केज दि २४(प्रतिनिधी)
सूर्याचे उत्तरायण, मकर संक्रांत आणि भूगोल दिन याचा निकटचा संबंध आहे. भारतीय सण-उत्सव हे ऋतूचक्रशी संबंधित असून त्यात आहार आणि विहाराचा विचार केला आहे. त्यामुळे निसर्गाशी समन्वय साधून शाश्वत विकास साधने शक्य असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ जयश्री भावे यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय येथे भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पृथ्वी गोल चे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जी बी पाटील हे होते. यावेळी प्राचार्य हनुमंत सौदागर प्रा डॉ मुकेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य सौदागर यांनी प्रत्येकाला भूगोलाचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ पाटील यांनी भारतीय जीवन पद्धतीमध्ये निसर्गाला खुप महत्त्व दिले आहे. कारण मानवी विकासामध्ये त्याचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. उज्वल भविष्यासाठी पर्यावरण संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा डॉ जे के जाधव यांनी तर आभार डॉ नागेश कराळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

COMMENTS