माणसा तू माणूस बन

तुम्ही म्हणाल माणसाने भरलेल्या या जगात माणसा तू माणूस बन असे म्हणण्याची वेळ का बरे आली असेल. केवळ दिसण्याने माणूस असणे म्हणजे मानव जन्माची सार्थकता सिद्ध होत नाही. मनुष्य जन्म हा ईश्वरनिर्मित सर्व रचनेमध्ये श्रेष्ठ मानला जातो कारण इतर जीवापेक्षा केवळ माणसाला काही बाबतीत श्रेष्ठत्व प्रदान केले गेले आहे. जगातील सर्वच जीव जगत असतात परंतु माणसाला स्वतःचे हित अहित जाणून घेण्याची विशेष समजबुद्धी मिळाली आहे.

     माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचा विकार नसतो कारण त्याचे अंतकरण शुद्ध असते. जन्माला आलेल्या कोऱ्या बालकाला जसे घडवले जाते तसा तो घडत जातो.जन्मतः त्याच्या माथी कसलाही ठप्पा घेऊन येत नाही म्हणून जात,धर्म,पंथ,वंश,चाली रीती यांचा त्याला कसलाही लवलेश नसतो. जसं जसे वय वाढत जाते तस तसे दुनियेत राहून तो दुनियादारी शिकत राहतो.व्यक्तीचा स्वभाव आणि संस्कार हे समाजाची देणं असते कारण शिकवण्या पेक्षा जास्त सभोवताली होणाऱ्या हालचालीतून मिळणारे अनुभव मनावर परिणाम करतात.समाजात राहून त्याच्या जीवनात बदल घडत राहतात.किशोर अवस्थेत आल्यानंतर त्याची समज विकसित होईपर्यंत त्याने खूप काही अनुभवलेल असतं.समाजात वावरत असताना मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून त्याच्या  नजरेत निर्माण झालेले चित्र फारच विद्रूप असते.त्याने पाहिलेला माणूस इतरांच्या प्रगतीवर द्वेष करणारा,इतरांच्या सुखामध्ये विरजण घालणारा,आपापसात वाद करणारा,नाते संबंध तोडून एकटा राहण्यात सुख मानणारा,स्वार्थासाठी इतरांना त्रास देणारा आणि इतरांच्या झोळीत दुःख टाकून आनंदी होणारा असाच असतो.

"तुला मानवा या ठायी,जन्म पुन्हा पुन्हा नाही"

"बहुमोलाचे हे लाभले जीवन,माणसा तू माणूस बन"

मानव जन्म बहुमोलाचा आहे कारण या जन्मात येऊनच सत्कर्म आणि सदाचार अंगी बाळगून जीवन व्यतीत करणे ईश्वरास अपेक्षित असते परंतु माणूस स्वतच्या विश्वात रमून हित अहित याचा विचार न करता आपल्याच धुंदीत मस्त राहतो.माणसाच्या वृत्ती मध्ये परोपकराची भावना असेल तर या हाताने इतरांना सुख वाटण्याचे पुण्य प्राप्त करता येते.हे सर्व सोडून आपण का असे वेड्या सारखे वागत आहोत?.एखाद्या व्यक्ती कडे इनोव्हा आहे आणि शेजाऱ्याने स्विफ्ट जरी घेतली तरी ईनोव्हा दारात असणारा माणूस दुःखी होतो.माझ्या कडे काय काय आहे याचा मला आनंद नाहीये कारण मी तर इतरांच्या प्रगतीवर उदास होऊन जातो. माणसातील माणुसकी हरवत चालल्याची किती उदाहरणे द्यावीत वैर इर्षेने एखाद्या व्यक्ती बद्दल आयुष्यभर कटुता निर्माण होते तर धन संपत्तीच्या वाटणी साठी कौटुंबिक नात्यात कायमचा दुरावा निर्माण होतो.जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठणारी माणसं पण समाजात आहेत.लुटमार,खून,दरोडे,जातीय वाद,दंगली अश्या अनेक प्रकारची दुष्कृत्ये होण्या मागे एकच कारण आहे ते म्हणजे मानवमुल्यांचा दिवसेंदिवस होणारा ह्रास.

      माणसाच्या श्र्वासाचा क्षणाचा भरोसा नाही.अगदी चालता बोलता या देहातून प्राण निघून जातो.पाण्याचा बुडबुडा असणारा हा मानव जन्म पूर्णत्वास नेण्यासाठी मार्ग शोधण्याची गरज आहे.व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य घटक आहे म्हणून प्रत्येक माणसाने स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याला सुरुवात केली तर समृद्ध आणि सक्षम समाज निर्माण होणे सहज शक्य आहे.सभोवताली कुणावर अन्याय होत असेल तर त्या विरुद्ध आवाज उठवणे,निर्बल माणसाला निस्वार्थ आधार देणे,माणुसकीची जाण ठेवून इतरांच्या दुःखात सहभागी होणे यासाठी वेगळ काही करण्याची गरज नाही हे गुण आपल्या अंगी असतातच केवळ ह्या सद्गुंनाना चेतना प्रदान करून त्याद्वारे समाजहित जोपासण्याचे कार्य अगदी सहज करता येते. छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद आपल्या पुरता सीमित न ठेवता त्यात इतरांना सहभागी करून त्यांच्या ओठावर हसू आणता येईल यापेक्षा मोठे पुण्य कशातही नाही.

      माणूस आयुष्यभर इतरांमधील दुर्गुण शोधून आपल्या मनात त्याला साठवत राहतो आणि असे करत करत त्याचे अंतर्मन सद्गुण पाहण्याची नजर गमावून बसतो.धन संपत्तीच्या जोरावर माणसाची श्रीमंती ठरवता येत नाही तर त्या श्रीमंतीच्या छायेत दिन दुबळ्याना मायेची सावली मिळाली तरच त्याची श्रेष्ठता.माणसाच्या जन्मात येऊन माणुसकी जोपासली तरच मानव जन्म सफल होऊ शकतो.

माणसामधला माणूस जागा करण्यासाठी अनेक संत ,महात्मा,महापुरुष प्रयत्न करत राहिले.सत्संग,सुविचार,सन्मार्ग आणि सदाचार या शिवाय माणूस अपूर्ण आहे याची जाण करून देऊन प्रेम आणि नम्रता मनात भरून माणसाचे जीवन परिपूर्ण करता येते हे त्यांनी वेळोवेळी समजावून सांगितले.केवळ हाडा मासाचा पुतळा बनून जगात मिरवण्या पेक्षा या देहा द्वारे सत्कर्म करत मानवमुल्य जपता आले तरच खऱ्या अर्थाने जिवंत आहोत असे म्हणता येईल.

हीच अमुची प्रार्थना, अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी,माणसा सम वागणे

पवन श्रीरंगसा कुसुंदल,नांदेड

संपर्क:९०७५५९५६९५

टिप्पण्या