महाराष्ट्रातील काही भाजप आमदार  आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे कळली तर महाराष्ट्रात भूकंप होईल मंत्री यशोमती ठाकूर

 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आहे. त्याला कोणताच धोका नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील काही भाजप आमदार  आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे कळली तर महाराष्ट्रात भूकंप होईल, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण (Yashomati Thakur) यांनी केला आहे. यासोबतच आमच्यातील कोणी आमदार फुटणार नाही. जर कोणी फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही बदडून काढू असेही यशोमती ठाकुर यांनी म्हटले आहे.


 


यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ठाकुर यांनी म्हटले आह की, 'देशभरात विरोधी पक्षांची सरकारं अस्थिर केली जात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते सतत विचारत राहतात महाराष्ट्रात काय होईल?माझं सर्वांना सांगणं आहे राज्यातलं सरकार स्थिर आहे. कुणी हे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे.आमचे कुणी फुटणार नाहीत, उलट 105 पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल', असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.


 


'कर्नाटक, मध्यप्रदेश आता राजस्थानमध्ये भाजपने राजकारणाचा खेळ आणि घाणेरडा खेळ सुरुच ठेवला आहे. शेणातला किडा जसा शेणातच राहतो तसं भाजपचं झालं आहे. केंद्रामध्ये यांना इतकी मोठी सत्ता मिळाली आहे. तरीही यांची सत्तेची भूक भागत नाही. त्यांना राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची हाव आहे. विविध राज्यांमध्ये आलेल्या विरोधी पक्षांचे सरकार अस्थिर करण्याचा पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे', असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.


 


 


 


महाराष्ट्रामध्ये सत्तेचा नवा फॉर्म्यूला तयार झाला आहे. मला वाटतं हा फॉर्म्यूला चांगला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होणार नाही. ते स्थिरच आहे. आज विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री ज्यांना घेऊन फिरत आहेत ते सर्व लोक बाहेरुन आले आहेत. इतर पक्षांतून त्यांच्या पक्षात गेलेले आहेत. त्यामुळे यांचा पक्ष किती कमजोर झाला आहे, हे यातून दिसते.105 पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील. याबद्दल तुम्ही हमी देऊ शकत नाही. उलट 105 पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल. जे गेलेत ते परतही येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही खबरदारी घ्या. उगाच अफवांना खतपाणी घालू नका, असेही ठाकुर यांनी म्हटले आहे.


दरम्यान, आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला तुकोबांकडून मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्ययाशी आहे लक्षात ठेवा, असेही यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षांना ठणकावून सांगितले आहे.


टिप्पण्या