ओसरीवर, अंगणात, पडवीत नातवंडांच्या घोळक्यात बसून आजी किंवा आजोबा गोष्ट सांगत आहेत. त्यातून काही जीवनमूल्ये रूजवीत आहेत, संस्कार करीत आहेत, हे चित्र आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. बदलत्या जीवनशैलीत ते होणं साहजिकच आहे, पण तरीही गोष्ट ऐकण्याची आवड आणि गोष्ट सांगण्याची ऊर्मी आजही तितकीच ताजी आहे. गोष्ट ऐकवणारी-सांगणारी माध्यमं बदलली, पण गोष्ट टिकून आहे. बालकुमारांसाठी कथा, कविता, नाटुकली अशा विविध बालसाहित्य प्रकारांतून ती आकार घेत असते. यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो.
लेखनातून मुलांवर संस्कार करणारे ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत सेवानिवृत्तीनंतर अधिक जोमानेा आणि निष्ठेने हा वसा चालवीत आहेत. विद्यार्थी आयुष्यभर विद्यार्थी असतो, तसाच शिक्षकही आयुष्यभर शिक्षकच असतो.
दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी नुकतीच डॉ. सुरेश सावंत यांची दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. एक बालकवितांचे आहे आणि दुसरे बालकुमारांसाठी कथांचे आहे.
’कष्टाची फळे गोड’ हे बालकुमारांसाठी कथेचे पुस्तक त्याच्या शीर्षकातूनच आतल्या मजकुराची ओळख सांगते. अतिशय सुंदर, समर्पक रंगीत चित्रे, मोठा टाईप आणि प्रत्येक कथेचे अर्थपूर्ण शीर्षक मन वेधून घेते. मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कथेतील चित्रे बोलकी आणि मजकूर अतिशय आशयपूर्ण आहे. रंजकही आहे.
ह्या पुस्तकात आठ कथा आहेत. या आठ कथा आठपेक्षा कितीतरी अधिक पटीने जीवनमूल्ये शिकवणार्या संस्कारकथा आहेत. सत्यकथा, आख्यायिका, बोधकथा, पर्यावरणाविषयी जागरूकता अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या या कथा आहेत. अगदी सहज साध्या सोप्या भाषेत कथाविषयाचा विस्तार करून त्यातून अत्यंत मोलाचे संदेश बालकुमारांपर्यंत पोहचविण्यात डॉ. सुरेश सावंत सर यशस्वी झाले आहेत. वाचक म्हणून आपणसुद्धा सगळ्या कथा वाचून झाल्याशिवाय पुस्तक खाली ठेवत नाही, हे विशेष.
हनुमानासोबत कुत्र्याच्या मंदिरात कुत्र्याला हात जोडणारे, त्याला नैवेद्य दाखवणारे गावकरी पाहून कोणालाही आश्चर्यच वाटेल. यात फक्त भूतदया नव्हती. शेतकर्यांच्या अडीनडीला उपयोगी पडणारा सावकार, कर्ज फेडण्यासाठी धडपडणारा प्रामाणिक शेतकरी आणि त्याचा इमानदार कुत्रा यांचे चित्रण असलेली कथा यात आहे. शक्ती कमी पडते, तेव्हा युक्ती वापरावी हे मुक्या प्राण्यांनाही समजते. अविचाराने, घाईने कोणतीही कृती करणे वाईटच. त्यामुळे पश्चात्तापच होतो, हे या कथेतून सांगितले आहे. पाळलेल्या मुंगसाच्या डोक्यात हंडा घालून त्याला मारून टाकणार्या आईच्या गोष्टीची आठवण ही कथा करून देते.
प्रसंगावधान, समयसूचकता आणि धाडस दाखवून गुरे चारणारी मुले हजारो लोकांचे प्राण वाचवतात. त्यांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होते. त्यांना बालशौर्य पुरस्कार मिळतो. हे सगळं खूप प्रेरणा देणारं आहे. तसंच बघ्याची भूमिका घेणार्या लोकांपेक्षा बंधार्यात बुडणार्या चार मुलींना बाहेर काढणारा एजाज पोहण्याच्या छंदात रमणारा होता. यालाही बालशौर्य पुरस्कार मिळाला. छंद जोपासताना प्राणिमात्रांचा विचार केलाच पाहिजे हे डॉ. सुरेश सावंत एका कथेतून सांगतात. तबल्यासाठी हरणाचे कातडे हवे. त्यासाठी हरणाची शिकार करावी लागेल, मग त्या पाडसांचे काय होईल? या विचाराने तबला वादनात रमणारा केशव तबलाच नाकारतो. हरणाचा बळी देऊन मिळणारा आनंद मला नको म्हणणारा केशव खूप काही शिकवून जातो. संस्कारांसोबत बालकांचा भावनिक विकास करण्याचे उद्दिष्ट या कथेने साधले आहे.
खरं तर प्रसंगावधान, समयसूचकता, धाडस दाखवून एक्सप्रेस थांबवणारी आणि हजारो लोकांचे जीव वाचवणारी मुले असोत, की बुडणार्या मुलींना वाचवणारा एजाज असो या संस्कारकथा आपल्यालाही खूप काही शिकवतात. या दोन्ही घटना आपल्या मराठवाड्यात घडलेल्या, आपल्या आजूबाजूला घडलेल्या. बातमी वाचून आपण क्षणभर भारावतो आणि थोड्या वेळाने सोडूनही देतो, पण ह्या दोन्ही सत्य घटनांवर डॉ. सुरेश सावंत बालकुमारांसाठी दोन बालकथा लिहितात. बालकांच्या मनाच्या ओल्या मातीवर उमटवलेले हे संस्कारांचे ठसे भविष्यात नक्कीच उपयोगी ठरणारे आहेत.
संस्कार करावे लागत नाहीत. मूल्ये शिकवावी लागत नाहीत. ते काम आपोआप होतं असं मला वाटतं. आई-वडील, शिक्षक, समाज, निसर्ग आपल्या वागण्या-बोलण्यातून-वर्तनातून सतत काही ना काही शिकवण देत असताात. सांगत असतात. ते पाहण्याची, अनुभवण्याची, त्यातून काही अंगीकारण्याची दृष्टी आईवडील आणि शिक्षक देतात. घरातील वडीलधारी माणसं, आदर्श व्यक्तिमत्त्व, पुराणकथा हेही महत्त्वाचे घटक हे काम करीत असतात.
’कष्टाची फळे गोड’ ही कथा या अर्थाने सर्वांगसुंदर आहे. दोन सख्खे भाऊही दोन विरूद्ध स्वभावाचे आणि विरूद्ध टोकाचे आचरण करणारे असू शकतात. त्याचे बरे-वाईट परिणाम त्यांच्या कुटुंबावर आणि मुलांवर होतात, हे या कथेतून मांडले आहे. ही एक सुंदर बोधकथा आहे.
गोष्टीतल्या आजीबाई नेहमी खूप हुशार असतात. त्यात एकशे दहा वर्षे आधी जन्मलेल्या थिमक्कांचा अनुभव पुस्तकी शिक्षणापेक्षा कितीतरी मोठा. त्यांची दूरदष्टी चकित करणारी. वडाच्या पाच झाडांपासून, रोपांपासून सुरूवात करून अक्षरशः हजारो झाडं लावून, ती जगवून आणि वाढवून थिमक्का ’वृक्षमाता’ झाल्या. स्वतःचे मूल नसले तरी ’विश्वाम्मा’ झाल्या. निरक्षर असूनही डॉक्टरेट मिळवणार्या थिमक्कांची कथा परदेशातही पोहचली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी इतके उत्तुंग काम होत असताना दुसरीकडे प्लॅस्टिकचा भस्मासूर पर्यावरणाचा र्हास करीत आहे. फुकटात मिळणारे हे विष आकर्षक स्वरूपात आपले जीवन व्यापून बसले आहे. तात्पुरती सोय म्हणून आणि अज्ञानापोटी पॉलिथीनचा वापर होतोय. तो थांबायला पाहिजे. हे सांगणार्या कथेने एका ज्वलंत विषयाला आणि त्यातून निर्माण होणार्या समस्यांना बालकुमारांसमोर अतिशय आकर्षक पद्धतीने मांडले आहे. अशा गोष्टी मोठ्यांना सांगताना त्या मुलांनाही समजावल्या पाहिजेत, हे खरं आहे. या कथेने पर्यावरणसंरक्षण आणि संवर्धनाचा जीवनोपयोगी संदेश दिला आहे.
या आठही कथा संस्कारांचे आणि मूल्यशिक्षणाचे आदर्श वस्तुपाठच आहेत. या पुस्तकातील भाषा साधी, सोपी ओघवती आहे. चकवा लागणे, सावकार, सांगोपांगीच्या गोष्टी, कामधेनू, चंचल पारा असे जिज्ञासा जागृत करणारे व सहसा वापरात नसलेले शब्द ओघाने येतात. अन्वर्थक म्हणी आणि वाक्प्रचारांची लयलूट या कथांमध्ये वाचायला मिळते. मुळात डॉ. सावंत हे कवी आहेत, त्यामुळे त्यांच्या लेखनात नादमाधुर्य जाणवते. म्हणींचा सढळ व चपखल वापर हेही या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मनोरंजनाबरोबरच मुलांचे प्रबोधन करणार्या या कथा मुलांना आणि पालकांनाही आवडतील, असा विश्वास आहे.
’कष्टाची फळे गोड’ (बालकथासंग्रह)
लेखक ः डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक ः दिलीपराज प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ व आतील सजावट ः संतोष धोंगडे
आर्टपेपरवरील संपूर्ण रंगीत पृष्ठे ः 72
किंमत रू. 160/-
addComments
टिप्पणी पोस्ट करा