नांदेड:( दि.१४ सप्टेंबर २०२४)
ध्यान म्हणजे व्यर्थ विचार आणि घटनांचा संग्रह असलेले मन रिकामे करण्याची प्रक्रिया होय. ध्यानधारणेचे महत्त्व भारताने संपूर्ण जगाला सांगितले आहे; मात्र दुर्दैवाने आपणच त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. ध्यान प्रक्रियेद्वारे उसने ज्ञान प्राप्त न होता स्वतःची खरी ओळख समजते व एकाग्रता देखील प्रत्यक्षात येते. मानवी जीवनात खरा आनंद ध्यानधारणेद्वारे प्राप्त होतो, असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. सुनील नेरळकर यांनी केले.
श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्पिरिच्युअल एज्युकेशन कमिटीद्वारे आयोजित 'मानवी जीवनात ध्यानधारणेची आवश्यकता' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, डॉ.अजय टेंगसे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ. दिगंबर भोसले, डॉ. रत्नमाला मस्के यांची उपस्थिती होती.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, ताणतणावाचे निराकरण करण्यासाठी ध्यानसाधना अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मानवी मेंदू सतत कार्य करीत असतो. त्याला ताजेतवाने व बलशाली करण्यासाठी प्रत्येकाने नियमित ध्यान केले पाहिजे; तरच त्याचे प्रभावी परिणाम जाणवतील. आजच्या धकाधकीच्या व तणावग्रस्त काळात ध्यानधारणेसाठी वेळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे यांनी, ध्यानधारणा म्हणजे माणसाने खास स्वतःसाठी वेळ काढून दिवसभरात काही वेळ क्षणभर थांबणे होय. मानवी मेंदूत दिवसभरात हजारो विचार येतात. त्यातील ९५% विचारांची पुनरावृत्ती होत असते. त्यावर उपाय ध्यान असून ध्यान हे उत्तम औषध असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा.सुनील नेरळकर यांनी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह 'आनापान सती योग' या ध्यान प्रयोगाचे प्रात्यक्षिक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ.अजय गव्हाणे यांनी केले. आभार डॉ.रत्नमाला मस्के यांनी मानले.
यावेळी डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, डॉ.मीरा फड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, जगदीश उमरीकर, नाना शिंदे व गणेश विनकरे यांनी सहकार्य केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा