रुग्णसखा : डॉ.नितीन जोशी

पचनसंस्थाविकार तज्ज्ञ डॉ.नितीन जोशी यांना नुकताच कै. कुसुमताई शंकरराव चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रद्धेय कै. श्री शंकररावजी चव्हाण साहेबांच्या स्मृतीदिनी १४ जुलै रोजी हा सन्मान त्यांना वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्य या दोन्ही विभागात त्यांना राजस्थानचे राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. मागील २१ वर्षांत वैद्यकीय सेवा क्षेत्रात हा पुरस्कार मिळविणारे ते नांदेडचे केवळ दुसरेच तर सामाजिक सेवा क्षेत्रात पहिलेच डॉक्टर आहेत. त्या निमित्ताने डॉ नितीन जोशी यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा.

जयराम धोंगडे 

एका दशकापूर्वी, २०१५च्या आषाढात एक अवलिया डॉक्टर आमच्या विश्व इन्स्टिट्यूटमध्ये आला. डॉ नितीन मंगला जयतीर्थ जोशी... त्यांचं नाव. लातूर जिल्ह्यातील तेव्हाच्या उदगीर तालुक्यातील १५०० लोकवस्तीच एक छोटस खेडं, तळेगाव (भोगेश्वर) हे त्यांच जन्मगाव. त्यांची आई सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका आणि वडील शेतकरी तथा सेवानिवृत्त ग्रंथपाल आहेत. त्यांनी पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण गावातल्या मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेत तर, बारावीपर्यंतचे शिक्षण उदगीरच्या श्यामलाल शाळेत पूर्ण केले. बहुधा विद्वता गरीबाघरीच प्रसवत असते, हे ठसठसीतपणे अधोरेखित करणारा त्यांचा शैक्षणिक पट पाहता आपल्या ध्यान्यात येईल.


डॉ.नितीन यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जवाहर वैद्यकीय महाविद्यालातून एमबीबीएसच्या परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त करीत पदवी प्राप्त केली.  पुढे  त्यांना मुंबईच्या नामांकित जसलोक हॉस्पिटल मध्ये डीएनबी (मेडिसिन) या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशाची दारे खुली झाली. तेथून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पचनसंस्थेच्या विकारासाठी जगात प्रसिद्ध आणि सर्वात मोठ्या असलेल्या हैदराबादच्या ‘एशियन इंस्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटेरोलॉजीमधून’ पद्मविभूषण डॉ. डी नागेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डीएनबी (गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी) ची पदव्युत्तर पदवी मिळविली.  

 

एंडोस्कोपीतील बारकावे त्यांनी फेलोशिप करताना पद्मश्री डॉ अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथे आत्मसात केले. मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉ. मायदेव यांच्यासोबत काम करीत असताना, सर्वांना हवीहवीशी वाटणारी मुंबई सोडून ते आपल्या मायभूमीच्या सेवेसाठी नांदेडला आले. तेंव्हाच्या औरंगाबाद शहरानंतर; पचनसंस्था आणि यकृतविकार या विषयातली भारत सरकारने प्रदान केलेली सर्वोच्च पदवी प्राप्त करून  नांदेडला स्थायिक होण्यासाठी म्हणून आलेले ते मराठवाड्यातील पहिलेच पचनसंस्थेचे सुपरस्पेशालिस्ट तज्ज्ञ आहेत. 

 

डॉ.नितीन जोशी यांनी २८ जुलै २०१५ रोजी नांदेडच्या विश्व हॉस्पिटलमध्ये डॉ सुशील राठी आणि डॉ उमेश भालेराव यांच्या आग्रहावरून प्रवेश केला. जन्मदात्या पालकांनंतर नांदेडला त्यांना प्रस्थापित करणाऱ्या या द्वयींना ते आपले दुसरे पालकचं संबोधतात. त्यांच्याविषयीची कायम कृतज्ञता मनात तेवत ठेवतात आणि त्यांच्यामुळेच ते नांदेडकर झाल्याचे अभिमानाने सांगतात. आपल्या गुरुजनांच्या शुभहस्ते, त्यांनी २६ जानेवारी २०१६ रोजी नांदेडच्या बोरबन परिसरात आपले “गॅलक्सी पचनसंस्था आणि यकृतविकार व एंडोस्कोपी रुग्णालय” सुरू केले. अवघ्या ९ वर्षांच्या काळात या रुग्णालयाने हजारो रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचारच नाही तर, जीवनाकडे पाहण्याचा सर्वांगीण आणि सकारात्मक दृष्टिकोन देण्याचे कार्य केले आहे. 

 

आजमितीस, या रुग्णालयात उच्च दर्जाची एंडोस्कोपी सुविधा आणि जगातील सर्वांत आधुनिक अशा १६ वेगवेगळ्या दुर्बिणी (एंडोस्कोपी सुविधा) परिसरातील रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक वेळी रुग्णालयात उपलब्ध करण्यात आलेल्या आधुनिक उपकरणांचे लोकार्पण महाराष्ट्राचे आदरणीय माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांच्याच हस्ते करण्यात आले आहे. 

 

डॉ.नितीन जोशी हे एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व आहे. ते हळव्या आणि संवेदनशील मनाचे डॉक्टर आहेत. आतड्याच्या अंतर्गत तपासणीसाठी घशातून आत दुर्बीण टाकून करावयाच्या तपासणीसाठी रुग्ण घाबरतात. त्यांना जी भीती वाटते, जो त्रास होतो,  तो रुग्णांना होणारा त्रास समजून घेण्यासाठी स्वतःच स्वतःची एंडोस्कोपी करणारे भारत देशातील एकमेव आणि जगातील तिसरे डॉक्टर म्हणजे डॉ नितीन जोशी. 


जगात भूदान, गोदान, धनदान, अन्नदान, रक्तदान आणि आता अवयवदान करणारी मंडळी कमी नाहीत परंतु, डॉक्टर म्हणून वैद्यकिय सेवेत अतिशय व्यग्र असूनही वेळ काढून जनकल्याणासाठी, लोकजागृतीसाठी, आरोग्य शिक्षणासाठी आपले अनुभवदान देणारे डॉक्टर विरळाच! त्यांनी स्वतः दोन लोकप्रिय पुस्तके ‘आपलं पोट आपल्या हातात’ आणि ‘कशासाठी? पोटासाठी!’ लिहिली आहेत. या पुस्तकांचा वापर करून लोकांना पचनसंस्थेचे आजार आणि घ्यावयाची काळजी याबद्दलची परिपूर्ण माहिती मातृभाषेतून मिळाल्याने ज्ञानात भर आणि शंकाकुशंकांचे निवारण करता आले आहे. आज डॉक्टरांची ओळख “आपलं पोट आपल्या हातात” अशीच झाली आहे. आजवर या दोन्ही पुस्तकांच्या २१ हजार प्रती प्रकाशित झाल्या.

 

लवकर निदान आणि उपचारासाठी महानगरात असलेल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्सइतकीच उच्च दर्जाची तंत्रप्रणाली ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या खिशाला परवडेल अश्या स्वरूपात उपलब्ध करणारे, मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी वेळोवेळी सामाजिक उपक्रम घेणारे आणि “जिथे कोणी नाही; तिथे आम्ही”  या ध्येयाने प्रेरित होऊन २०२२ पासून फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाची “एंडोस्कोपी आपल्या दारी” ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हे एकमेव डॉक्टर आणि त्यांचे गॅलेक्सी रुग्णालय आहे. आजवर या फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाच्या टीमने विदर्भ, आणि मराठवाड्यात नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूच्या ६ जिल्ह्यांमध्ये एकूण १०३ शिबिरांतून ५३ लहानमोठ्या गावांमधून २६००० किलोमीटर प्रवास करीत तब्बल १३०० रुग्णांची एंडोस्कोपी केली आहे. याच उपक्रमाला जोडून ‘डॉक्टरांचे जगणे कशासाठी?’ या विषयावर आजवर एकूण १२ तालुक्यांच्या गावांतील विविध डॉक्टर संघटनांमध्ये त्यांनी मोफत व्याख्याने दिली आहेत. 

दररोजच्या व्यस्त प्रॅक्टिसमधून वेळ काढून दर रविवारी सकाळी सकाळीच एका गावात जाणारा, पुस्तके लिहून लोकांना आजारी न पडण्याचे शिक्षण देऊन आवाहन करणारा हा डॉक्टर, प्रासंगिक कविता, लेख आणि प्रेरणादायी व्याख्याने गावोगावी स्वतःच आयोजित करून त्यात सुख आणि आनंद शोधणारा माणूस आहे. स्वतःचे दुःख विसरून इतरांनी आत्महत्या करू नये, व्यसनाधीन होऊ नये किंवा नैराश्यग्रस्त होऊ नये यासाठी सतत प्रयत्न आणि काळजी करणे हे आता त्यांनी अंगवळणी पाडून घेतले आहे. 

वैद्यकीय प्रॅक्स्टिस सुरू केल्याच्या ६व्या महिन्यातच वयाच्या ३२ व्या वर्षी हे जग स्वतःहून सोडून गेलेल्या आपल्या उच्च शिक्षित, दिवंगत, डॉक्टर पत्नीच्या नावाने महाराष्ट्रातील एका अत्यंत प्रेरणादायी आणि तरुण व्यक्तिमत्वाला किंवा संस्थेला शोधून मागच्या ६ वर्षापासून दरवर्षी ३१ जुलै रोजी सन्मानित करून समाजात चेतना आणि प्रेरणेचे स्फुल्लिंग पेरण्याचे काम डॉ नितीन जोशी करीत आहेत. 

 

जगणे समृद्ध व्हावे आणि माणूस म्हणून आपल्याला मिळालेला हा छोटासा जीवनकाळ अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी ही धडपड करणारे डॉक्टर - डॉ नितीन मंगला जयतीर्थ जोशी “माझी प्रार्थना” या त्यांच्या कवितेत लिहितात…

 

मरण्यापूर्वी जगताना 

जगाला थोडे देईन म्हणतो 

जगाने जे दिले मला 

थोडे थोडे वाटीन म्हणतो…



 

रुग्णांच्या आरोग्यासाठी अहोरात्र तन-मन-धनाने राबणारा डॉक्टर, आजारच होवू नये म्हणून आपली आरोग्याशाखा – पोटविकार आणि यकृतविकाराचे क्लिष्ट असे इंग्रजीतले ज्ञान आणि अनुभव मराठीतून लिहिणारा एक साहित्यिक आणि फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाची “एंडोस्कोपी आपल्या दारी” योजना वाडी-तांड्यावर पोचविणारा व्रतस्थ समाजसेवी अशी ओळख निर्माण करणाऱ्या या ‘रुग्णसख्याला’ आज कै. कुसुमताई शंकरराव चव्हाण स्मृती पुरस्कार हा मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार ‘वैद्यकीय आणि सामाजिक’ सेवेसाठी १४ जुलै रोजी प्रदान केला जात आहे, ही अतिशय आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. याप्रसंगी मी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतितो! 

 

जयराम धोंगडे

प्रशासक, विश्व इन्स्टिट्यूट

नांदेड

 

टिप्पण्या