मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
तालुक्यातील बेटमोगरा येथे महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंग बादशहा मठ संस्थान चे मठाधिपती सदगुरू डॉ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दि. १८ फेब्रु.रोजी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आले.
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा हे गाव मन्याळ नदी काठी वसलेले गाव आहे. या गावात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक मानले जाणारे ऐतिहासिक मठ आहे, त्या मठाला शिवलिंग बादशहा म्हणून ओळखले जाते.हे मठ ऐतिहासिक असुन या मठावर अनेक जातिधर्मांच्या नागरिकांची श्रध्दा आहे. या गावातील सर्व नागरिक एकत्रित येऊन अनेक सन उत्सव साजरे करतात. त्यात चैत्र बारस,दिपावली,रमजान ईद,दसरा,मोहरम,व महाशिवरात्र असे विविध प्रकारचे उत्सव साजरे करतात. त्यातलाच एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे महाशिवरात्री या दिनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध भागातून श्रद्धालू येथील शिवलिंग बादशहा मठ संस्थानच्या दर्शनासाठी हमखास येत असतात. या महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिपती सदगुरू डॉ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
ही भव्य पालखी मिरवणूक येथील शिवलिंग बादशाह मठातून प्रस्थान करुन गावातील मुख्य मार्गाने चिटमोगरा व टाकळी या शेजारील गावी भेट देऊन मन्याळ नदी मार्गे छत्रपती (कल्याणपूर महादेव मंदीर ) परिसरात महापूजा करुन परत गावातील मुख्य चौकातून शिवलिंग बादशाह मठात विराजमान करण्यात आले.
या पालखी सोहळ्यासाठी सकाळपासूनच हजारों भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यासोबतच गावातील विविध पक्षातील राजकीय नेते,प्रतिष्ठीत नागरिकांसह महिला व युवकांचीही संख्या लक्षणीय होती.
या मिरवणुकीनंतर रात्री ८ वाजता सामुहिक इष्टलिंग महापुजा व शिवजागर करण्यात आले. त्यानंतर दि.२० फेब्रु.सोमवार रोजी सकाळी १० वाजता सामुहिक इष्टलिंग महापुजा व दुपारी १२ वाजता बिल्वार्चन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचे लाभ घ्यावे असे अवाहन शिवलिंग बादशाह मठ संस्थानचे मठधिपती सदगुरू डॉ. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांनी केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा