वाहते पाणी आणि गुडघाभर चिखल : सोयाबीन काढणार कसे ?
---------------------------------------------
केज प्रतिनिधी/केज :- पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रु. नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल रांजणकर यांनी केज तालुक्यातील केज, चंदनसावरगाव, चिंचोली माळी आणि साळेगाव येथील शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच्या शेतात जाऊन नुकसानीची पहाणी केली. या वेळी त्यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदिवासी विकास आघाडीचे भागवत पवार हे होते. केज तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन काळे पडले आहे तर काही ठिकाणी त्याला कोंब फुटण्याची शक्यता आहे. शेतातून पाणी वाहात आहे. तसेच गुडघ्या इतका चिखल असताना सोयाबीनची काढणी करता येणे शक्य नाही. म्हणून शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रु. नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
"जर तात्काळ पंचनामे केले नाहीत तर आम्ही जिल्हाभर तीव्र आंदोलन करू"
----- भागवत पवार,
आदिवासी विकास आघाडी
COMMENTS