बबन शिंदे यांच्या 'प्रेरणादायी कथा' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

कळमनुरी येथील उपक्रमशील शिक्षक व लेखक बबन शिंदे यांनी बालकुमारांसाठी विपुल लेखन केले आहे. बालकथा, बालकविता, किशोर कादंबरी, समीक्षा इ. वाङ्मयप्रकारांत आजवर त्यांची २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कुमारांसाठी 'प्रेरणादायी कथा' हा त्यांचा नवीन कथासंग्रह मंगळवेढ्याच्या सप्तर्षी प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. ह्या संग्रहात १४ कथा आहेत.

'सुंठीवाचून खोकला गेला' ह्या कथेचा नायक हट्टी आणि चिडचिड्या चिंटू आहे. त्याला शिस्त लावण्यासाठी त्याचे आईवडील आपल्या खेडेगावात घेऊन जातात. आईवडलांची नोकरीतील व्यग्रता हेच चिंटूच्या चिडचिडेपणाचे खरे कारण असते. गावी आजीआजोबांच्या सहवासात चिंटूच्या जीवनाला शिस्त लागते. प्रेमाने संस्कार करण्याचे, अशिक्षित आजोबांचे बालमानसशास्त्र भलतेच पक्के आहे.

'वस्ती' ही पर्यावरण संरक्षणाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी उत्तम कुमारकथा आहे. वसंत आणि हेमंत हे खेड्यातील बालमित्र. वसंत शहरात जाऊन घरांची वस्ती उभी करतो, तर हेमंत खेड्यात राहून असंख्य जीवांना आधार देण्यासाठी आपल्या शेतात झाडांची, पक्ष्यांची, मधमाश्यांची, कृमिकीटकांची वस्ती उभी करतो. ह्या पर्यावरणपूरक वस्तीसाठी सगळे गावकरी हेमंतचे कौतुक करतात.

रोहन हासुद्धा एक अवखळ, खोडकर आणि गावकऱ्यांच्या नजरेत वाया गेलेला मुलगा आहे. पण गुरुजींचे मत यापेक्षा वेगळे आहे. ते म्हणतात, रोहन हा अष्टपैलू विद्यार्थी आहे. त्याचे धिंगाणा करण्याचे हे वयच आहे. प्रतिभावंत मुलांना आव्हानात्मक काम मिळाले नाही, तर ते असेच हूड वागतात. अधिकची ऊर्जा त्यांना शांत बसू देत नाही. पौगंडावस्थेतील मुलांना समजून घेण्याचा गुरुजींचा हा दृष्टिकोन फारच महत्त्वाचा आहे. एकदा शहरात गेल्यावर रोहनला अद्दल घडते आणि तो सुतासारखा सरळ होतो. अनुभवाशिवाय शहाणपण नाही, हेच खरे!

'जीवनदान' ही लेखकाच्या अनुभवातली गोष्ट आहे. उन्हाळ्यात वानरांचा एक कळप लेखकाच्या घरावर चढून धिंगाणा घालतो. नुकसान करतो. कळपाचा प्रमुख नर वानर एका पिलाला मारून जखमी करतो. लेखकाने पशुवैद्यकाच्या मदतीने त्या पिलाचे प्राण वाचविले आणि त्या जखमी पिलावर उपचार करून त्याच्या आईकडे सोपविले. त्या संवेदनशील अनुभवावरची ही गोष्ट वानरांच्या मानसिकतेवरही प्रकाश टाकते.

'बडे चाचा' ही अपघातात जखमी झाल्यामुळे स्मरणशक्ती गमावलेल्या उद्योगपतीची गोष्ट आहे. लेकरांमध्ये जीव रमवण्यासाठी बडे चाचा खेळणी विकण्याचा उद्योग करत असतात. मुले पळवणारा माणूस समजून लोक त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतात. खरी परिस्थिती समजल्यावर सगळेच ओशाळतात. मोठ्यांना अशक्य वाटणा-या, अशा अद्भुतरम्य गोष्टी वाचायला बालकुमारांना आवडतात.

'बिनकामाचा उतोडा' ही गोट्या नावाच्या मुलाची हलकीफुलकी गोष्ट आहे. गोट्याचे कुटुंब गाडीने तेलंगणातील प्रवासाला जाते. वाटेत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि उनकेश्वर येथील गरम पाण्याची कुंडं पाहिली. गोट्याच्या निमित्ताने लेखकाने वाचकांना माहूर परिसराचे पर्यटन घडविले आहे. निसर्गरम्य परिसराचे दर्शन घडविले आहे. मराठी आणि तेलुगू भाषेतील गंमत दाखविली आहे. 'आपल्याला आपल्या राज्याचा, मातृभाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान जरूर असावा, पण इतरांच्या भाषेचा, संस्कृतीचा व राज्याचा तिरस्कार नसावा', हे लेखकाचे भाष्य लक्षात ठेवण्यासारखे आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे खेडी ओस पडत चालली आहेत आणि शहरे फुगत चालली आहेत, हा प्रश्न 'भ्रमनिरास' ह्या कथेत हाताळला आहे. दिनू खूप दिवसांनी आपल्या आजोळी जातो आणि अनेक घरांना कुलूप पाहून दिनूचा भ्रमनिरास होतो. कथेच्या शेवटी दिनूची आई म्हणते, माणसाने बदललेल्या परिस्थितीत आनंदाने जगायला शिकले पाहिजे. ही समायोजन क्षमता हेच खरे शिक्षण असते.

'देव तुझे भले करो' ही गोष्ट आहे कल्पक नारायणाची. सारे मित्र त्याला आगाऊ ना-या म्हणत असले, तरी नारायणची कल्पकता आहे जगात भारी. कानबाच्या घरात शिरलेला साप तो सापळा लावून पकडतो आणि जंगलात नेऊन सोडून देतो. नारायणच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. म्हणून तर कानबाची आई म्हणाली, देव तुझे भले करो!

चलाख प्रदीप हाही असाच एक डोकेबाज मुलगा आहे. गावात दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या टोळीला तो आपल्या अक्कल हुशारीने पकडून देतो.

ह्या कथांतील सगळेच नायक काही इतके हुशार आणि कल्पक नाहीत. काही गणेशसारखे चुकार आणि आळशी आहेत. गणेशला शाळा सोडून मोबाईल पाहिजे, फटफटी पाहिजे.

उलट गंगाधर हा त्याचा गावाकडचा चुलतभाऊ शेतीत कष्टाची कामे करत शिकतो. म्हणूनच तर म्हणतात, जिथे दात आहेत, तिथे चणे नाहीत आणि जिथे चणे आहेत, तिथे दात नाहीत. 'युक्ती श्रेष्ठ' ह्या कथेतील गणेशचे बाबा गणेशला मुद्दामच गावाकडे घेऊन जातात. गंगाधरचे पाहून गणेशला अक्कल येते आणि त्याच्या वर्तनात सुधारणा होते.

'धडा' कथेचा नायक आकाश हासुद्धा गणेशसारखाच उद्धट आहे, उर्मट आहे. त्याच्या आईवडलांनी त्याच्यासमोर हात टेकले होते. पण एक मित्रच दुसर्‍या मित्राला सुधारू शकतो. त्यालाच तर खरा मित्र म्हणतात. प्रकाशने आकाशला खेळात न घेऊन त्याला वठणीवर आणले.

मित्रांनीच आकाशला शिकविलेला 'धडा' सगळ्यांनाच आवडला.

गरिबाचा कष्टाळू मुलगा बजरंग जिद्दीने आणि मेहनतीने सैन्यात भरती होतो. गावकरी त्याचा जंगी सत्कार करतात. बजरंग म्हणतो, गुणवत्ता, जिद्द व आत्मविश्वास असल्यावर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. कष्ट करण्याची तयारी हवी. कष्टाशिवाय यश नाही.

त्याच वेळी त्याचा दत्ता हा मित्र वेळ निघून गेल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतो. वेळ निघून जाण्यापूर्वी सावध झालेले बरे, हेच ह्या गोष्टीचे तात्पर्य.

शाळेत मुलामुलींना इतर वात्रट मुले मुली चिडवतात. त्यामुळे गोंधळलेल्या मुलामुलींचे शाळेत मन रमत नाही. असे विद्यार्थी शाळेपासून तुटत जातात. शेवटच्या गोष्टीतील अतुल आणि मीना हे असेच धास्तावलेले विद्यार्थी आहेत. दोघांच्याही आई दोघांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जातात. डॉक्टर दोघांनाही समजावून सांगतात. आधी भित्रा असलेला अतुल म्हणतो, 'आता मी वाघ बनणार आहे!'

हा आहे अपेक्षित वर्तनबदल. अशा बाबतीत आईवडलांचा आपल्या शालेय लेकरांसोबत मनमोकळा संवाद असणे किती गरजेचे आहे, हे आपल्या लक्षात येते.

ह्या जशा खेड्यातील आणि शहरातील सद्गुणी मुलांच्या गोष्टी आहेत, तशाच ह्या उन्मार्गी वर्तन करणाऱ्या मुलांच्या गोष्टी आहेत. उन्मार्गी आणि बंडखोर असणे हा पौगंडावस्थेतील वयाचा भाग आहे. ह्या वयात घरात आईवडलांनी आणि शाळेत शिक्षकांनी समजून घेण्याची आणि विश्वासात घेऊन समजावून देण्याची गरज असते. आपण आईवडील आणि शिक्षक म्हणून इथेच कमी पडतो. बालमानसशास्त्राची चांगली जाण असल्यामुळे लेखकाने कथेतील बालकुमारांचे फारच छान मनोविश्लेषण केले आहे. लेखकाने सर्वच कथांमधून सकारात्मक विचारांची पेरणी केली आहे.

ह्या कथांमध्ये डाफर, धूमघाई, महाळ्या, कागूद, उतोडा, धांडरणे, पचपच्ची आदत यांसारखे बोलीभाषेतील शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी आल्यामुळे भाषेत एक प्रकारचा गोडवा आला आहे.

शीर्षकाप्रमाणेच ह्या सगळ्या 'प्रेरणादायी कथा' आहेत. सरदार जाधव यांनी पुस्तकाला साजेसे मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. 

प्रेरणादायी कथा ( कुमारांसाठी कथासंग्रह)

लेखक : बबन शिंदे

प्रकाशक : सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा

पृष्ठे ८० किंमत रु. १७५

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या
Popular posts
23 उमेदवारांचे भवितव्य 4 जून पर्यंत मतयंत्रात बंद निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पेटया स्ट्राँग रूममध्ये*
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार*
इमेज
नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार
इमेज
तब्बल ३८ दिवस चोवीस तास कार्यालयात मुक्काम ठोकणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
इमेज
*अन्याया विरूद्ध संघटीत व्हा! सचिन अहिर यांचे कामगार दिनानिमित्त कामगारांना आवाहन*
इमेज