वांगी, ता.जि. नांदेड (दि.६ मे २०२६) समाजामध्ये शिक्षण वृद्धिंगत होण्यासाठी हातभार लावला पाहिजे. प्रत्येकाने इतरांना मदत करण...
वांगी, ता.जि. नांदेड (दि.६ मे २०२६)
समाजामध्ये शिक्षण वृद्धिंगत होण्यासाठी हातभार लावला पाहिजे. प्रत्येकाने इतरांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले. शिक्षणाशिवाय कोणताही समाज पुढे जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन सायन्स कॉलेजचे सेवानिवृत्ती प्राचार्य डॉ. डी.यु.गवई यांनी केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वांगी येथील सार्वजनिक भीमजयंती महोत्सवात ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, पीआरपी पक्षाचे राज्य सचिव व माजी नगरसेवक बापूराव गजभारे, सरपंच दत्ता कदम, आयोजक देवानंद तारू, गोविंद जाधव, राहुल जाधव, दिलीप जाधव, पार्वतीबाई खोडे, पद्माकर तारू, देवबाई तारू, केरबाजी जाधव, सुरेश जाधव यांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच पंचशील ध्वजारोहण देखील करण्यात आले. मान्यवरांचे भारतीय संविधान उद्देशपत्रिका देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ.अजय गव्हाणे यांनी, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 'प्रथमतः मी भारतीय आहे; आणि अंतिमतः मी भारतीय आहे' या दिलेल्या संदेशाला जीवनात उतरविणे आवश्यक आहे. जातिव्यवस्था हा भारतातील सर्वात मोठा प्रश्न असून सामाजिक समता, न्याय, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधान मूल्य रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. बापूराव गजभारे यांनी प्रबोधन व्याख्यानासाठी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आवश्यक असल्याची सुचित केले. प्रत्येकाने शिक्षणावर, ग्रंथांवर खर्च केला पाहिजे. दोन रुपयांपैकी एक रुपयाची भाकर आणि एक रुपयाची पुस्तक विकत घेतले पाहिजे, असाही संदेश दिला.
प्रास्ताविक शिवानंद तारू यांनी केले. यावेळी समीक्षा कांबळे, साक्षी तारू, अंकिता, श्रद्धा, कविता, मनश्री, सविता तारु, आरोही सूर्यवंशी, ऋतुजा तारू, निशीता तारू यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रभावीरीत्या विचार व्यक्त केले. विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक आणि सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सतीश बनसोडे सामाजिक कार्यकर्ते अनिल हंकारे यांची देखील उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्राचार्य डॉ. श्रीरंग बोडके आणि भीमजयंती मंडळ कार्यकारिणी बाबुराव तारू, पंडित वाघमारे, धाराजी तारू, आनंद तारू, भास्कर तारू यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS