आठवणींच्या हिंदोळ्यावर' : बालकुमारांची प्रांजळ शब्दचित्रे           डॉ. सुरेश सावंत, नांदेड

◾पुस्तक परिचय :◾


 


'आठवणींच्या हिंदोळ्यावर' : बालकुमारांची प्रांजळ शब्दचित्रे 


       डॉ. सुरेश सावंत, नांदेड


 


 



भाषाशिक्षणाचे स्वरूप आता पूर्णत: बदलले आहे. पूर्वी पाठांतरावर भर दिला जात असे, आता आकलनावर भर दिला जातो. पूर्वी अभिरूचीवर भर दिला जात असे. आता विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीवर भर दिला जातो आहे. विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती विकसित करायची, तर त्यांचे भाषण आणि लेखनकौशल्य विकसित करण्यावर भर द्यायला हवा. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या अंगी अपेक्षित भाषिक कौशल्ये येणारच नाहीत.


 


विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्यांना प्रेरणा देऊन त्यांचा लेखनगुण विकसित करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल ह्या शाळेने वेगवेगळे अभिनव उपक्रम आयोजित केले आहेत.


1) 'दप्तरातील चारोळ्या' हा चारोळीलेखनाचा उपक्रम,


2) 'प्रतिज्ञामंत्र' हा वेगवेगळ्या प्रतिज्ञा लेखनाचा उपक्रम, आणि


3) 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा बालकुमारांच्या अनुभवकथनांचा नावीन्यपूर्ण उपक्रम.


ह्या तीन उपक्रमांच्या माध्यमांतून ह्या शाळेने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीची वेगळी पायवाट शोधून काढली आहे. एक पद्यात्म आणि दोन गद्यात्म असे हे लेखनविकासाचे मौलिक असे उपक्रम आहेत. पहिल्या दोन उपक्रमांची आणि त्यातून आकारास आलेल्या पुस्तकांची मी यापूर्वीच ओळख करून दिली आहे. आज तिसऱ्या उपक्रमाविषयी आणि ह्या उपक्रमातून आकारास आलेल्या पुस्तकाविषयी... 


 


आधीच्या दोन पुस्तकांप्रमाणेच ह्या पुस्तकाचेही संपादन संजय गोपाळ साबळे ह्या उपक्रमशील शिक्षकाने केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे हे तिसरे पुस्तक कोल्हापूरच्या अभिनंदन प्रकाशनाने जुलै २०१९ मध्ये प्रकाशित केले आहे.


विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याचा कंटाळा येऊ शकतो, पण असे आवडते, मनातले लेखन करायला सांगितले, तर विद्यार्थी मनापासून आणि आवडीने लिहितात, असा नेहमीचा अनुभव आहे. 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' ह्या पुस्तकातील अनुभव विद्यार्थ्यांनी अतिशय समरसून आणि उत्कटतेने लिहिले आहेत.


हे सर्व लेखन कथा, गुजगोष्टी, लघुनिबंध, ललितगद्य यांच्या सीमारेषेवर रेंगाळणारे आहे. ह्या लेखनाने वाङ्‌मयप्रकारांची प्रचलित चौकट मोडली आहे.


 


 ह्या पुस्तकाचे संपादक संजय साबळे यांनी एकदा गप्पांच्या ओघात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या बालपणातील काही संस्मरणीय प्रसंग सांगितले. विद्यार्थ्यांनी ते कान टवकारून ऐकले. कारण विद्यार्थ्यांना उपदेश मुळीच आवडत नाही, पण मित्रत्वाच्या पातळीवरचा सुखसंवाद फार आवडतो. त्याच्याशी ते फार लवकर समरस होतात. त्यांना आपले सहसंवादी शिक्षक हे मित्रच वाटू लागतात. शिक्षकाने हिकमतीने बाळगोपाळांच्या मनात प्रवेश मिळविला ,की मग ते आपले मन मोकळे करायला तयार होतात. बालस्नेही साबळेसरांना मुलांच्या मनात प्रवेश करण्याची सिद्धी गवसली आहे, असे दिसते.


 


सरांच्या आठवणी ऐकून मुलामुलींनी लगेच प्रश्न विचारला, ''सर, आमच्या आठवणी एकत्र करून पुस्तकरूपाने संग्रहित का करत नाही?'' 


सामान्यत: शिक्षक विद्यार्थ्यांना कामाला लावतात. इथे तर विद्यार्थ्यांनीच शिक्षकाला कामाला लावले. अर्थात साबळे सरांसाठी ही इष्टापत्तीच होती. संजय साबळे यांनी विद्यार्थ्यांच्या बालपणातील आठवणी संपादित करून 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हे पुस्तक सिद्ध केले आहे. १३६ पृष्ठांच्या ह्या पुस्तकात सातवी ते दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या ४२ विद्यार्थ्यांच्या बहुरंगी, बहुढंगी आणि ललितरम्य आठवणी आहेत. हा एक आठवणींचा चित्ताकर्षक कोलाज आहे. 


'हिंदोळा' म्हटला की तो मागे-पुढे होणारच. हिंदोळा वर चढताना पोटात गुदगुल्या होणारच आणि हिंदोळा वेगाने खाली उतरताना पोटात भीतीचा गोळा उठणारच! तसाच काहीसा अनुभव ह्या आठवणी वाचताना येतो. कधी सुख तर कधी दु:ख, आनंद, भीती, हर्ष-खेद, घोर, चिंता, काळजी, वियोग, अपेक्षाभंग तर कधी गंभीर प्रसंग अशा विविध भावभावनांची सरमिसळ ह्या आठवणींमध्ये पाहायला मिळते.


 


'महापुरातील आनंद' ह्या पहिल्याच आठवणीत कु. सानिका जांभळे हिने ताम्रपर्णी नदीला आलेला पूर पाहण्याचा प्रसंग वर्णन केला आहे. घरी कुणालाही पत्ता न लागू देता असे रोमांचकारी अनुभव लुटायला बाळगोपाळांना फार आवडते. सानिका आणि तिच्या मैत्रिणींनी हा आनंद लुटला खरा, पण मैत्रीण प्रियाचे घड्याळ हरवल्यामुळे त्यांच्या आनंदाला गालबोट लागले. सानिकाने लेखाचा समारोप काव्यमय ओळींनी केला आहे. ती लिहिते-


'जीवन बदलण्यासाठी वेळ


सगळ्यांनाच मिळत असते, पण


वेळ बदलण्यासाठी दोन वेळा


जीवन नाही मिळत


म्हणून नेहमी आनंदाने जीवन जगा!'


 


ऋषीकेश कुंभीरकर हा विद्यार्थी एकदा शाळेत चक्कर येऊन पडला. ही गोष्ट समजताच त्याच्या आईची किती घालमेल झाली याचे वर्णन त्याने 'आई : मायेचा सागर' ह्या लेखात केले आहे. देवाला प्रत्येक घरी जाता येत नाही, म्हणून त्याने प्रत्येकाच्या घरी आई पाठविली, हे ऋषीकेशला त्या दिवशी पटले. त्याने आपल्या लेखाचा समारोप फ.मुं. शिंदे यांच्या 'आई' कवितेतील ओळींनी केला आहे.


 


कु. सिद्धी नीळकंठ ही सातवीची विद्यार्थिनी एकदा आई-वडलांसोबत एका लग्नाला गेली होती. तिथे ती गर्दीत हरवली. त्या संदर्भात सिद्धी म्हणते, 'बालपण म्हणजे संकटाला मात कशी द्यायची, हे शिकायचं वय'.


पृथ्वीराज जुवेकर याने एक मांजराचे जखमी पिलू पाळले होते. त्याचे नाव ठेवले होते मन्या. मन्याचा त्याला चांगलाच लळा लागला होता. एका अपघातात मन्या अचानक मरून पडला. त्या दु:खाने पृथ्वीराज दोन दिवस जेवला नाही. पृथ्वीराज आजही जेव्हा शाळेतून घरी येतो, तेव्हा त्याला आपल्या पायात मन्या लोळत असल्याचा भास होतो. 'आमचा मन्या' ह्या निबंधात पृथ्वीराजने वियोगाची आपली उत्कट भावावस्था फार छान मांडली आहे.


 


लहानपणी लेकरांना पेन्सिल, कलम यासारख्या वस्तू नाकात-कानात घालण्याची फार वाईट सवय असते. कु. स्नेहा प्रभळकर हिने आपल्या ह्या खोडीची आणि त्यातून झालेल्या फजितीची प्रांजळ कबुली 'पेन्सिल, दप्तर आणि मी' ह्या लेखात दिली आहे. दोन मैत्रिणींच्या दप्तरांचे बंध एकमेकींना बांधण्याचा खोडकरपणा आणि वर्गात सर शिकवत असताना मुलींना हळूच चिमटे काढण्याचा उद्योग केल्याचेही स्नेहाने प्रांजळपणे कबूल केले आहे. स्नेहाचा हा बहिर्मुख स्वभाव वाचकाला आवडून जातो.


 


'वृक्ष माझा सखा' ह्या निबंधात दिग्विजय दळवी याने बालपणातील असाच एक पश्चात्तापाचा किस्सा सांगितला आहे. शेतात खेळत असताना त्याच्या हातून चुकून आंब्याची आणि काजूची कोवळी रोपे मोडली व बाद झाली. याचे त्याला फार वाईट वाटले. तो रडू लागला. वडिलांनी त्याला समजावून सांगितले. शेवटी त्याने लिहिले आहे, 'आपल्या आयुष्यात जशी जवळची माणसे आनंद व प्रकाश देतात, तसेच वृक्षसुद्धा सुख देतात.'


'नाही घर नाही दार


ज्यास नाही रे माऊली


अशा अभागी जीवाला


झाड देते रे सावली'


ह्या ओळींनी लेखाचा समारोप केला आहे.


 


कु. अनहा नाईक हिने 'पुनर्जन्म' ह्या लेखात पाळलेल्या सोनी मांजराशी जुळलेले भावबंध उलगडून दाखविले आहेत. अनहाला सोनीचा खूपच लळा लागला होता. ती सोनीचा वाढदिवसही साजरा करत असे. तिला फ्रेंडशिप डेचा बॅंड बांधत असे. हिवाळ्यात सोनीला थंडी वाजू नये, म्हणून तिने कोट शिवला होता. एकेदिवशी सोनी अचानक बेपत्ता झाली, ती कायमचीच! तशी काळी मांजर पुन्हा कधी दिसली, तर सोनीचा पुनर्जन्म झाला असेल असे अनहाला वाटते. आपल्याला अनुभव आल्याशिवाय माणसाला दुसऱ्याचे दु:ख समजत नाही, असे छान वाक्य अनहा लिहून जाते.


 


'बालपण : एक उमलतं फूल' ह्या निबंधात कौस्तुभ गुरव याने घरच्यांची नजर चुकवून नदीवर पोहायला जाण्याचा आणि पाण्यात बुडण्याचा भयप्रद प्रसंग कथन केला आहे. पोरवयातील धाडस कसे जिवावर बेतू शकते, याविषयीचा कौस्तुभचा अनुभव फारच बोलका आहे.


सिद्धार्थ कांबळे याने 'माझं क्रिकेटवेड' ह्या निवेदनात 'अति तिथे माती' हाच अनुभव सांगितला आहे. सिद्धार्थला क्रिकेटचे वेड इतके भारी की त्याला स्वप्नही फक्त क्रिक्रेटचीच पडायची. त्याने टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहताना खेळाडूने षटकार मारल्यावर हातातील मूठभर चिवडा टीव्हीवर फेकून मारला होता. कारण त्याचे लक्ष खाण्यात नव्हते, तर खेळण्यात होते. बॅटने दगड मारण्याची त्याला वाईट सवयच जडली होती. त्यामुळे एक माणूस गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या वडलांनी त्याची बॅट, स्टंप चुलीत जाळून टाकले. क्रिकेटर बनायचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.


 


'मी अनुभवलेला पाऊस' ह्या लेखात मुदस्सर सय्यद याने आपले पावसात भिजण्याचे वेड वर्णन केले आहे.


कु. मानसी कांबळे हिने 'वेड सिनेमाचं' ह्या निबंधात चित्रपटात काम करण्याचा आपला पहिलावहिला अनुभव कथन केला आहे. त्यात ती म्हणते, 'आपण आपल्या आयुष्याचे नायक-नायिकाच असतो', हे अगदी खरे आहे!


'आठवणीतील सहल' ह्या लेखात कु. ऋतुजा फाटक हिने आपल्या शैक्षणिक सहलीचा रोमांचकारी अनुभव सांगितला आहे. तिचा पहिल्यांदाच उंटावर बसण्याचा अनुभवही मजेशीर आहे. 'लहान मुलांना सांभाळणे एवढे सापे नाही, हे ह्या दिवशी सरांच्या चांगलेच लक्षात आले', असे एक वाक्यही ऋतुजा सहज लिहून जाते.


 


एकदा शाळेतील आकर्षक वेषभूषा स्पर्धेत तेजसचा पहिला क्रमांक आला. ती झाशीची राणी लक्ष्मीबाई बनली होती. स्पर्धेच्या पूर्वतयारीची कहाणी कु. तेजस पेडणेकर हिने 'माझी स्पर्धा माझ्याशीच!' ह्या आठवणीत सांगितली आहे. बालकुमारांसाठी जिंकण्याचा अनुभव किती प्रेरणादायी आणि अविस्मरणीय असतो, हे या प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. कु. श्रेया धायगुडे हिने तिला पडलेले 'गंमतीदार स्वप्न' सांगितले आहे.


कु. संध्या सरोळकर हिला चौथीपासून डायरी (दैनंदिनी) लिहायची सवय आहे. त्यात तिने भैरव या वर्गमित्राची भयपटात शोभण्यासारखी कशी फजिती झाली, याचा रंजक किस्सा सांगितला आहे. शिवराज येणेचवडी याने एका 'रम्य पहाटेचे' प्रसन्न, चित्रदर्शी आणि प्रत्ययकारी वर्णन केले आहे.


 


कु. सायली किरमटे ही एकदा मैत्रिणींसह ओढ्याला आलेला पूर पाहायला गेली होती. खोटे बोलल्यामुळे तिला वडिलांची बोलणी खावी लागली होती. आईचा मारही खाल्ला होता. हे असे व्हायचेच!


रामूकाकांची बैलजोडी म्हणजे 'गावची शान' होती. रामूकाका पोळ्याच्या दिवशी नदीत बैल धूत असताना ती बैलजोडी येसणीत शिंग अडकून नदीत बुडाली. तो हृदयद्रावक प्रसंग कु. प्राची गोंधळी हिने साक्षात केला आहे.


'लहानपण दे गा देवा' हा ह्या पुस्तकातील प्रत्येक लेखनाचा गाभा आहे. ह्याच शीर्षकाच्या निबंधात कु. हर्षदा गावडे हिने बालपणातील गंमतीजमती सांगितल्या आहेत. तिच्या लेखनात 'खायला आधी, झोपायला मधी आणि कामाला कधीमधी' किंवा 'नकटं व्हावं ग बाई, पण धाकटं होऊ नये' ह्यासारख्या लोकोक्ती सहजच येतात. कुलकर्णीबाईंचे डोळे मांजरीसारखे मोठे असल्यामुळे हर्षदाने त्यांना 'मांजरेबाई' असे टोपणनाव दिले होते. एकदा एका कार्यक्रमात हर्षदाने चक्क 'कुलकर्णीबाईंचा पाळणाच' सादर केला. त्यावेळी बाई किती चिडल्या असतील, हे सांगायलाच नको!


 


लहानपणी मुले कुत्र्यामांजरांना विनाकारण दगड मारून जखमी करतात. याविषयीचा एक किस्सा 'भूतदया' ह्या लेखात प्रथमेश बल्लाळ याने वर्णन केला आहे. एकदा प्रथमेशच्या सायकलखाली एक कुत्री जखमी झाली. ते पाहून त्याच्या डोळ्यांत पाणी आले. यातून प्रथमेशची सहृदयता आणि संवेदनशीलता दिसून येते. तो लिहितो, 'प्राण्यांवर प्रेम केले की ते माणसाळतात. माणसं एकमेकांना दगा देतात, पण प्राणी दगा देत नाहीत.' प्रथमेशचे हे निरीक्षण फारच पोक्तपणाचे आहे.


 


आजी-आजोबा म्हणजे बाळगोपाळांचे अपील कोर्ट असते. आई-वडील रागवत असतील, मारत असतील तर हेच आजी-आजोबा ढाल बनतात. श्रीमान नारायण चौगुले याने 'माझी आजी' ह्या लेखात दिवंगत आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


'पिंजरा' ह्या टिपणात कु. सानिका कांबळे हिने पाळलेल्या पोपटाच्या रम्य आठवणी सांगितल्या आहेत. तन्मय पेडणेकर याने आपल्या पहिल्या भाषणाची आनंददायी आठवण सांगितली आहे. 'झोपाळ्यावरचा थरार' ह्या निबंधात सर्वेश बेर्डे याने गावच्या जत्रेचे हुबेहूब वर्णन केले आहे. कु. दीक्षा कांबळे हिने पावसात कर्दळीच्या पानांची छत्री केल्याचा तरल अनुभव कथन केला आहे. कु. अंकिता गावडे हिने चुलत भावाच्या मृत्यूचा हृदयद्रावक किस्सा सांगितला आहे.


 


 सुमित गुरव याच्या 'एक डाव लपाछपीचा' ह्या कथेत डाव चुकविण्यासाठी नाटक करणारा ढोंगी बबन भेटतो.


'संस्कार' ह्या लेखात कु. आदिती हदगल हिने आईच्या संस्कारांची मालिकाच गुंफली आहे. कु. सायली परीट हिने 'मनाची अस्वस्थता' ह्या लघुनिबंधात वडिलांच्या आजारपणात भीतीने व चिंतेने उडालेली गाळण याचे वर्णन इतक्या बारकाईने केले आहे की प्रौढ वाचकही श्वास रोखून वाचत राहतो. 'वायरमन' ह्या लेखात कु. अपूर्वा जाधव हिने 'गुड टच आणि बॅड टच' चे वर्णन मोठ्या धिटाईने केले आहे. गालगुच्चा घेणाऱ्या त्या वायरमनला अद्दलही घडविली आहे.


 


'आठवणीतील एक पक्षी' ह्या लेखात कु. अंकिता तांबाळकर हिने दोऱ्यात अडकलेला पक्षी आणि तिने त्याची केलेली सुटका याचे वर्णन अतिशय संवेदनशीलतेने केले आहे. अनिकेत भोंगाळे याने 'आमची पार्टी' ह्या लेखात फसलेल्या पार्टीचा रंजक किस्सा रंगवून सांगितला आहे. ओमकार पाटील याने 'डुबकी' या कथेत नदीत पोहत असताना जिवावरचे संकट कसे ओढवले, याचे चित्रदर्शी वर्णन केले आहे. शुभम सुतार याने वनभोजनाचा अनुभव सांगितला आहे. त्यात बालसुलभ अवखळपणा आहे. 


 


दारूड्याच्या बिडी पिण्यामुळे लागलेल्या विनाशकारी आगीचे वर्णन कु. समीक्षा मासरणकर हिने केले आहे. कु. संजीवनी मुर्डेकरच्या निबंधात 'कळतं पण वळत नाही' हा सूर आहे. कु. तन्वी गावडे हिने नकोशा बालविवाहाची गोष्ट सांगितली आहे. बाळगोपाळांनी ह्या गोष्टी अगदी तारीखवार सांगितलेल्या असल्यामुळे यात कमालीची वस्तुनिष्ठता आहे.


कु. निकिता गावडे हिने पाहिलेल्या अपघाताचे केलेले वर्णन काळजाचा ठाव घेणारे आहे. कु. साक्षी शिंदे हिने लग्नपंगतीत जेवणाचा अपमानकारक अनुभव सडेतोड शब्दांत गुंफला आहे. कु. स्वप्नाली गावडे हिच्या मैत्रिणीच्या मृत्यूचा तिने सांगितलेला अनुभव हृदय विदीर्ण करणारा आहे. कु. वैष्णवी चौकुळकर हिने दारूड्याला जी अद्दल घडविली त्यातून तिची हिंमत, प्रसंगावधान, समयसूचकता आणि धीटपणा दिसून येतो.


 


हे सगळे २ ते ४ पृष्ठांत व्यक्त झालेले सुख, दु:ख, आनंद, घोर, चिंता, काळजीे, अवखळपणाचे प्रसंग आहेत. मुलामुलींच्या ह्या आठवणी जशा शाळेतल्या आहेत, तशा शाळेबाहेरच्या जगातल्याही आहेत. ह्या लेखनात चित्रमयता आहे, काव्यमयता आहे, नाट्यमयता आहे, उत्कंठावर्धकता आहे, नेमकेपणा आहे, वर्णनात्मकता आहे आणि बालसुलभ संवेदनशीलता आहे. ह्या बालकुमारांच्या शब्दांचे सामर्थ्य असे की ह्या वर्णनातून 'ते' चित्र वाचकांच्या मन:पटलावर जिवंत होऊन उमटते. ह्या लेखनाच्या निमित्ताने बालमनात, स्मरणात रुतून बसलेल्या कटुगोड अनुभवांची ही एक प्रकारची उजळणी आहे. यात कुठेही साचेबद्धपणा नाही. हे सगळेच अनुभव आणि कथनही रोमांचकारी आहे. हे काळजातले अनुभव कागदावर उतरवून विद्यार्थ्यांनी आपले मन मोकळे केले आहे.


 


विद्यार्थ्यांच्या ह्या लेखनात खळाळत्या निर्झरासारखा स्वाभाविक ओघ आहे. बालसुलभ हळवेपणा आहे. ह्या मुलांनी कुठलीही पोझ न घेता हे लेखन केलेले असल्यामुळे ह्या लेखनात उपदेशाचा अभिनिवेश नाही. यात कुणीही कुणाची नक्कल केलेली नाही. प्रत्येकाचा अनुभव निराळा आहे आणि प्रत्येकाची कथनशैलीही स्वतंत्र आहे. ह्या लेखनावर कोणाचाही प्रभाव नाही किंवा कोणाचाही दबाव नाही. त्यामुळे या लेखनात रानवाऱ्याची स्वाभाविकता आहे. ह्या लेखनात संवेदना आहे आणि प्राणिमात्रांविषयी सहवेदनाही आहे.


 


बाळगोपाळांच्या ह्या लेखनात कमालीचा प्रांजळपणा आहे. ह्या लेखनात नात्यांचा ओलावा आहे आणि मैत्रीतील जिव्हाळा आहे. ह्या लेखनात अनुभवांची विविधता आहे. पौगंडावस्थेतील खोटे बोलण्याचे प्रयोग आहेत, पण खोटारडेपणा मुळीच नाही. ह्या लेखनातून चंदगड परिसरातील सण-उत्सव, प्रथा, परंपरा, लोकजीवन आणि चंदगडी बोलीभाषेवर लख्ख प्रकाश पडतो. त्यामुळे हे लेखन अतिशय निर्व्याज आणि लोभसवाणे झाले आहे. संजय साबळे यांचे संपादनकौशल्य वाखाणण्यासारखे आहे.


 



  • 'आठवणींच्या हिंदोळ्यावर'

  • संपादक : संजय गोपाळ साबळे

  • अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर

  • पृष्ठे : १३६, किंमत २२० रु.

  •  

  • पुस्तक परिचय :

  • डॉ. सुरेश सावंत, नांदेड

  • sureshsawant2011@yahoo.com


टिप्पण्या