स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकनाला (नॅक) आज दि. ०८ एप्रिल पासून सुरुवात झालेली आहे. दि. ०८ ते १० एप्रिल असे तीन दिवस चालणाऱ्या या पुनर्मूल्यांकनासाठी पाच सदस्यीय समिती आलेली आहे. सर्वप्रथम या समितीने विद्यापीठांमध्ये आल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामास सुरुवात केली आहे.
बेंगलोर येथील राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद कार्यालयामधून पाच सदस्यीय नॅक पिअर टीम आज विद्यापीठामध्ये दाखल झालेली आहे. या समितीचे चेअरमन सिक्किम राज्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. गोपाल कुमार निराऊला चेस्ट्री हे आहेत. त्यांच्या समवेत समिती समन्वयक गोवा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. गौरीश नाईक, ग्वालीयर येथील माजी प्रो. डॉ. लक्ष्मीनारायण सरकार, तामिळनाडूतील अण्णामलाई विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रो. डॉ. शील्ला बुटची नागेश्वरराव आणि पंजाबी विद्यापीठाचे प्रो. डॉ. गुलशन बसंल यांचा समावेश आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रथम नॅक पिअर टीमचे स्वागत केल्यानंतर या टीमसमोर विद्यापीठाबाबतची इंत्यभुत माहिती सादर केली. समितीद्वारे अधिष्ठाता, अभ्यासमंडळ आणि विभाग प्रमुख यांच्यासमवेत बैठका घेऊन विद्यापीठाच्या अनेक पैलूंवर चर्चा झाली. विद्यापीठ परिसरातील अनेक संकुलांना त्यांनी भेटी दिल्या. विद्यापीठातील परीक्षा विभाग, इंक्युबॅशन सेंटर, कोव्हीड-लॅब, मीडिया स्टुडीओ येथील इत्यादी परिसरातील विभागांना त्यांनी भेटी दिल्या. विद्यापीठातील शिक्षक आणि संशोधक विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली. अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांना विचारले आणि विद्यापीठाच्या वाढत्या विकासावर समाधान व्यक्त केले. दिवसाच्या शेवटी नॅक पिअर समितीसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारांतर्गत लावणी, वासुदेव, दिंडी, गोंधळ, शेतकरी, तांडव नृत्य इत्यादी द्वारे महाराष्ट्रातील अनेक संस्कृतीचे दर्शन त्यांना झाले. दि. ०९ व १० एप्रिल दरम्यान नॅक पिअर टीम विद्यापीठातील उर्वरित विभागांना भेटी देणार आहे. तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकांची बैठक घेऊन चर्चा करणार आहे. लातूर येथील उपपरिसरालाही भेट देणार आहे.
कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि नॅक समन्वयक डॉ. डी. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील सर्व संचालक, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा