हॉंग्जो (चिन)-
कवी विशिष्ट देश-प्रदेशात जन्म घेतो, वास्तव्य करतो, मात्र कविता लिहिताना तो मानवी समुहांच्या साफल्याचा विचार करतो. तो विश्वकल्याणाचे स्वप्न पाहतो. कवीचा खरा धर्म मानवता असून तो जागतिक शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करतो, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी चिनमधील हांग्जो येथे सुरु असलेल्या ब्रिक्स देशांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कविता महोत्सवात केले.
चायना रायटर्स असोसिएशनच्या वतीने दिनांक १८ ते २४ जुलै या काळात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय युवा कविता महोत्सवात ब्रिक्स देशांतील कवी सहभागी झाले आहेत. महोत्सवातील विशेष सत्रात
'कवितेचा स्वदेशी व व्यष्टीलक्षी स्वर' या विषयावर डॉ. तौर यांनी मांडणी केली. चर्चेत वोनानी बिला (दक्षिण आफ्रिका), सैफ तेमाम (इथोपिया), त्सेग्या हैलेसिलसै गिर्मे (इथोपिया), झियॉन यान (चिन) यांनी विषयाचे विविध पैलू उलगडून दाखवले.
दक्षिण आफ्रिकेतील बोली आणि स्थानिक भाषांवर होणारे इंग्रजीचे आक्रमण आणि त्याचा विचारप्रक्रियेवर झालेला परिणाम यावर टैंगो भाषेतील कवी वोनानी बिला यांनी मांडणी केली. स्लॅम कवितेचे प्रवर्तक सैफ तेमाम यांनी चळवळीचा इतिहास सांगून स्लॅम कवितेचे वर्तमानातील स्थान सांगितले. तर चिनी कवी झियॉन यान यांनी निसर्ग आणि माणूस यांच्या आंतरसंबंधांची मांडणी केली. त्सेगा गिर्मे यांनी लोकलयींचे महत्व सोदाहरण विषद केले. डॉ पृथ्वीराज तौर यांनी पुढे बोलताना कवितेची देशी नाळ आणि व्यक्तिगत अनुभूतींचे महत्व सांगून कवितेतून व्यक्त होणाऱ्या मशिनीकरण प्रतिरोधाचीही चर्चा केली.
सुप्रसिद्ध चिनी लेखिका
जाओ सी यांनी चर्चेचे संचालन केले. चायना रायटर्स असोसिएशनच्या नियतकालिकाचे संपादक ली शाऊ झिन यांनी प्रारंभी व्याख्यातांचा परिचय करून दिला.
हांग्जो येथे सुरु असलेल्या ब्रिक्स कविता महोत्सवाचा राजधानी बिजिंग येथे दोन दिवसीय कार्यक्रमानंतर समारोप होणार आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा