बिब्लीओबिबुलीचा सापळा' हा त्यांचा नवीन बालकथासंग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. पुस्तकाचे वाचन आणि वाचनसंस्कृतीचा विकास ह्या एकाच विषयावरच्या वीस कथांचा समावेश ह्या संग्रहात करण्यात आला आहे. नाटकात जसा एक निवेदक किंवा सूत्रधार असतो, तशी ह्या प्रत्येक कथेच्या सुरुवातीला आजी हे पात्र काही एक निवेदन करते. त्या कथेची वातावरणनिर्मिती करते. कथेतील पात्रांच्या गुणावगुणांची ओळख करून देते. आजीबाईने ह्या सगळ्या कथा एका सूत्रात गुंफल्या आहेत. पुस्तकांची खरेदी, पुस्तकांची जोपासना, पुस्तकांची काळजी, पुस्तकांचे वाचन, पुस्तक जत्रा अशा एकाच विषयाच्या विविध पैलूंवर बेतलेल्या ह्या बोधप्रद कथा आहेत. बालकांना अवांतर वाचनासाठी प्रेरित करणाऱ्या आणि बालकांना, तसेच त्यांच्या पालकांना वाचनाचे महत्त्व पटवून देणा-या ह्या सकस कथा आहेत. लेखकाने प्रत्येक कथेत सत्य आणि कल्पिताची बेमालूम सरमिसळ केली आहे. एका छोट्या कुटुंबातून सुरू झालेला कथेचा हा प्रवास शेवटी संपूर्ण पुस्तकविश्वालाच आपल्या कवेत घेतो.
ह्या कथेत आजीसह त्यांचा मुलगा आणि सून, तेजोमयी ही नात आणि अलेक्झांडर हा कुत्रा अशी चार प्रमुख पात्रं आहेत. अलेक्झू हा कुत्रा बोलत नसला, तरी हावभाव करून आपल्या भावना व्यक्त करतो. त्याचे हावभाव कुटुंबातील सगळ्यांना समजतात. 'चौदा पुस्तके' ह्या पहिल्याच कथेत साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या कुटुंबात अवतरतात. बाबासाहेबांनी ते घर फिरून पाहिले, पण त्यांना ते घर अजिबात काही आवडले नाही. कारण त्या घरात पुस्तकांचे कपाटच नव्हते. बाबासाहेब म्हणतात, 'उद्या १४ एप्रिल, म्हणजे माझा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तुम्ही १४ पुस्तके खरेदी करून घेऊन या'. बाबासाहेब सगळ्यांना पुस्तकांचे महत्त्व समजावून सांगतात आणि तेजोमयीला आशीर्वाद देऊन निघून जातात.
तेजोमयीला पुस्तक वाचायला अजिबात आवडत नसे. तिला पुस्तकाची गोडी लावण्यासाठी पहिल्या कथेत बाबासाहेब आले, तर दुसऱ्या कथेत साक्षात परीराणी आली. पुस्तकं हेच खरे मित्र आहेत, असे परीने तेजोमयीला परोपरीने समजावून सांगितले, तरीसुद्धा तेजोमयी ढिम्म! परीने रागावून तिला 'गाढव' बनवून टाकले. पुस्तके न वाचणा-या माणसात आणि गाढवात काही फरक नाही, असेच कदाचित लेखकाला सुचवायचे असेल. ह्या गोष्टींमध्ये अशा अनेक गमतीजमती आहेत.
तेजोमयीचे बाबा फिरतीवर बाहेरगावी गेले की, परत येताना तिच्यासाठी छान छान खाऊ घेऊन येत. तो खाऊ तिला खूप आवडत असे. एकदा बाहेरगावाहून येताना बाबांनी डब्यात खाऊ आणला. तेजोमयीने उत्सुकतेने डबा उघडला, तर आत पुस्तक निघाले. तेजोमयी नाराज झाली. खाऊ समजून पुस्तक कसे खाणार ना?
बाबा म्हणाले, 'पुस्तक हा अवीट गोडीचा आणि कधीही न संपणारा खाऊ आहे'.
बाबांवर विश्वास ठेवून, जेवण झाल्यावर तेजोमयी पुस्तक वाचायला लागली. ती हळूहळू पुस्तकात इतकी रमली, की मध्यरात्रीपर्यंत वाचतच राहिली. शेवटी तिने न संपणारा खाऊ आणून दिल्याबद्दल बाबांचे आभार मानले.
सुरुवातीला अजिबात पुस्तक न वाचणारी तेजोमयी पुढे पुढे पुस्तकांचा फडशा पाडू लागली. तिला रोज नवं पुस्तक लागायचं. दोन तीन वर्षांत तिने कॉलनीच्या वाचनालयातील सगळी पुस्तके वाचून काढली. आता हिला रोज नवीन पुस्तक कुठून आणून द्यायचे, असा प्रश्न बाबांना पडला. शोध घेतल्यावर एका 'जादूई गल्ली'चा शोध लागला. जिथे जुन्या पुस्तकांचा बाजार भरतो, ती ही जादूई गल्ली. बाबांसह तिथे जाऊन तिने २२ - २३ पुस्तके खरेदी केली. तिने इतकी पुस्तकं खरेदी केल्यामुळे दुकानदाराने खूश होऊन तिला एक पुस्तक भेट दिले.
बाबा तेजोमयीला दरमहा नवीन पुस्तकं विकत घेऊन देऊ लागले. आईने पुस्तकांसाठी आपल्या कपाटाचा एक रकाना रिकामा करून दिला. पुस्तकं हे आपले 'फुलपाखरासारखे मित्र' असतात, हे लक्षात आल्यावर ती पुस्तकांची काळजी घेऊ लागली.
तेजोमयी आपली अभ्यासाची पुस्तकं रेषा मारून आणि चित्रं काढून घाण करत असे. तिला आईवडलांनी कितीही सांगितले, तरी समजत नसे. एके दिवशी चक्क शिवाजी महाराज तिच्या स्वप्नात आले आणि तिला चांगलेच खडसावले. महाराज असेही म्हणाले, की मनात आलेले प्रश्न न विचारणे म्हणजे मूर्खपणा ठरतो. प्रश्नाच्या पोटी ज्ञानाचा जन्म होतो, हेच इथे लेखकाला सूचित करायचे आहे.
तेव्हापासून तेजोमयी पुस्तकांची निगा राखू लागली. पुस्तकांची निगा राखणे म्हणजेच सरस्वतीपूजन आहे, असे ती मानते. तिच्या ह्या गुणाचे आईवडलांनाही कौतुक वाटते. तेजोमयीच्या आईला, न वाचता कपाटात ठेवून दिलेली पुस्तके तुरुंगातील कैद्यांसारखी 'बिचारी' वाटतात. तिचे आईवडील वेळ नसल्याचे कारण सांगून पुस्तके वाचायचे टाळत होते. त्यावर तेजोमयीने एक उपाय शोधून काढला. तीन तास टीव्ही पाहण्याऐवजी दीड तास टीव्ही पाहायचा आणि दीड तास पुस्तके वाचायची. ही कल्पना सगळ्यांनाच आवडली आणि अमलातही आणली.
आम्हाला वाचायला वेळच नाही', असे म्हणणारे आईबाबा आता नियमित पुस्तके वाचायला लागले. तेजोमयीला दर महिन्याला नवीन पुस्तके
विकत घेऊन देऊ लागले. काही मासिकांची वर्गणी भरली. एके दिवशी तेजोमयीने बाबांना जी. ए. कुलकर्णी यांचे पुस्तक मागितले. जी. ए. कुलकर्णी हे काही बालकुमारांचे लेखक नव्हेत. त्यामुळे बाबांना धक्काच बसला. कारण जी. ए. कुलकर्णी यांचे पुस्तक समजण्याचे तिचे वयही नव्हते. काही मुलामुलींना आपल्या वयापेक्षा अधिक प्रगल्भ लेखन वाचायला आवडते. त्यांच्या अभिरुचीचा मोठ्यांनी आदरच केला पाहिजे, असेच इथे लेखकाला सुचवायचे आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी समजावून सांगितल्यावर बाबांनी तेजोमयीला बाजारातून जी. ए. कुलकर्णी यांची दहा-बारा पुस्तके विकत आणून दिली.
बाबांनी दैनिकाच्या रविवार पुरवणीतील 'पुस्तक परीक्षणाचा धसका' घेतला होता. कारण त्यांना ते आवडत नसे, पण तेजोमयी रविवार पुरवणी आणि त्यातील पुस्तक परीक्षणे आवडीने वाचत असे. आता तेजोमयीचा प्रवास सोप्या वाचनाकडून अवघड वाचनाकडे सुरू झाला. वाचनाच्या बाबतीत तेजोमयी आता आईबाबांच्या खूप पुढे निघून गेली होती. प्रजासत्ताक दिनाला तेजोमयीने भारताचे संविधान वाचण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या घरात संविधान नसल्याबद्दल वडलांकडे नाराजी व्यक्त केली. कॉलनीतील झेंडावंदन झाल्यावर बाबांनी प्रत्येकाच्या घरी संविधानाची प्रत आणून देणार असल्याची घोषणा केली. याचे कारण, तेजोमयीने बाबांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले होते. कधीकधी लहान मुलेही मोठ्यांना शिकवून जातात.
यंदाच्या दिवाळीत तर तेजोमयीने धमालच केली. तिने सोसायटीतील आपल्या मित्रमैत्रिणींना गोळा केले. प्रत्येकाच्या पॉकेट मनीतून नऊ हजार रुपये निधी जमा केला. त्यातून तीस दिवाळी अंक खरेदी केले आणि प्रत्येक घरात एक एक दिवाळी अंक भेट दिला. अशा प्रकारे तेजोमयीने ज्ञानाची दिवाळी साजरी केली. सोसायटीतील सगळ्यांना आनंद झाला. सगळेच म्हणाले, जे मोठ्यांना सुचले नाही, ते छोट्यांनी करून दाखवले. सोसायटीने तेजोमयीचा आणि तिच्या मित्रमैत्रिणींचा सत्कार केला.
जशी कोणत्याही दोन मुलांची तुलना होऊ शकत नाही, तशीच कोणत्याही दोन पुस्तकांचीही तुलना होऊ शकत नाही, हे तेजोमयीने बाबांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे बाबा खजील झाले.
हल्ली तेजोमयी जाडजूड पुस्तके वाचते. वाचताना काही अडचण आली, तर गूगल सर्च करते. कारण तेजोमयी ही डिजिटल युगातली स्मार्ट मुलगी आहे. तेजोमयीने पुस्तके वाचता वाचता शब्दसंग्रह वाढविण्यासाठी शब्दकोश वाचायला सुरुवात केली आहे.
तेजोमयीच्या गावात एकदा साहित्य संमेलन भरले होते. आईबाबांसह ती त्या साहित्य संमेलनात गेली. ती जशी खाऊगल्लीत रमली, तशीच ती पुस्तक प्रदर्शनातही रमली. नजर जाईल तिथपर्यंत दिसणारी पुस्तकांची दुकाने पाहून ती हरखून गेली. मोबाईल आणि टीव्हीपेक्षा तिला पुस्तकांचे हे जग अधिकच आवडायला लागले. पुस्तकांच्या गर्दीत ती अक्षरशः हरवून गेली. पुस्तकांचा इतका प्रचंड खजिना यापूर्वी तिने कधीच बघितला नव्हता. हजारो पुस्तके पाहून तिला 'अलिबाबाची गुहा' सापडल्याचा आनंद झाला होता. तिच्या बाबांनी तिला हवी तेवढी पुस्तके विकत घेऊन दिली. यापुढे अशा गुहेला कधीच मुकायचे नाही, असे तिने मनोमन ठरवून टाकले.
'पंचवटीचं रहस्य' ही ह्या पुस्तकातील शेवटची गोष्ट आहे, नोबल पारितोषिक विजेते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांची. त्यांच्या पुस्तकप्रेमाची आणि वाचनप्रेमाची. बेंगळुरू शहरातील मल्लेश्वरम परिसरातील 'पंचवटी' ह्या बंगल्यात ते राहात असत. त्या बंगल्यात पुस्तकांनी भरलेली पन्नासहून अधिक कपाटं होती. ती सगळी कपाटं उघडी होती. दर शनिवारी हा बंगला शहरातील मुलामुलींसाठी खुला असे. खूप मुलेमुली पंचवटीत येत. कपाटातील हवे ते पुस्तक घेत आणि बागेत जाऊन वाचत बसत. त्यांना कोणी अडवत नसे. उलट मुलामुलींसाठी नाष्ट्याची सोय केली जात असे. पुस्तके वाचताना मुले अतिशय आनंदी होत. मुलांच्या चेहऱ्यांवरचा आनंद बघून डॉ. सी. व्ही. रमणही आनंदी होत. ते आपला संपूर्ण दिवस ह्या मुलांसोबत व्यतीत करत. मुलांना विज्ञानातील गोष्टी सांगत. मुले भान हरपून त्या गोष्टी ऐकत. त्यातील अनेकांना विज्ञान संशोधनाची प्रेरणा मिळाली. हेच आहे 'पंचवटीचं रहस्य'.
ही गोष्ट वाचल्यावर असे वाटायला लागते, की प्रत्येक गावात असा एक पंचवटी बंगला असायला हवा!
बिब्लीओबिबुलीचा सापळा' हे पुस्तक म्हणजे 'हल्ली मुले वाचत नाहीत' ह्या अफवेला दिलेले खणखणीत उत्तर आहे. मुले हमखास वाचतात, पण घरात पालकांनी आणि शाळेत शिक्षकांनी तसे वातावरण आणि तशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तेजोमयीच्या आईबाबांनी जे केले, ते प्रत्येक आईबाबाने केले पाहिजे. हे सहज शक्य आहे. जीवन अधिक सुंदर आणि अधिक देखणं करण्याची क्षमता पुस्तकांमध्ये असते. पुस्तकं आपल्याला ज्ञानगंगेच्या प्रवासाला घेऊन जातात. पुस्तकं म्हणजे तुम्ही हातात धरून ठेवलेलं स्वप्न होय. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी पुस्तकाशिवाय पर्याय नाही, असा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत.
ह्या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे यांची विवेचक प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी बालसाहित्याविषयी नोंदविलेली निरीक्षणे फारच महत्त्वाची आहेत. 'बिब्लीओबिबुलीचा सापळा' हे पुस्तकाचे शीर्षक सुरुवातीला जरा अवघड आणि रहस्यमय वाटते. लेखकाने ह्या शीर्षकाच्या अर्थाची उकल अठराव्या कथेत केली आहे. 'बिब्लीओबिबुली' म्हणजे सतत पुस्तकं वाचणारा. ह्या कथेची भाषाशैली अतिशय प्रवाही, रंजक, ओघवती आणि काहीशी विनोदी आहे. त्यामुळे वाचक ह्या कथेत रमत जातो, गुंतत जातो. सुरेश वांदिले यांनी बालमनोविश्व आणि भावविश्वाचा विचार करून ह्या कथा गुंफल्या आहेत. तेजोमयी, तिचे आई, बाबा, आजी, अलेक्झांडर यांच्या सोबतीने इतरही पात्रे येतात. पात्रांचे संवाद अतिशय पीळदार आहेत, त्यामुळे ह्या कथेत नाट्यात्मकता आली आहे. अथपासून इतिपर्यंत ह्या प्रत्येक कथेत पुस्तके आणि पुस्तकांचे वाचन हाच विषय मध्यवर्ती आहे. ह्या कथांच्या माध्यमातून लेखकाने एका कल्पनारम्य आणि अद्भुतरम्य विश्वाची मनोहारी सफर घडवली आहे. सुरुवातीला पुस्तकाच्या वाचनाला नकार देण्यापासून ते पुढे पुस्तकविश्वात रमत जाण्यापर्यंतचा हा प्रवास अतिशय आनंददायी आहे. वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी ह्या कथा वाचल्याच पाहिजेत.
- 'बिब्लीओबिबुलीचा सापळा' (बालकथासंग्रह)
- लेखक : सुरेश वांदिले
- प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई
- मुखपृष्ठ व सजावट : सतीश भावसार
- पृष्ठे : ५८ किंमत रु. १५०
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS