दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीला सासरी सोडण्यासाठी जाणाऱ्या पित्याचा अपघातात मृत्यु; तेलगाव येथील कारखाना परिसरातील दुर्दैवी घटना*


 


 


माजलगांव/प्रतिनिधी


         दिवाळी सणासाठी माहेरी आलेल्या मुलीला धारूर येथे सासरी सोडवण्यासाठी मोटारसायकलवर घेऊन जात असलेल्या पित्याच्या दुचाकीला भरधाव क्रुझर गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वडिलाचा मृत्यु झाला. तर मुलगी जखमी झाली. सदर अपघात मंगळवारी दुपारी तेलगाव येथील सोळंके कारखाना परिसरात घडला. 


           यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील बाबुलतारा येथील रहिवासी असलेले बालासाहेब निवृत्ती घोलप यांची धारूर येथे दिलेली मुलगी दिवाळी सणासाठी माहेरी बाबुलतारा येथे दिवाळी पुर्वी आली होती. दिवाळी सण झाल्यानंतर मंगळवारी आपल्या मुलीला सासरी धारूर येथे सोडण्यासाठी बालासाहेब घोलप हे मोटारसायकल क्र.MH-२३ AL६०५८ ने जात असताना तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात धारूरकडुन  भरधाव वेगात येणाऱ्या क्रुझर जीप क्र.MH- १९ AX९५१८ या गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात घोलप यांच्या डोक्यास जबर मार लागुन त्यांच्या कानातुन रक्तस्ञाव झाला. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी मदत करत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या घोलप यांना तात्काळ तेलगाव येथील दवाखान्यात पाठवले. मात्र त्यांच्या कानातुन जास्त रक्तस्ञाव होत असल्याने  पुढील उपचारासाठी त्यांना माजलगांव येथे हलवण्यात आले. परंतु दवाखान्यात जाण्या पुर्वीच घोलप यांचे निधन झाल्याचे समजते. तर त्यांची मुलगी जखमी झाली असुन, तिच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. 


 


मुलीला सासरी सोडण्यासाठी जाणाऱ्या पित्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


या प्रकरणी काल बुधवार दिनांक १८ रोजी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस हे.काॅ.भालेराव व त्यांचे सहकारी करत आहेत. 


टिप्पण्या