मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट व मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार एकता युनियनचे सेक्रेटरी श्री. रमेश नाना तडके हे मुंबई पोर्टमधून ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार एकता युनियनच्या वतीने २६ मे २०२४ रोजी वडाळा येथील तेजस नगर रेनॉल्ड इन्स्टिट्यूट सभागृहामध्ये रमेश तडके यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशनचे ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी टी. नरेंद्रराव हे आपल्या कार्यकर्त्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी खास चेन्नईवरून आले होते. नरेंद्र राव यांनी आपल्या मार्गदर्शनात भाषणात सांगितले की, रमेश तडके हा कामगार चळवळीतील हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यांनी गेल्या ४० वर्षात अनेक गोदी कामगारांना न्याय मिळवून दिला. कामगार चळवळतील प्रत्येक आंदोलनात ते अग्रभागी होते. १ जानेवारी २०२२ पासून गोदी कामगारांना लागू होणाऱ्या पगारवाढीबाबत ते म्हणाले की, आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या सात मिटिंग झाल्या असून लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा
बोलणी सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या न्याय मागण्या मिळवण्यासाठी गोदी कामगारांना संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय काहीच मिळणार नाही. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, रमेश तडके एक निष्ठावंत व तळमळीचे कार्यकर्ते आहेत. ते प्रत्येक लढ्यामध्ये पुढे असतात. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना सर्व थकबाकी मिळाली असून, पेन्शन फंडातील तूट देखील बऱ्यापैकी भरून काढली आहे. त्यामुळे पेन्शन घेणाऱ्या कामगारांना आता कसलीही चिंता नाही. न्हावा शेवा पोर्ट अंतर्गत कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी व जवाहरलाल नेहरू प्राधिकरणाचे माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी रमेश तडके यांना शुभेच्छा देताना सांगितले की, मुंबई पोर्टमध्ये सीटूची युनियन स्थापन करण्यामध्ये रमेश तडके यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. जेएनपीटी हे लँड लॉर्ड पोर्ट असून, या बंदरातील पाचशे कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली असून आता फक्त चारशे कामगार शिल्लक राहिले आहेत. भूमिपुत्रांना मात्र अद्यापही साडेबारा टक्केच्या जमीन मिळाल्या नाहीत. त्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, सेक्रेटरी विजय रणदिवे, डॉक अँड सुपरवायझरी फिलोंथरापिक फाउंडेशनचे पदाधिकारी विजय सोमा सावंत, न्हावा शेवा अंतर्गत कामगार संघटनेचे सेक्रेटरी संदीप पाटील, असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर गजेंद्र हिरे, गणेश जाधव, मुंबई पोर्ट ट्रस्ट कामगार एकता युनियनचे अध्यक्ष मनोज यादव, जनरल सेक्रेटरी अशोक पवार, सेवानिवृत्त शेड सुप्रीटेंडंट विजय कसबे आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. रमेश तडके यांनी सत्काराला उत्तर दिले. सत्कार सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन सुहास अनुभवणे यांनी केले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा