परभणी (क्रीडा प्रतिनिधी): स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्राला मोठा सन्मान मिळाला असून, प्रा. डॉ. सिंकू कुमार सिंग यांची नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी (एआययू) मध्ये जॉईंट सेक्रेटरी (क्रीडा) या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. या नियुक्तीमुळे विद्यापीठासह संपूर्ण मराठवाडा विभागाचा मान उंचावला आहे.
डॉ. सिंग यांना विद्यापीठ प्रशासन आणि क्रीडा क्षेत्रातील व्यापक अनुभव लाभला आहे. त्यांनी शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक म्हणून यशस्वीपणे कार्य केले असून, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्राधिकरणांवर काम करत त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची ठळक छाप उमटवली आहे.
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी (एआययू) ही देशभरातील विद्यापीठांची प्रमुख संस्था असून, क्रीडा विभागातील जॉईंट सेक्रेटरी या पदावर कार्य करताना डॉ. सिंग यांच्या अनुभवाचा राष्ट्रीय स्तरावर मोठा उपयोग होणार आहे. विद्यापीठांमधील क्रीडा संस्कृती बळकट करणे, आंतर विद्यापीठ स्पर्धांचे प्रभावी आयोजन करणे आणि खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देणे या बाबींमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार तसेच संकुलाच्या संचालिका डॉ. वैजयंता पाटील, प्रा . रमाकांत बनसोडे, आंतरराष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघ सचिव डॉ व्यंकटेश वांगवाड, गणेश माळवे,बाळु बुधवंत, आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

COMMENTS