नदीची आत्मकथा : 'नदी रुसली, नदी हसली' कु. प्रिया माधव नागरगोजे (वर्ग सातवा)

नुकताच मी डॉ. सुरेश सावंत सरांचा 'नदी रुसली, नदी हसली' हा बालकवितासंग्रह वाचला आहे. यापूर्वी मी डॉ. सावंत सरांचे  'गूगलबाबा', 'युद्ध नको, बुद्ध हवा!,          'आभाळमाया', 'पळसपापडी', 'काठीचा घोडा' इत्यादी  कवितासंग्रह  वाचले आहेत. त्यातही खूप  उत्कृष्ट कविता आहेत. माझ्या सरांनी 'तुम्हाला आवडलेल्या पुस्तकावर लिहा' असे सांगितले होते. मी वरील कवितासंग्रहांवरही लिहिले आहे. 

आज मी 'नदी रुसली, नदी हसली' या कवितासंग्रहावर लिहीत आहे. 

या कवितासंग्रहाचे नाव खूप काही सांगून जाते. खरंच, नदी हसेल का? खरंच नदी रुसेल का? हा प्रश्न मला  पडला. या कवितासंग्रहातील 'नदी रुसली, नदी हसली' ही कविता वाचल्यानंतर मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. 


त्यातील काही ओळी......

'निसर्गाचे सारे नियम माणसाने मोडले

शहरातील सांडपाणी नदीमध्ये सोडले

पवित्र तीर्थ नासवण्याची ही रीत कसली? 

नदीमाय रुसली! नदीमाय रुसली! 

आपण नदीला माता, आई मानतो. तिची पूजा करतो. आरती करतो. तिच्या पवित्र पाण्याने अंघोळ करतो आणि त्यातच आपण सांडपाणी, कारखान्यातील दूषित पाणी सोडतो. त्यामुळे तिचे पावित्र्य आपण संपवून टाकलेले आहे. कवीने नदीची आत्मकथाच या कवितेत लिहिली आहे. नदीचे खळाळणारे पात्र आता पाहावयास मिळत नाही. तिचे पात्र हळूहळू आता छोटे होत चालले आहे. तिची गटारगंगाच आपण केली आहे म्हणून कवी म्हणतो,

'नदीमाय रडते आहे ! नदीमाय रडते आहे!' 


कवीने कवितेचा शेवट खूप आशादायी केलेला आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य टिकेल, नदी खळाळून वाहू लागेल आणि आपला देश सुजलाम् सुफलाम् होईल. त्या ओळी अशा :

'कोरड्या नदीपात्राला एकदा नांगरून तर पाहा 

तिची हक्काची वाळूची शाल पुन्हा पांघरून तर पाहा

बारमाही नदी वाहताना दिसेल 

नदीमाय  हसेल! माझी नदीमाय हसेल!' 


या कवितासंग्रहातील मला  आवडलेली 'वाचनपेटी' ही आणखी एक कविता. त्यातील काही ओळी :

'आवडलेल्या पुस्तकावर 

निबंध लिहून झाले 

पुस्तकाशी मैत्री होता 

मस्तक उन्नत झाले'. 

म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. वाचनाने माणूस खूप हुशार बनतो. त्याला पुस्तकातून सगळ्या जगाचा अभ्यास होतो. आपण जर पुस्तकाशी मैत्री केली तर महापुरुषांच्या चरित्रकथा, विज्ञानातील गमतीजमती, संशोधकांच्या यशोगाथा, सामान्यज्ञान, कथा, कविता, नाटक, या सगळ्या गोष्टी आपणास वाचायला मिळतात. 


आमच्याही विद्यालयात ग्रंथालय आहे. अनेक पुस्तके वाचण्यासाठी आम्हाला देत असतात. आणि हो, वाचलेल्या पुस्तकावर आमचे सर अभिप्राय म्हणजेच ते पुस्तक कसे वाटले त्याविषयी लिहायला सांगतात. पुस्तक वाचून त्याविषयी लिहिण्याची सवयच आम्हाला लागलेली आहे.  पुस्तकाशी जणू मैत्रीच झाली आहे.

डॉ. सुरेश सावंत सर हे एक शिक्षक, मुख्याध्यापक होते. त्यांनी  त्यांच्या राजर्षी शाहू विद्यालयावर एक गीत  लिहिले आहे. हे गीत वाचल्यानंतर सरांच्या शाळेतच गेल्याचा भास होतो.


'अक्षरांच्या गमतीजमती' ही कविता खूपच मजेशीर आहे. यात अक्षरांच्या गमतीजमती सांगितल्या आहेत. काही जणांचे अक्षर खूपच सुंदर असते. तुझे  अक्षर मोत्यासारखे आहे, असे आपण म्हणतो. माझे अक्षर तेवढे सुंदर नाही,  पण मी सुंदर अक्षर काढण्याचा नेहमी प्रयत्न करते. माझे सर काही जणांचे अक्षर पाहून म्हणतात, 'अक्षर आहे की मुंगीचे पाय?' 

अशाच गमतीजमती या कवितेतून वाचायला मिळतात. जसे की अक्षर म्हणजे उंटाचे पाय. म्हणून कवीप्रमाणेच मलाही वाटते की,

'नको मला खडू

नको मला फळा

वहीमध्ये गुंफतो मी

मोत्यांचा मळा'.


'आमचा परिपाठ' ही कविता मला खूपच आवडली.

'आज आमच्या वर्गाचा 

परिपाठ झाला छान 

नावीन्याचा ध्यास लागला 

ताठ आमची मान'. 

आमच्या वर्गाचा परिपाठ बुधवारी असतो. त्यात  सुविचार, दिनविशेष, बातम्या, बोधकथा, गीत, सामान्यज्ञान इत्यादींचा समावेश असतो. ही कविता वाचल्यानंतर कवीने आमचा परिपाठ पाहूनच ही कविता लिहिली की काय, असा मला  प्रश्न पडला.


'चंद्रावरची प्रयोगशाळा' ही कविता मला खूप आवडली. काही महिन्यांपूर्वी आपल्या भारताने चंद्रावर यान पाठवले आणि ते यशस्वीही झाले. त्या वेळी आमच्या विद्यालयात चांद्रयान बनवण्याची स्पर्धा आमच्या तळेगावे सरांनी आयोजित केली होती. स्पर्धेतील चांद्रयान बनवताना मलाही वाटले की ,

'तुला सांगतो आई मला 

अंतराळवीर व्हायचंय 

अंतराळवीर होऊन मला 

चंद्रावर जायचंय'. 

चांद्रयान मोहिमेतील नील आणि एडविन यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याला आता पन्नास वर्षे होत आहेत. चंद्रावरचे गुरुत्वाकर्षण, अंतराळवीर जॉन व ग्लेन या सर्वांची माहिती या कवितेतून वाचायला मिळाली. 


या कवितासंग्रहातील अजून एक सुंदर रचना 'विज्ञानसाक्षर होऊ'. आजही आपण अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी पाळत असतो, जसे की सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाच्या वेळी आपण कोणतेही काम करत नाही. ग्रहण संपल्यावर आपण अंघोळ करतो. या तर खगोलीय घटना आहेत. यात कसली अंधश्रद्धा म्हणून कवी म्हणतो 

'मांजर आडवे गेले, हा अपशकुन नाही

मुंगूस आडवे गेले, हा शुभशकुन नाही 

शुभ-अशुभाच्या या भाकड गोष्टी भिरकावून देऊ

चला गड्यांनो, आपण सारे विज्ञानसाक्षर होऊ!


मांजर आडवे गेले तर कोणतेही काम होत नाही, असे म्हणतात किंवा थोडा वेळ थांबतात, रस्ता बदलतात. अशा गोष्टी आपण नियमित पाहत असतो. यात कोणते अपशकून असेल? बिचारे मांजर!  त्याचा काय दोष बरे आणि मुंगूस आले तर शुभशकुन. आपण म्हणतो 'मुंगूसमामा मुंगूसमामा तोंड दाखव'. बिचारे हे प्राणी! त्यांना यातलं काही कळत काही.  या सगळ्या भाकडकथा बाजूला सारून आपण विज्ञानसाक्षर झाले पाहिजे. 


'पुस्तक माझा मित्र', 'आनंदाने जगण्याचा मंत्र', 'अन्नदाता', 'कागदाची कमाल', 'माझी शाळा', 'पर्यावरणपूरक गणपती', 'पावसा पावसा धाव रे', ' स्वर्गासारखा वर्ग' याही कविता मला खूप आवडल्या. एकंदरीतच या संग्रहातील सर्वच कविता छान छान आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील आकर्षक चित्रे ज्ञानेश बेलेकर यांनी रेखाटली आहेत. मुखपृष्ठावर नदीमाईचे सुंदर रूप, चांद्रयानात बसून चाललेला छोटा अंतराळवीर, युद्ध नको !बुद्ध हवा! हे पुस्तक वाचणारी मुलगी, अशी सुंदर चित्रे रेखाटली आहेत. आतील चित्रे तर खूपच मनमोहक अशी कवितेला अनुसरून रेखाटली आहेत. पाठपृष्ठावर डॉ. सुरेश सावंत सरांचे प्रकाशित  असलेले बालसाहित्य यांची  माहिती दिली आहे. संपूर्ण कवितासंग्रह रंगीत व गुळगुळीत  अशा सुंदर पानांवर छापला आहे, म्हणून पुस्तकाला अधिकच सुंदर रूप प्राप्त झाले आहे. एकंदरीतच 'नदी रुसली, नदी हसली' हा काव्यसंग्रह खूपच सुंदर आहे. सर्वांनी वाचावा व संग्रही ठेवावा असा आहे.


'नदी रुसली, नदी हसली' 

(बालकुमारांसाठी कवितासंग्रह) 

कवी : डॉ. सुरेश सावंत 

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई 

मुखपृष्ठ : ज्ञानेश बेलेकर, नाशिक 

पृष्ठे : ६४

मूल्य : १२० रुपये

-------------------------------------------------

नाव : कु. नागरगोजे प्रिया माधव

वर्ग : सातवा

शाळा : श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती, ता. मुखेड जि. नांदेड.

टिप्पण्या