, संचालक अंकित अग्रवाल, द्वारकादास लड्डा, मुख्याधापक नितिन निर्मल आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी केरलाचे सुरेश जे पिल्लाई, दिल्लीचे रवी शर्मा, कलकत्याचे सुरजित पेन व पुणे येथील सागर कान्हेकर यांनी दिव्यांगांच्या साहित्याची जोडणी करून साहित्याचे वाटप केले. यात 262 कर्णबधीर विद्यार्थ्यांना 524 श्रवणयंत्र, 315 गतिमंद विद्यार्थ्यांना दोघात एक असे 159 एम. आर. कीट व 21 अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना वॉकरचे वितरण करण्यात आले. वितरण केलेल्या साहित्याचा वापर विद्यार्थ्यानी नियमित करावा याची जबाबदारी शिक्षक व पालक या दोघांचीही असल्याचे प्रतिपादन यावेळी केरलाचे सुरेश पिल्लाई यांनी केली. शिबिरात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. साहित्य वाटपाचे शिबीर यशस्वी करण्यासाठी वसतिगृह अधीक्षक संजय शिंदे यांच्यासह आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्रीरामप्राताप मालपाणी मुकबधीर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या