सांस्कृतिक प्रतिनिधी नांदेड (दि. १२ )
संस्कार भारती नांदेड समितीच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांचा हृद्य सत्कार व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारती देवगिरी प्रांताचे कार्यकारी अध्यक्ष भगवानराव देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्यास ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्कार भारतीचे ध्येय गीत आरूषी सातोनकर हिने सादर केले. तिला सौ. विजया कोंदंडे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संस्कार भारती नांदेड समितीच्या अध्यक्षा राधिकाताई वाळवेकर यांनी संस्कार भारतीच्या कार्याचा आढावा घेतला. सुवर्णा कळसे यांनी सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. सावंत यांचे सौ. श्यामलताई देशमुख, सौ.भाग्यश्री टोके, डॉ. सौ.पूर्वा जोशी, सौ. विजया कोदंडे आणि इतर सुवासिनींच्या हस्ते औक्षण करण्यात आले. त्यानंतर डॉ. सावंत यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार व पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सावंत यांनी काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण, बालपणापासूनचा संघर्ष ते साहित्य अकादमीच्या पुरस्कारापर्यंतचा रोमांचित करणारा जीवनप्रवास रसिकांसमोर ठेवला. आजच्या शिक्षणपद्धतीविषयी व पालकांच्या उदासीनतेविषयी चिंता व्यक्त केली. ते पुढे असेही म्हणाले, की आजही विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. त्यासाठी पोषक वातावरण शिक्षक व पालक यांनी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत शिक्षण घेत असताना स्वामी वरदानंद भारती यांच्यामुळे जीवनाला दिशा मिळाली, याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
"विद्यार्थी हा चैतन्याचा खळाळता झरा असतो. त्याच्यासाठी शाळा ही 'आनंदशाळा' झाली, तरच विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता वाढेल" असेही ते म्हणाले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी सत्कारमूर्ती डॉ. सावंत यांच्या लेखनकार्याबद्दल सांगताना 'आयुष्यभर लेखन व शब्दांची साथ घेऊन शब्दब्रम्ह अशी 'आभाळमाया' बालजगतासाठी निर्माण केली' असे गौरवोद्गार काढले. अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक व जीवनगौरव पुरस्कारप्राप्त भगवानराव देशमुख यांनी डॉ. सावंत यांच्या कार्याची आजच्या काळातील महती सांगून आपल्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी उपक्रमांची माहिती सांगितली.
शारदा संगीत विद्यालयाचे विद्यार्थी स्पंदन पवार, शांभवी जोशी, सानवी हेंद्रे , स्वानंदी आकुसकर, दुर्वांक कुलकर्णी, अनिकेत बोडेवार, प्रांजली पवार यांनी डॉ. सावंत यांची डॉ. प्रमोद देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली "आभाळमाया" ही शीर्षक कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. या बालकलावंतांना संगीताची पुस्तके देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमेध पांडे यांनी केले. आभार अमोल कंडारकर यांनी मानले.
डॉ. सावंत सरांची शिष्या व रांगोळी कलावंत गोदावरी जंगीलवाड ही दिव्यांग असूनही प्रवेशद्वारासमोर गुरुसमर्पणाची सुंदर रांगोळी काढून, रंगीत फुलांच्या सुंदर पायघड्या आपल्या गुरूंच्या स्वागतासाठी घातल्या होत्या. या वेळी संस्कार भारतीचे देवगिरी प्रांताचे महामंत्री जगदीश देशमुख, पं. संजय जोशी, डॉ. वैशाली गोस्वामी कुलकर्णी, सुरमणी पं. प्रा. धनंजय जोशी यांच्यासह माजी अध्यक्ष दि. मा. देशमुख, सचिव अंजली देशमुख, कार्याध्यक्ष जयंत वाकोडकर, उपाध्यक्ष सौ. रश्मी वडवळकर, कोषप्रमुख गणेश भोरे, साहित्यविधा प्रमुख डॉ. दीपक कासराळीकर यांची उपस्थिती होती. आशा पैठणे, प्रा. डॉ. विलास वैद्य, डॉ. स्वाती भद्रे, डॉ. पूर्वा जोशी, मधुकरराव मुळे, रेणुकादास दीक्षित, आदींसह संस्कार भारतीचे सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा